twitter
rss

🎋जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी*

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांतील लाखो शिक्षकांना अनेक वर्षांपासून रखडलेली सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी यापुढे दिली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

विधान परिषदेत अनेकदा यासंदर्भात प्रश्‍न विचारून माजी आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षण, जलसंधारण आणि ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात जलसंधारण, ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागात ताळमेळ नसल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. शालेय शिक्षण विभागाने तीन जून 2000 च्या "जीआर'द्वारे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मात्र 11 नोव्हेंबर 2005 च्या "जीआर'नुसार सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी एक मार्च 2000 पासून लागू केली होती; मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परित्रकाद्वारे एक जानेवारी 1996 पासून वेतनवाढ जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात एक मार्च 2014 पासून ती लागू करण्यासाठी मंजुरी दिली.

यासाठी शालेय शिक्षण विभागाने या वेतनश्रेणीसाठी आर्थिक तरतूद करावी, असेही आदेशात म्हटले आहे. याचा राज्यातील लाखो शिक्षकांना फायदा होईल, अशी माहिती मोते यांनी दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📚पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांत बदल*

*🎯दीड वर्षांतच नव्या अभ्यास मंडळांच्या स्थापनेचा डाव*

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 7, 2017 2:26 AM

*दीड वर्षांतच नव्या अभ्यास मंडळांच्या स्थापनेचा डाव*

पहिली ते बारावी या अभ्यासक्रमांत एकसंधता येण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास मंडळात अवघ्या दीड वर्षांत बदल करण्याचा खटाटोप शिक्षण विभागाने सुरू केला आहे. काही सदस्य ‘सक्षम’ नसल्यामुळे मंडळात बदल करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ‘आताच्या पाठय़पुस्तकांतून मुले शिकलीच नाहीत,’ म्हणून पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांतही बदल करण्यात येणार आहेत.

अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके यांत एकसंधता यावी यासाठी दीड वर्षांपूर्वी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले. मात्र त्यानंतर एका इयत्तेचे नवे पुस्तक लागू होण्यापूर्वीच अभ्यास मंडळे बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. मराठी आणि गणित विषयाची मंडळे बदलण्यात येणार आहेत. तज्ज्ञ म्हणून अभ्यास मंडळावर निवड करण्यात आलेल्यांपैकी काही सदस्य हे ‘अक्षम’ असल्याचा  साक्षात्कार अचानक अभ्यास मंडळाला  झाला आहे. त्यामुळे या सदस्यांच्या ऐवजी नवे सदस्य नेमण्याची प्रक्रिया विद्या प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी   प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर  या दोन विषयांतील तज्ज्ञांनी अभ्यास मंडळावर येण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. प्रथम भाषा मराठी आणि गणिताच्या पाठय़पुस्तकात संरचनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे  प्राधिकरणाने म्हटले आहे. मंडळात वारंवार बदल करण्यात येणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले . मात्र त्यामुळे एकच अभ्यास मंडळ तयार करण्यामागे असलेल्या ‘एकसंध अभ्यासक्रम’ तयार करण्याच्या मूळ हेतूचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


*पाठय़पुस्तके  बदलणार*

राज्यातील अभ्यासक्रम आराखडय़ाला सात वर्षे झाली, तरीही या अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तकांचाच घोळ अजून संपलेला नाही. राज्यात सध्या २०१० चा अभ्यासक्रम आराखडय़ानुसार दरवर्षी टप्प्याटप्प्याने नवी पाठय़पुस्तके लागू होत आहेत.
त्यानुसार यंदा सातवीची नवी पुस्तके लागू होणार आहेत. मात्र आता पुढच्यावर्षी पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांतही काही बदल करण्यात येणार आहेत. सध्याच्या पाठय़पुस्तकांतून मुले आवश्यक ते शिकली नाहीत, म्हणून पाठय़पुस्तके बदलण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

*काहीच सदस्य बदलण्यासाठी सगळ्यांना अर्ज करण्याची सूचना*

अभ्यास मंडळातील काहीच सदस्य बदलण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात येत आहे. मात्र, अभ्यास मंडळात राहण्यासाठी सध्या असलेल्या सदस्यांनीही अर्ज करणे आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे या नव्या प्रक्रियेची माहितीदेखील अभ्यास मंडळातील ठरावीक सदस्यांनाच आहे. सदस्यांना याबाबत पत्रेही देण्यात आलेली नाहीत.
सदस्य अक्षम, पुस्तके निरुपयोगी
‘सध्या अस्तित्वात असलेल्या अभ्यास मंडळातील काही सदस्य हे सक्षम नाहीत. त्यामुळेच या सदस्यांना बदलण्यात येणार आहे. अभ्यास मंडळे पूर्णपणे न बदलता काहीच सदस्य बदलण्यात येतील. मराठी आणि गणित हे मूलभूत विषय असल्यामुळे आधी त्याच्या मंडळात बदल होतील. त्यानंतर इतर विषयांचा विचार केला जाईल.

