twitter
rss

३५ वर्षे लॉज च्या खोलीत राहून पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारे सीनियर कॉलेज चे प्राध्यापक


के.एस्. अय्यर सर


(शेअर करून प्रत्येक शिक्षकापर्यंत हे प्रेरक व्यक्तिमत्व पोहोचवावे )

_*एक अविश्वसनीय सत्यकथा !*_

- हेरंब कुलकर्णी .

*के. एस. अय्यर.* आपलं सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वेचणारा एक निरलस
प्राध्यापक. पगारातला पैसा गरजेपुरताच ठेवून बाकीची रक्कम
विद्यार्थ्यांसाठीच त्यांनी खर्च केली. अय्यर सर मूळचे केरळचे; पण
महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी. गेली ३५ वर्षं त्यांचं वास्तव्य होतं
बारामतीत... एका लॉजमध्ये आठ बाय दहाच्या छोट्याशा खोलीत !
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेनं ते १९६८ मध्ये शिक्षकी पेशात
आले आणि गांधीजींच्या प्रभावातून त्यांनी ध्येयवाद अंगीकारला. अय्यर
सरांचं निधन पाच महिन्यांपूर्वी झालं. त्यांच्या तपस्वी जीवनाचं हे ओझरतं
दर्शन उद्याच्या (पाच सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्त...
श्रीकृष्ण रेस्टॉरंट, बारामती
रूम नंबर २०२
या रूममध्ये एक प्रवासी मुक्कामाला आला आणि त्यानं चेक आउट केलं ते थेट
३५ वर्षांनीच...

