twitter
rss

🎋जुनी निवृत्तिवेतन योजना शिक्षकांना लागू करण्यास सरकारचा नकार*

*राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सभात्याग केला*

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: April 2, 2017 1:50 AM

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी फेटाळून लावली. त्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सभात्याग केला.

शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, अशी सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही सदस्यांची मागणी होती. परंतु ती अमान्य केल्याने दोन्ही बाजूच्या शिक्षक आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना नवीन अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली. मात्र १ नोव्हेंबरपूर्वी सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर कायम वेतनश्रेणीत आलेल्या शिक्षकांना जुनीच योजना लागू करण्याचा तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु त्याचवेळी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शंभर टक्के अनुदानावर नसलेल्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले. त्यांनाही जुनी योजना लागू करावी, यासंबंधीची लक्षवेधी सूचना विक्रम काळे यांनी मांडली होती. त्याला वा. को. गाणार, निरंजन डावखरे व अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला.

शिक्षकांच्या निवृत्तिवेतन योजनेचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्यास दीपक केसरकर यांनी नकार दिला. परंतु काळे यांनी १ नोव्हेंबरपूर्वी सेवेत आलेल्या परंतु त्यानंतर अनुदानावर आलेल्या संस्थांमधील शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.  केसरकर यांनी  ती मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्याचा निषेध करीत काळे यांनी सभात्याग केला.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🏘राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु*

By pudhari | Publish Date: Apr 2 2017

मुंबई : प्रतिनिधी

मे महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर राज्यातील शाळा गुरुवार, 15 जूनपासून सुरु होणार आहेत. तर विदर्भातील शाळा या उन्हाळा अधिक असून पावसाला उशिरा सुरुवात होत असल्याने मंगळवार 27 जूनपासून सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने काढले आहे.

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळा व दिवाळी सुटीनंतर सुसूत्रता राहावी म्हणून यासंदर्भात 29 मार्चलाच परिपत्रक काढले आहे. 22 जून 2007 च्या शासन निर्णयानुसार विदर्भातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 26 जून रोजी सुरु होतात. पण यंदा 26 जून रोजी रमजान ईदची शासकीय सुट्टी असल्यामुळे यावर्षी शाळा 27 जून रोजी सुरु करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सुटीला प्रारंभ 16 ऑक्टोबर 2017 पासून सुरु करण्यात येणार आहे. शाळांना गणेशोत्सव अथवा नाताळची सुट्टी द्यायची असल्यास दिवाळी अथवा उन्हाळ्याची सुट्टी कमी करून देता येणार आहे. पण या आधी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻अतिरिक्त शिक्षकांना फटकाच?*

Maharashtra Times | Updated Apr 2, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह राज्यभरातील शिक्षणसंस्थाचालक आणि शिक्षकांचे लक्ष लागलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतचे वेळापत्रक शिक्षण आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले. या वेळापत्रकानंतरही अतिरिक्त शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली असून, शैक्षणिक वर्षे २०१६-१७च्या संचमान्यतेनुसार हे समायोजन होणार असल्याने राज्यातील हजारो अतिरिक्त शिक्षकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, शिक्षक समायोजन प्रक्रियेत शिक्षक निवडण्याचा प्रथम अधिकार हा संस्थेला दिल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाने २०१६-१७च्या संचमान्येतुनसार खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. शिक्षण आयुक्तांची जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार ५ एप्रिलला समायोजन प्रक्रिया सुरू होणार असून ३१ मे रोजी संपणार आहे. या परिपत्रकानुसार यंदा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्याचे अधोरेखीत करतानाच नव्या संचमान्यतेनुसारच ही समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यावेळी शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरविताना ज्युनिअर शिक्षक अथवा विषयाची गरज व आरक्षण पाहिले जाणार असून शिक्षकांवर अन्याय झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार अनेक शिक्षकांचे अन्य जिल्ह्यांत समायोजनाची शक्यता असल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षक समायोजन प्रक्रियेत टप्पा एक नुसार सर्वप्रथम शिक्षक निवडण्याचा अधिकार संस्थेला दिल्यामुळे काही शिक्षणसंस्था निवड करण्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा करणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन समायोजनाचा उद्देश नष्ट होईल, असे या वेळापत्रकावर आक्षेप घेताना काँग्रेस शिक्षक सेलचे महादेव सुळे म्हणाले. दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया जुन्या संच मान्यतेनेच व्हावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.

*काहींना दिलासा*

शिक्षण आयुक्तांनी जाहीर केलेल्या या निर्णयानुसार क्राफ्ट, संगीत व तबलजी शिक्षक अतिरिक्त ठरत असले तरी राज्यात या पदांच्या रिक्त जागा नसल्याने या शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असे आदेश दिल्याने या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ३० जून २०१७ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

*९ वर्षांनंतर ७५ पैसे वाढले!*

राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेशी निगडीत घटकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. तब्बल नऊ वर्षांनंतर हे मानधन वाढविण्यात आले असले तरी ही वाढ अत्यल्प असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नऊ वर्षांनतर दहावीच्या पेपर तपासनीसांसाठी ७५ पैसे आणि बारावीच्या पेपर तपासनीसांसाठी १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या या नव्या निर्णयानुसार दहावीची उत्तपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांच्या मानधनात ७५ पैशांनी वाढ करून ते ५ रुपये करण्यात आले आहे. तर, बारावीच्या उत्तरपत्रिकांसाठी एक रुपयांनी वाढ करून हे मानधन सहा रुपये करण्यात आले आहे. अडीच तास कालावधीच्या उत्तरपत्रिकेसाठी दहावीला ४ रुपये तर बारावीला ५ रुपये, दीड ते दोन तास कालावधीच्या उत्तरपत्रिकेसाठी दहावीला ३ रुपये तर बारावीला ४ रुपयांचे सुधारित मानधन देण्यात येणार आहे. दहावीच्या एक तास कालावधीच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये तर बारावीच्या उत्तरपत्रिकेसाठी ३ रुपये देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करताना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघ महासंघाचे प्रा. अनिल देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे नियमन करणाऱ्या नियामकास एकरकमी रक्कम देण्यात येत होती. ही रक्कम वाढवावी व हजार उत्तरपत्रिकावरील प्रति उत्तरपत्रिका दोन रुपये द्यावे अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ती मान्य न करता नियामकाचे मानधन सरसकट दोन रुपये करण्यात आले आहे. यामुळे एक हजार उत्तरपत्रिका मिळालेल्या नियामकाला नुकसान सोसावे लागणार असल्याचे देशमुख म्हणाले. राज्य मुख्याध्यापक संघ महांमडळाचे प्रशांत रेडीज यांनीही याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🚌स्कूल बसला अपघात;शिपाई ठार,45विद्यार्थी जखमी*

By pudhari | Publish Date: Apr 1 2017

मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील जुनोनी माध्यमिक विद्यालय, जुनोनी येथील प्रशालेची विद्यार्थ्यांची ने-आण करणारी स्कूल बस नंदेश्‍वर-जुनोनी रस्त्यावर बस चालकांचा ताबा सुटल्याने रस्त्या लगतच्या खड्ड्यात उलटली. यात 45 विद्यार्थी जखमी झाले. तर बसमधील सेवक आण्णासो कृष्णा जाधव (वय 40, रा.जुनोनी) याचा जागीचा मृत्यू झाला. स्कूल बसचा चालक नवनाथ ढगे याने अपघातानंतर भीतीपोटी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास घडली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे जुनोनी माध्यमिक विद्यालय, जुनोनी या विद्यालयाची दररोज विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एम. एच 14, बी ए- 8024) शनिवारी सकाळी विद्यार्थी आणण्यासाठी मेटकरवाडी, लमाणतांडा, खडकी येथे गेली होती. सकाळी 7.30 च्या सुमारास विद्यार्थी घेऊन ती खडकी, जुनोनी कच्चा रस्ता पार करून नंदेश्वर, जुनोनी डांबरी रस्त्यावर आल्यानंतर जुनोनीपासून दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर आल्यावर बस चालक  नवनाथ भिकाजी ढगे याचा  ताबा सुटल्याने बस डांबरी रस्त्याशेजारील मोठ्या खड्ड्यात उलटली. बस उलटत आहे, असे लक्षात आल्यानंतर बसमध्ये असलेला सेवक आण्णासो किसन जाधव (वय 38) यांनी बसमधून उडी मारली. परंतु, बस त्यांच्या अंगावरच पडल्याने ते बसखाली अडकले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळताच खडकी, जुनोनी, मेंटकरवाडी आदी परिसरातील पालकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