        सदस्य निवडीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. मात्र ते पूर्वीपेक्षा अधिक चांगले असतील. पहिली ते चौथीची पुस्तकेही बदलण्यात येणार आहेत. आधीच्या मंडळाने काय केले माहित नाही, मात्र या पुस्तकांवरून मुले अपेक्षित गोष्टी शिकत नसल्याचे दिसते. त्यामुळे पुस्तकांत काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काहीच सदस्य बदलण्यात येणार आहेत. कुणाही विशिष्ट सदस्यांना बदलण्याचा उद्देश नाही.’   
                                           – नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज

🌿 केंद्र सरकारच्या मानांकनात भारती विद्यापीठ अव्वल स्थानावर*

By pudhari | Publish Date: Apr 9 2017

सांगली : प्रतिनिधी


केंद्र सरकारच्या माधवसंसाधन विभागाने देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे मूल्यांकन नुकतेच जाहीर केले आहे. त्यामध्ये भारती विद्यापीठाने ए प्लस मानांकनासह अव्वल स्थान मिळवून विजयाची गुढी उभारल्याचे संस्थापक कुलपती आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. विद्यापीठाने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. सोमवारी (दि. 10 एप्रिल) दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते याबद्दल गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, भारती विद्यापीठाने नॅशनल अ‍ॅक्रिडेशन कौन्सिलकडून होणार्‍या नामांकनात पहिल्या टप्प्यात ए, दुसर्‍या टप्प्यात ए दर्जा मिळविला होता. तिसर्‍या टप्प्यातही ए प्लस मानंकन मिळविले होते. दरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पहिल्यांदाच देशातील सर्वच शैक्षणिक संस्था, विद्यापीठाचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार केलेल्या मानांकनात भारती विद्यापीठाने देशात 54 वा, राज्यात सहावा, तर पुणे शहरात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

डॉ. कदम म्हणाले, भारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेने राज्यात सातवा, तर पुण्यात दुसरा क्रमांक पटकाविला. भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मॅनेजमेंटने राज्यात चौथा तर पुण्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.  फार्मसी कॉलेजने देशात आठवा, राज्यात दुसरा तर पुण्यात पहिला क्रमांक मिळविला. भारती विश्‍वविद्यालय राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी( पुणे)ने राज्यात दुसरा, तर पुण्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. भारती विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेज (कोल्हापूर)ने राज्यात नववा क्रमांक, तर कडेगावच्या मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालयाने देशात 99 वा तर राज्यात 12 वा क्रमांक मिळविला आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात दुसर्‍या क्रमांकाचे यश मिळविले आहे. भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाने सर्वसाधारण गटात देशात 90 वा तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻अतिरिक्त माध्यमिक शिक्षक अद्याप वेतनापासून वंचित*

By pudhari | Publish Date: Apr 8 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही शाळेत हजर न करून घेतलेल्या 55 अतिरिक्तशिक्षकांचे डिसेंबर 2016 पासून अद्याप वेतन झालेले नाही. यामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत. वेतन अधीक्षक कार्यालयाने वेतन आदा न केल्यास पुन्हा मंगळवार, दि. 11 पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये राबविण्यात आलेल्या समायोजन प्रक्रियेत जिल्ह्यातील 248 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले. यातील 165 शिक्षकांचे समायोजन करून त्यांना संबंधित शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. काही शिक्षक हजर झाले. मात्र, अद्याप काहींना शिक्षण संस्थांनी हजर करून घेतलेले नाही. यासंदर्भात मार्च 2017 मध्ये शिक्षण विभागाने आदेश काढला. अतिरिक्त शिक्षकांचे तत्काळ समायोजन करून घेण्यात यावे. शालार्थ वेतन प्रणालीमधून त्यांचे वेतन आदा करावे. याबाबतची कार्यवाही माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी पूर्ण करावी, असे सूचित करण्यात आले; परंतु याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसून अतिरिक्त शिक्षकांचे वेतन झालेले नाही.

माध्यमिकच्या 27 शिक्षकांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांचेही समायोजन झाले नाही. वेतन पथक अधीक्षकांना वेतनसंदर्भात आदेश देऊन अद्याप कार्यवाही झालेली नाही. सोमवारपर्यंत वेतन आदा न झाल्यास वेतन पथक अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांनी दिला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