twitter
rss

मजूर दांपत्याची कन्या झाली "सी.ए"


- - सकाळ वृत्तसेवा

पाचोरा - मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. बेताची आर्थिक परिस्थितीही अशा ध्येयवेड्यांचा आड येऊ शकत नाही, याची प्रचिती खरजई (ता. चाळीसगाव) येथील मूळ रहिवासी असलेल्या संगीता कदम हिने दिली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) झालेल्या संगीताच्या यशाने मजुरी करणाऱ्या मायबापाच्याही कष्टाचे चीज झाल्याची यशोगाथा अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

खरजई (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र गोपीचंद कदम हे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नाशिकला वास्तव्यास आहेत. ते सेंट्रिंग काम करतात, तर त्यांच्या पत्नी बेबाबाई कदम धुणे, भांडी व स्वयंपाकाची कामे करून फाटक्‍या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतात. कदम दाम्पत्याला तीन मुली असून, या मुलीही शिक्षणासोबत आई-वडिलांना मदतीचा हात देतात.

*काम करून शिक्षण*

संगीता ही घरातील मोठी मुलगी. भाऊ नसल्याने आपण आई-वडिलांना मुलाप्रमाणे आधार द्यावा, या विचाराने प्रेरित झालेली. संगीताने प्रतिकूल परिस्थितीत आईसोबत कामाला जाऊन मिळेल तेवढ्या पैशांतून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. चांगल्या मैत्रिणींचा सहवास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तिने सी.ए. होण्याचा निर्धार केला आणि अभ्यासासाठी कंबर कसली. या कुटुंबातील एकमेव शिक्षित असलेले संगीताचे काका मो. ग. कासार (भडगाव) यांनी संगीताला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात संगीता सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली. संगीताची ही भरारी खरजई परिसरात कौतुकाचा विषय बनली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_