***


शेवटची ओळ नाही ना समजली? नाहीच समजणार... कारण ती आहेच अगम्य
त्या ओळीचा अर्थ असा आहे, की त्या हॉटेलात राहायला आलेला
प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षं राहिला... आठ बाय १० च्या इवल्याशा
खोलीत... आणि तो आयुष्यभर फिरत होता सायकलवर...!
का? परिस्थिती गरीब होती म्हणून का?
मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक
होते.
होय. गोंधळ उडावा असंच हे प्रकरण आहे. या प्राध्यापकांचं नाव के. एस.
अय्यर. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात त्यांनी सेवा
बजावली. त्यांचं पाच महिन्यांपूर्वी निधन झालं.
विद्यार्थिप्रिय प्राध्यापक (कै) के. एस. अय्यर.
पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकिरी वृत्तीनं जगणारा एक
प्राध्यापक असल्याचं कविमित्र संतोष पवार यांनी पूर्वी एकदा
त्यांच्याविषयी बोलताना मला सांगितलं होतं. मात्र, सर गेल्यावर
तपशीलवार माहिती कळली आणि ‘या माणसाला आपण का शोधलं
नाही,’ याची अपराधी बोचणी लागून राहिली. नुकताच बारामतीला
एका कार्यक्रमासाठी जाऊन आलो. अय्यर सरांनी ज्या तुळजाराम
चतुरचंद महाविद्यालयात काम केले होतं, तिथं आवर्जून गेलो. तिथल्या
उपप्राचार्य नेमाडे मॅडम, संजय खिलारे सर, कार्यालय प्रमुख महामुनी,
दीपक भुसे हे सगळे अय्यर सरांविषयी भरभरून बोलले. आपल्याकडं माणूस जिथं
राहतो, नोकरी करतो तिथं त्याच्याविषयी चांगलं बोलण्याची
सर्वसाधारणतः प्रथा नाही; पण अय्यर सरांनी सगळ्यांचं भरभरून प्रेम आणि
आदर मिळवला होता. माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या
अभ्यासू शिक्षकमित्रानं नंतर मग सरांची माहिती जमवण्यासाठी मला
खूप परिश्रमपूर्वक मदत केली.
आज प्राध्यापकांचे वाढते पगार, त्यातून येत चाललेली सुखासीनता,
त्यातून कमी होत जाणारी ज्ञानलालसा, मिळणाऱ्या पैशातून बदलत
जाणारी जीवनशैली आणि कमी होणारं सामाजिक भान यामुळं, अपवाद
वगळता, प्राध्यापकवर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते. अशा काळात
एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादानं अविवाहित राहतो, केरळमधून
महाराष्ट्रात येतो, आपल्या इंग्लिश अध्यापनानं विद्यार्थ्यांना वेड
लावतो आणि माणूस किती कमी गरजांमध्ये राहू शकतो, याचा वस्तुपाठ
जगून दाखवतो... हे सगळंच अविश्वसनीय वाटावं असंच आहे. इतकं मोठं वेतन
असूनही लॉजच्या आठ बाय १० च्या खोलीत एक कॉट, मोजकेच कपडे, एक
कपाट आणि त्यात पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं एवढाच या माणसाचा
संसार होता. त्यांनी आयुष्यभर सायकल वापरली. गरजा खूपच कमी. त्या
लॉजच्या वेटरला जोरी भेटले तेव्हा, अशी माहिती मिळाली, की सर
केवळ एक वेळ जेवत व एक ते दीडच पोळी खात असत. त्या वेटरला ते कधीही
एकेरी हाक मारत नसत. त्याला आदरानं वागवत. वेतन आयोग लागू
झाल्यावर ‘मला पगारवाढ देऊ नका, मला आवश्यकता नाही,’ असं त्यांनी
म्हणायचं आणि. मग सहकाऱ्यांनी चिडायचं, असा प्रकार होता. अय्यर
सरांच्या स्वभावात संघर्ष नव्हता. सर शांतपणे सर्वांचा आग्रह म्हणून पगार
नाइलाजानं स्वीकारत. पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नाइलाजाने
स्वीकारताना सरांनी फरकाच्या ५० हजार रुपयांच्या रकमेतून पुस्तकं
स्वीकारण्याची उलटी अट महाविद्यालयाला घातली. ही निःस्पृहता
होती.
सरांचा जन्म १९३३ मध्ये केरळात झाला. वडील सैन्यात होते. शिक्षण
राजस्थान, बंगालमध्ये झालं. सुरवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली.
त्यांच्या कुटुंबातले सगळे जण सुखवस्तू आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील
यांच्या प्रेरणेतून १९६८ मध्ये सर शिक्षकी पेशात आले. कऱ्हाडला नोकरी
केली. नंतर बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अखेरपर्यंत
राहिले.
त्यांच्यात हा साधेपणा व ध्येयवाद कशातून आला, याचा शोध घेतल्यावर
लक्षात आलं, की हा गांधीजींचा प्रभाव आहे. ते लहानपणी गांधीजींना
भेटले होते. त्यातून त्यानी गांधीजींचा खूप अभ्यास केला. गांधीवादी
मूल्यं नकळत त्यांच्या जगण्यात उतरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
आणि गाडगेबाबांनाही सर भेटले होते. डॉ. आंबेडकरांची अनेक भाषणं
त्यांनी ऐकली होती. त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी.
स्वातंत्र्यपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचं हे सगळं साधेपण, ध्येयवाद आला
होता.
बारामतीच्या ज्या लॉजमध्ये अय्यर सरांचं वास्तव्य होतं, ती खोली.
केवळ साधेपणासाठी कौतुक करावं असंही नव्हतं, तर सरांचं इंग्लिश विषयाचं
अध्यापन हे अत्यंत प्रभावी असे. सर समजा अगदी गाडी वापरून बंगल्यात
राहिले असते, तरी केवळ इंग्लिश विषय शिकवण्याच्या त्यांच्या
हातोटीमुळं ते हजारो विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहिले असते. त्यांच्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली तेव्हा शिक्षक
म्हणून सरांची काही वैशिष्ट्यं लक्षात आली. सर इंग्लिश साहित्यातले
नाटक-कविता-समीक्षा हे साहित्यप्रकार एकसारख्याच सामर्थ्यानं
शिकवू शकत. विशेषतः समीक्षा शिकवण्यावर त्यांचं खूपच प्रभुत्व होते.
घड्याळी तीन तास ते सलग शिकवत. घड्याळी आठ तास शिकवण्याचाही
विक्रम त्यांनी केला. एवढी वर्षं नोकरी होऊनही प्रत्येक वेळी वाचन करून,
नोट्स काढूनच ते वर्गात जात असत. त्या नोट्सच्या झेरॉक्स करून
विद्यार्थ्यांना मोफत वाटत. सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून
शिकवत नसत, अशी माहिती मिळाली. १९९५ नंतर निवृत्तीनंतर त्यांचं
कार्यक्षेत्र विस्तारलं. ते पुण्यात तीन दिवस, तर बारामतीत तीन दिवस
अध्यापन करत असत. सराचं निधन झालं, त्या महिन्यातही ८३ व्या वर्षी ते
तास घेत होते. असा आजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीही
निवृत्त न झालेला हा शिक्षक होता. पीएच.डी.चे शेकडो प्रबंध त्यांनी
तपासून दिले. नेट-सेट सुरू झाल्यावर त्यांनी मोफत मार्गदर्शन सुरू केलं.
इंग्लिशबरोबरच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खेळ या विषयांतही त्यांना
विलक्षण गती होती. क्रिकेटचे तर १० वर्षांपूर्वीचेही तपशील ते अगदी
सहज सांगत. सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करत. अगदी बॅंकेत, दवाखान्यात
प्रतीक्षा करावी लागे, तेव्हा तिथंही ते पुस्तक वाचत बसत. त्यांची
लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती. आपल्या मृत्यूनंतर ही
पुस्तकं विविध महाविद्यालयांना द्यावीत, असं सरांनी सांगून ठेवलं होतं.
दोन इंग्लिश पुस्तकं आणि संशोधनपर असंख्य प्रबंध त्यांच्या नावावर आहेत.
त्यांचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम पुत्रवत होतं. एमएच्या प्रत्येक बॅचनंतर ते
हॉटेलात निरोपसमारंभ आयोजित करत. मुलांना जेवण देत. नंतर ग्रुप फोटो
काढून ती फ्रेम स्वतःच्या खर्चानं प्रत्येक मुलाला देत. ते स्वतः
महाविद्यालयात असताना त्यांना निरोपसमारंभात भाग घेता आला
नसल्याचं त्यांना शल्य होतं. त्यातून हे आलं. विद्यार्थी हाच त्यांचा संसार
होता. पगारातली उरलेली सगळी रक्कम ते पुस्तकं आणि विद्यार्थ्यांच्या
फीसाठी खर्च करत असत. ‘सरांच्या मदतीमुळं माझं शिक्षण पूर्ण झालं,’ असं
सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय
स्वरूपाची मदत केली, हे सरांच्या निःस्पृह स्वभावामुळं कुणालाच कळलं
नाही; पण ती संख्या प्रचंड होती.
द ग्रामरियन फ्युनरल’ ही रॉबर्ट ब्राउनिंग यांची कविता अशा वेळी
आठवते. शिक्षकाच्या अंत्ययात्रेचं वर्णन त्या कवितेत आहे.

