twitter
rss

विद्यार्थ्यांनी तयार केला सौरऊर्जेवरील ‘एसी’

म. टा. वृत्तसेवा, येवला

तंत्रनिकेतन अथवा अभियांत्रिकी कॉलेज म्हंटले की त्यातील भावी अभियंत्यांच्या अंगी असलेला जिज्ञासूपणा अन् विज्ञान युगातील वाटचाल लक्षात घेऊन शोधक वृत्तीने टाकलेले पाऊल हमखास समोर येते. येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी कॉलेजच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी शोधक वृत्तीतून सौरऊर्जेवर चालणारे 'एअर कंड‌िशनिंग उपकरण' साकारण्याची किमया केली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक अन् विजेची बचत करणाऱ्या उपकरणाची दखल या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये देखील घेण्यात आली आहे.
सर्वसामान्यपणे 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्ट‌िम'चा वापर करून 'एअर कंड‌िशनिंग'ची निर्मिती केली जात असते. त्यासाठी विविध रेफ्रिजरेंट वापरले जातात. मात्र, त्यातील काही रेफ्रिजरेंट हे पर्यावरणास घातक समजले जातात. तसेच त्यांची किंमत देखील अधिक असते. मात्र एसएनडीच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र या 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीम'चा वापर न करता इतर पर्यायांचा अभ्यास करून 'पेल्टीयर ईफेक्ट'वर आधारित एअर कंडीशनिंग उपकरण बनवले आहे. यामध्ये त्यांनी सौर उर्जा प्लेट, पेल्टीयर मॉडूल, पंखा, हिट शिंक, बॅटरी आदींचा वापर केला. या उपकरणाचा मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. तसेच सौर उर्जाचा वापर केल्यामुळे विजेची बचत होते, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सुमित खंडीझोड, खलिल शेख, बिपीन ढोकळे, तुषार सिंगर या यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने या उपकरणाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रबंध देखील प्रसिद्ध केला आहे. हे उपकरण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रा. एस. जी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. एम. ए. व्येंकटेश, प्रा. व्ही. जी. भामरे, प्रा. एस. पी. बडगुजर आदींनी या विद्यार्थ्यांच्या शोधवृत्तीचे तालुक्यात तसेच शैक्षणिक वर्तुळात कौतुक केले.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   
गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली