twitter
rss

जिमनँस्टीक दीपा कर्मकारचा खेळाडू आणि विद्यार्थ्यांसमोर आदर्श


मायदेशी येताच दुसऱ्या दिवशी दीपानं दिली परीक्षा

मटा ऑनलाइन वृत्त । आगरतळा

रिओ ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्ट जिमनॅस्टीक प्रकारात 'तेजस्वी'
कामगिरी करून दीपा कर्मकार मायदेशी परतली. त्यानंतर
दुसऱ्याच दिवशी तिनं एमए (M.A) पॉलिटीकल सायन्सचा पेपर
दिला. आपल्या या कर्तुत्त्वानं तिनं खेळाडूंसोबतच
विद्यार्थ्यांसमोरही एक वेगळाच आदर्श घालून दिला.
अंतिम फेरीत दीपाचं पदकाचं स्वप्न थोडक्यात भंगलं. त्याचा
तिला दुःख झालं; पण याचा परिणाम अभ्यासावर होऊ न
देण्याचा निश्चय तिनं केला. रिओतून भारतात परतल्यानंतर
दुसऱ्याच दिवशी तिनं त्रिपुरा विद्यापीठाच्या मुक्त
अभ्यासक्रमांतर्गत एमए पॉलिटिकल सायन्सच्या दुसऱ्या
सेमिस्टरची परीक्षा दिली. मला लवकरच 'मास्टर्स डिग्री'
मिळेल, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तसंच यावेळी पदकानं
हुलकावणी दिली असली तरी, अधिक मेहनत करून २०२० च्या
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेन, असा निर्धार व्यक्त
करतानाच तिनं अभ्यासाकडे दूर्लक्ष न करण्याचे ठरवले आहे.
दीपा परीक्षा देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी केंद्रात हजर
राहिल्यानं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा
धक्काच बसला. खेळासाठी इतका वेळ देऊनही अभ्यासातील
तिची गोडी थोडीही कमी झाली नाही, अशा शब्दांत
अधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं. परीक्षेला 'दांडी'
मारण्यासाठी अनेक कारणं शोधणाऱ्या विद्यार्थ्यांनी
दीपाचा आदर्श ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

*रिओला नेली होती अभ्यासाची पुस्तके*

जिमनॅस्टीकच्या सरावाताच दीपाचा बराचसा वेळ जात असला
तरी, तिनं कधीही अभ्यासाकडं कानाडोळा केला नाही, असे
तिचे कुटुंबीय सांगतात. ऑलिम्पिकसाठी जाताना तिनं
आपल्यासोबत अभ्यासाची पुस्तकेही नेली होती. दोन
सामन्यांमध्ये जास्त दिवसांचे अंतर होते. यादरम्यान तिनं तिथं
परीक्षेची तयारी केली. तिच्या अभ्यासाबद्दल बोलताना
तिची आई गौरी कर्मकार सांगतात की, "ती मला नेहमी म्हणते
की, आई खेळ हा खेळाच्याच जागी आणि शिक्षण
शिक्षणाच्या जागी आहे. मला मास्टर्सची डिग्री
मिळवायचीच आहे."


विद्यार्थीही अवाक् झाले...

दीपाला परीक्षा केंद्रात पाहून विद्यार्थ्यांनाही
आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास
किंवा खेळ यापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात येते;
मात्र दीपानं दोन्ही गोष्टी एकाच वेळेस चांगल्या रितीनं
सांभाळता येतात, हेच या कृतीतून दाखवून दिलं. त्रिपुरातील
प्रत्येक विद्यार्थ्याला तिचा अभिमान वाटतो, अशी
प्रतिक्रिया तिच्यासोबत परीक्षा देणाऱ्या एका
विद्यार्थ्यानं व्यक्त केली.



*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_