या दुर्घटनेत इयत्ता पाचवी ते दहावीमधील  45 विद्यार्थी जखमी झाले. त्यांची नावे अशी :  स्वाती लवटे, काजल गडदे,  मनोज शिंदे,  दीपक शिदाळकर,  शिवाजी सोनलकर, अंजली शिंदे, रोहित चव्हाण, श्वेता राठोड, गणेश गेजगे, आकाश शिंदे, राजू गेजगे, सोनू अवघडे, मोहिनी शिदे, ठाकूबाई रजपूत, नेहा पवार, शीतल शिंदे, काजल शिदाळकर, कल्पना मेटकरी, शबाना शेख, दिशा धनवडे, राजू शेंडगे, सूरज मेंटकरी, काजल मेंटकरी. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रूग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले.  त्यांपैकी 11 गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर काही पालकांनी आपल्या मुलांना सांगोला, मंगळवेढा येथील  खासगी दवाखान्यात दाखल केले. संस्थाचालक, मुख्याध्यापक हे सकाळ पासून नॉट रिचेबल होते. पोलिसांनी या घटनेची तपासणी सुरू केल्यानंतर ते भीतीपोटी स्वत : हून  दुपारनंतर मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर झाले.

घटनेची माहिती समजताच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार प्रदीप शेलार, गटविकास अधिकारी आर. आर. पाटील आदींनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभु, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींकडून या घटनेची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके हे सकाळपासून घटनास्थळी माहिती मिळवत होते.

*🤾‍♂क्रीडा अधिकारी-पालकांमध्ये शाब्दिक चकमक*

*सवलतीच्या गुणांमध्ये पालकांचा संभ्रम*

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळात सहभागी झाल्यावर क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळतात. या गुणांमुळे त्या विद्यार्थ्याची टक्केवारी वाढण्यास मदत होते. त्यामुळे या इयत्तेतील अनेक विदयार्थी वाढीव गुणांसाठी शालेय क्रीडा स्पर्धात सहभागी होतात. ८७ शालेय खेळांपैकी केवळ ४२ खेळांना अधिकृत मान्यता असल्याने अनेक वेळा मान्यता नसणारे खेळ खेळाडू खेळतात आणि वाढीव गुणांसाठी जिल्ह्या क्रीडा कार्यालयात धाव घेतात. परंतु, अधिकृतच खेळांनाच वाढीव गुण मिळत असल्याचे क्रीडा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर पालक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडत असल्याची माहिती एका क्रीडा अधिकाऱ्याने दिली.

दरवर्षी वाढीव गुणांसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात विद्यार्थी धाव घेतात. जे विद्यार्थी अधिकृत खेळात सहभागी होतात त्यांची यादी शाळेच्या वतीने कार्यालयात पाठवली जाते. याद्यांची तपासणी होऊन क्रीडा कार्यालयाकडून बोर्डाकडे यादी पाठवली जाते आणि त्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळण्यास मार्ग मोकळा होतो.

गेल्या काही वर्षात शालेय खेळांमध्ये वाढ झाली असून काही महिन्यांपूर्वीच मिनीगोल्फचा समावेश करण्यात आला आणि हा आकडा ८७ पर्यंत गेला. मान्यता नसणारे खेळ संघटनांच्या माध्यमातून खेळले जातात. संघटनांही तालुक्यापासून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेतल्या जात आहेत. मुलाचे बोर्डाच्या परीक्षेत मार्क वाढावेत या हेतूने पालक अशा खेळांसाठी मुलांना प्रवृत्त करतात. सवलत कोणत्या खेळांना मिळते, याचे ज्ञान पालकांना नसल्याने पालकही मान्यता प्राप्त नसणाऱ्या खेळासाठी विद्यार्थ्याला धाडतात. मात्र जेव्हा मुलाचे कागदपत्र घेऊन क्रीडा कार्यालयात संपर्क साधला जातो, तेव्हा मात्र या खेळांना मान्यता नसल्याचे अधिकारी पालकांच्या निदर्शनात आणून देतात.

