twitter
rss

पुलेला गोपीचंद



पुलेला गोपीचंद खरंच कोण आहे 

पी व्ही सिंधुनी रियो ऑलिम्पिक मध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आणि मिळवलेल्या रजत पदकामुळे तिचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे. परंतु तिच्या ह्या यशाच्या मागे एका व्यक्तीचे मोठे कष्ट आणि योगदान आहे. ते म्हणजे तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद. खरं म्हणजे पुलेला गोपीचंद हे नाव भारतीय खेळप्रेमींना चांगलेच परिचयाचे आहे. २००१ साली इंग्लंड मध्ये झालेल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ते विजेते होते. हि स्पर्धा जिंकणारे ते दुसरे भारतीय आहेत. (पहिले प्रकाश पदुकोन).  परंतु त्यांची तेवढीच ओळख पुरेशी नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर गोपीचंदला कोका कोला कडून कोट्यावधीची जाहिरातिची ऑफर आली होती. कोका कोला हा मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो म्हणून ह्याने ती जाहिरात नाकारली. ज्या देशात सख्खी आई आपल्या मुलाला मॅगी, चिप्स, पिझ्झा, कोलाच्या "सकस" अन्नावर पालन पोषण करतांना दिसत आहेत तिथे गोपीचंदच्या ह्या निर्णयाचे कौतुक सोडा कोणी दखल पण घेतली नाही. पुढे गोपीचंद खेळतांना जख्मी झाले आणि त्यांना बॅडमिंटन खेळणे थांबवावे लागले. स्वतः खेळणे बंद केले म्हणून त्यांचे खेळाविषयीचे प्रेम कमी झाले नाही. त्यांनी निर्णय घेतला बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा.
आंध्रप्रदेश शासनाने गोपीचंद यांची खेळातील कामगिरी पाहून त्यांना स्वस्त दरात हैदराबाद मध्ये ५ एकर जमीन दिली होती. त्यावर त्यांना स्वतःची अकादमी उघडायची होती. एकूण १३ कोटी चा हा प्रोजेक्ट होता. पण एवढे पैसे आणायचे कुठून? कोणी मदतीला तयार होत नव्हते. इथे IPL चा काळा बाजार नव्हता. देशासाठी खरे खेळाडू निर्माण करायचे होते. गोपीचंद यांनी स्वता:चे राहते घर गहाण ठेवले.  त्यातून ३.५ कोटी भेटले. मग निम्मा गुत्ता प्रसाद नावाचे व्यापारी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी ५ कोटी देण्याची तयारी दाखवली. परंतु अट ठेवली बॅडमिंटन मध्ये भारताला एक पदक मिळवून देण्याची. गोपीचंद यांनी त्याची परतफेड केली २०१२ ला. जेव्हा साईना नेहवाल ला ब्रॉन्झ पदक मिळालं. आणि आता सिंधूच्या सिल्व्हर पदकानी त्याची दुप्पट व्याजासहित परतफेड केली. पण गोष्ट इथेच संपत नाही. इथून सुरु होते. १२ वर्ष गोपीचंद अकादमीत रोज सकाळी ४ वाजता जातात. आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाला सुरुवात करतात. ऑलिम्पिक मध्ये आणि स्पर्धेच्या आधी सुद्धा  प्रशिक्षकाने किती दक्ष राहावे हे गोपीचंद कडून शिकावे. सिंधूला गोपीचंद यांच्या परवानगी शिवाय देवाचा प्रसाद पण घेण्याची परवानगी नव्हती. ती फक्त गोपीचंद सोबत जेवण करायची. इतकी दक्षता प्रशिक्षकाने पाळली पाहिजे नाहीतर  केव्हाही शिष्याची गत नरसिंग यादव सारखी होऊ शकते.
जिथे आपल्याकडे ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी match fixing करून देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अशांना लोकांनी खासदार बनवून डोक्यावर घेतले. त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांना 'हिरो' बनविण्याचे प्रयत्न केले गेले. जिथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऑलिम्पिक खेळण्यासाठी गेलेल्या खेळाडूंना नाव ठेवून काही व्यक्ती स्वतः ची "शोभा" करून घेतात. तिथे कोणी पुलेला गोपीचंद हा निष्ठेने खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे हे कार्य आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख प्रपंच. आता तरी देश गोपीचंद सारख्या प्रामाणिक खेळाडूंना साथ देईल का?

  _*मोहित विनोद कुलकर्णी*_

📚📕📗📘📙📔📒📚


_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_