This is our master, famous, calm and dead
Borne on our shoulders
Long he lived nameless : how should spring take noteWinter would
follow?

अय्यर सरांचं मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडावंसं वाटतं. या देशातल्या
ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे; पण ऋषींच्या
वागण्यात संन्यस्त वृत्ती असायची. ज्ञान हीच त्यांची ओळख असायची.
कुठंतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्यानं दिपवणारी ही भारतीय
गुरुपरंपरा होती. अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते. भारतीय मनाला ही
संन्यस्त वृत्ती, ही फकिरी भावते. गांधीजींपासून ते राममनोहर लोहिया,
मेधा पाटकर, अण्णा हजारे यांच्यापर्यंत भारतीय मन या फकिरीतल्या
श्रीमंतीपुढं झुकतं! अय्यर सरांनी ही परंपरा पुन्हा जिवंत केली, जगून
दाखवली.

अय्यर सरांनी आपल्या या फकिरीच्या बीजावर प्रसिद्धीचं पीक काढलं
नाही. निष्कांचन, अनामिक राहून देवघरातल्या नंदादीपासारखे ते तेवत
राहिले आणि एक दिवस ही ज्योत निमाली. आपल्या आयुष्याच्या
सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा त्यांना
नव्हती. आजच्या चंगळवादी किंवा बांधिलकी विसरत चाललेल्या
शिक्षणक्षेत्रावर कोरडे ओढण्याचा या त्यागातून मिळालेला नैतिक
अधिकारही त्यांनी वापरला नाही. स्वतःच्या जीवनतत्त्वज्ञानावर
त्यांनी लेख लिहिले नाहीत की भाषणं केली नाहीत. ते फक्त जगत राहिले.
त्यांचा आदर्श गांधीजींच्या भाषेत ‘मेरा जीवन मेरा संदेश’ ! पण समाज,
शासन, विद्यापीठ म्हणून आपण अय्यर सरांची नोंद घेतली नाही. अय्यर सर
गेले. ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत त्यांनी शिकवलं,
त्या विद्यापीठानं तरी किमान या अनामिक जगलेल्या आणि मन आणि
धनसुद्धा अर्पण केलेल्या या दधीचि ऋषीचं चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक
प्राध्यापक-विद्यार्थ्यापर्यंत पोचवावं आणि ही प्रेरणा संक्रमित
करावी. अन्यथा आइनस्टाईन म्हणाला होता तसं ‘असा हाडा-मांसाचा
माणूस होऊन गेला, यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही

हेरंब कुलकर्णी

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_