भरमसाठ शालेय खेळांना राज्य क्रीडा विभागाने मान्यता दिली खरी, परंतु क्रीडा अधिकाऱ्यांना पालकांचा संभ्रम दूर करताना नाकीनऊ येत आहे. उघडपणे कोणतेच अधिकारी बोलत नसले तरी मान्यता प्राप्त नसलेल्या खेळाचे नियोजन करणे अधिकाऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याचे समजते.

असे होते गुणांचे मूल्यमापन

राष्ट्रीय स्पर्धेत

प्रथम, द्वितीय, तृतीय २५ गुण

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत

प्रथम, द्वितीय, तृतीय २० गुण

राज्यस्तरीय स्पर्धेत

सहभागी ः १५ गुण

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛳शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर*

By pudhari | Publish Date: Apr 2 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील नवे शैक्षणिक वर्ष (2017-18) साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा विभागाने शनिवारी जाहीर केले. आजपासून या प्रक्रियेस सुरुवात झाली.  शिवाजी विद्यापीठाच्या या www.unishivaji.ac.in  अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी पहावी, असे आवाहन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

2017-18 या वर्षाच्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश निश्‍चिती करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. जवळपास दीडशेच्या आसपास अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आजपासून या प्रक्रियेस सुरुवात झाली. 10 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. प्रवेश परीक्षा 5 मेपासून सुरू होणार आहे. एमए, एमएस्सी, एम.ए. मास कम्युनिकेशन आदी विविध अभ्यासक्रमांच्या ऑफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा 5 मे रोजी असणार आहे. यासह विविध अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेश परीक्षांची ऑफलाईन केंद्र

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (सायबर), सांगली : कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅन्ड सायन्स, सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, संत गाडगेबाबा महाविद्यालय, कराड.

ऑनलाईन केंद्र : कोल्हापूर : डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स, शिवाजी विद्यापीठ, केआयटी कॉलेज, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कसबा बावडा, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चित्रनगरी, जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर, सांगली : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आष्टा, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स. सातारा : के.बी. पी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  अ‍ॅन्ड पॉलिटेक्निक कॅम्प, यशोधा टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

👨🏻‍🏫 शिक्षकानेच पकडले स्वत:च्या मोटारसायकल चोरट्याला 🏍🏃*

By pudhari | Publish Date: Apr 1 2017

जत :
चोरीस गेलेली स्वत:ची मोटारसायकल एका शिक्षकाने शोधून काढली. एवढेच नव्हे तर चोरट्याच्याही मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे मोटारसायकल चोरटा सराईत निघाला.

अटक केलेला संशयित चोरटा दरीबडची (ता. जत) येथील असून अनिल आटपाडकर असे त्याचे नाव आहे. येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलमधील शिक्षक रामदास कोकरे यांची मोटारसायकल 11 फेब्रुवारीस चोरीस गेली होती.

रामराव विद्यामंदिरच्या आवारात असलेल्या सीसीटीव्हीची पडताळणी केली असता मोटारसायकल चोरी करित असतानाचे चोरट्याचे फुटेज मिळाले. चोरीचा प्रकार दिवसाच घडला असल्याने चोरटा स्पष्टपणे सीसीटीव्हीत कैद झाला. त्या फुटेजवरून फोटोही काढण्यात आला. होता.

सर्व पुरावा देऊनही जत पोलिसांनी मोटारसायकलीच्या चोरीच्या तपासाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे रामदास कोकरे या शिक्षकांनी स्वत:च चोरट्याचा तपास सुरू केला. विद्यार्थी व पाहुण्यांच्या सहाय्याने मोटारसायकल चोरट्याचा सुगावा काढला. मोटारसायकल सिध्दनाथ, दरीबडची परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.

चोरटा जतमध्ये आल्याची माहिती कोकरे यांना मिळताच त्यांनी त्याचा पाठलाग केला. तो एका वडाप गाडीमधून दरीबडची या आपल्या गावी आला. त्यावेळी कोकरे यांनी त्याच्यावर झडप घालून त्यास पकडले व दोरीने त्याचे हातपाय बांधले.

लोकांच्या मदतीने त्यास जत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.आटपाडकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