सोनाली नवांगुळच्या जिद्दीची कहाणी
*_सोनाली
नवांगुळचे आयुष्य सांगली जिल्ह्याच्या बत्तीस शिराळा या छोट्याशा गावात अगदी मजेत
चालू होते. सोनालीचे आईबाबा शिक्षक, लहान बहीण संपदा, असे चौकोनी कुटुंब...!_*
सोनाली नऊ वर्षांची
असताना,
तिच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि त्यामुळे तिच्या कंबरेतील व
पायातील बळ गमावले गेले! ‘पॅराप्लेजिक’ झाल्यामुळे ना कमरेखाली संवेदना, ना नैसर्गिक विधींवर नियंत्रण! - पूर्ण परावलंबी झाली ती.
तिच्या आयुष्याला विचित्र कलाटणी मिळाली ती उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमधे दीड
वर्षें गेली तेव्हा. तेथे सोनाली एकटीच असे. सोनाली म्हणते,
“वय वर्षे अवघे नऊ. पायाबरोबर घरही
सोडावे लागण्याचा तो अनुभव.... न कळत्या वयातला. सर्वांची ओळख व स्वभाव (माझ्या
त्या वेळच्या वयाचा विचार करता) जुळण्याआधीच, आपल्याला ‘असे काही’ झाल्याने सर्वांनी सोडून दिलंय, नि आता, मला घर नाही किंवा असेल तर हेच (डिस्चार्ज मिळेपर्यंत - हे
कळत नव्हतं तेव्हा) असं मनाला फार दुखावून गेलं. यथावकाश रडारड संपून, एकट्यानं, हॉस्पिटलमधील सर्वांसोबत राहण्याची सवय लागली.”
सोनालीला हॉस्पिटलमधून
डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती गावी, बत्तीस शिराळ्याला गेली. शाळेत जाणे शक्य नव्हते. आईवडील, बहीण यांची शाळा चालू होती. ते तिघेहीजण सोनालीची काळजी
मायेने घेत. पण तरीही तिला तिचे घर ‘अनोळखी’ वाटू लागले. सोनाली घरी बसून शाळेचा
अभ्यास करू लागली. ती फक्त परीक्षेपुरती शाळेत जाई. सोनाली घरून अभ्यास करूनच
दहावीमध्ये शाळेत पहिली आली. सोनाली घरच्या घरीच अभ्यास करून, इंग्रजी विषय घेऊन बी.ए. झाली. गंमत अशी की जी सोनाली शाळेत
जाऊ शकली नव्हती तिच्या एका गोष्टीचा समावेश द्वितीय भाषा मराठी असणाऱ्या इयत्ता
दहावीच्या विद्यार्थ्यांना गेली चार वर्षे पाठ्यपुस्तकात अभ्यासण्यासाठी म्हणून
आहे. स्थूलवाचनासाठीच्या यादीत इतर नऊ पुस्तकांबरोबर 'ड्रीमरनर' हे तिचे पुस्तक सुचवले आहे.
सोनाली बी.ए.च्या
शेवटच्या वर्षाला असताना, तिच्या एका मित्राने तिला प्रश्न विचारला, “आईबाबांनंतर तुझं काय?” सोनाली म्हणाली, “आजवर मी टाळत असलेला तो प्रश्न त्याने मला विचारताच, मी खूप अस्वस्थ झाले.”
सोनालीने विचार करून, आईवडील असतानाच ‘घर’ सोडण्याचा प्रयोग करून पाहण्याचे
ठरवले. सोनाली म्हणते, की “जिथं मी काहीच मनात येईल ते करू शकत नव्हते, ते ठिकाण म्हणजे ‘घर’ सोडणं सोपं होतं का? नाही. मी मला मनाने सिक्युअर ठेवणारी घर ही गोष्ट नि माझी
माणसं सोडणार होते. धाडसच होतं ते. पण ठरवलं अखेर....”
सोनाली कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स
ऑफ दि हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या उंचगाव येथील, अपंग व्यक्तींच्या शारीरिक गरजांचा खोलात विचार करून
बांधलेल्या ‘घरोंदा’ या वसतिगृहात राहण्यास गेली. स्वावलंबन – शारीरिक व आर्थिक
स्वावलंबन शिकण्यास म्हणून. ती गोष्ट आहे २००० सालची.
सोनालीच्या आयुष्याच्या
नव्या अध्यायाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. तेथे वेगवेगळी विकलांगता असणाऱ्या मुली
होत्या. लहानमोठ्या वयाच्या सात ते नऊ मुली एका खोलीत असत. सोनाली सर्वप्रथम
व्हीलचेअर वापरण्यास शिकली. लघवी-संडासवरील नियंत्रण शक्य नाही हे तिने आधी
स्विकारले होतेच, पण आता ती डायपर व टॉयलेटला जाण्यासाठीच्या वेळापत्रकाशी तिचा दिनक्रम
बांधण्यास शिकली. त्यात साधारण आठवडा निघून गेला. “त्या सर्व गोष्टींत गढून
गेल्यावर,
आईबाबांवाचून राहणे हा विचार कमी त्रास देऊ लागला” असे
सोनाली म्हणाली.
सोनालीने महिनाभरानंतर
मुंबई-पुणे येथील शासकीय कामे कशी करावीत याचा अनुभव घेतला. तिने तिच्या अंगी
प्रवासानिमित्तच्या रेल्वे रिझर्वेशनपासून खाणे-पिणे, औषधे इत्यादींचे नियोजन करण्याची सवयही बाणवून घेतली. पुणे, मुंबई, कोकणपट्टा, गोवा, हैदराबाद, दिल्ली, ओरिसा, भूज इत्यादी ठिकाणांपर्यंत प्रवास केला. गुजराथमधील भूज
येथील भूकंपानंतर तेथील अपंग लोकांना स्वावलंबनाने कसे जगायचे, यासाठीचे प्रशिक्षण देण्याकरता सात दिवसांचे एक शिबीर
आयोजित केले गेले होते, नसीमा हुरजूक यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी सोनालीही तेथे प्रशिक्षण
देण्यासाठी गेली होती. सोनालीच्या संवेदनक्षम आणि बोलक्या स्वभावामुळे तिचा अनेक
उत्तम माणसांशी संपर्क झाला. ती विविध अनुभवांनी पक्व होत असताना, तिला स्वतःची स्वतःला ओळख होऊ लागली. सोनाली म्हणते,
“माझ्या पळत्या, उत्सुक चाकांना भुई थोडी झाली!”
ती ‘हेल्पर्स’मध्ये काम
करत असताना, कधी
तिच्या नजरेला वर्तमानपत्र पडायचे. कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात, कधी फिल्म सोसायटीमध्ये दाखवले गेलेले उत्कृष्ट चित्रपट, कधी कला प्रदर्शन, वेगवेगळ्या चित्रपटगृहात गाजलेले चित्रपट, केशवराव भोसले नाट्यगृहात होणारी नाटके, त्यांच्या जाहिरातींविषयी; तसेच, कवितांचे-गाण्यांचे-व्याख्यानांचे कार्यक्रम –
ते सर्व वाचून सोनालीला
त्या सर्वांचा अनुभव घ्यावा असे वाटायचे. पण वसतिगृहात राहत असल्यामुळे तेथील
नियमांनुसार रीतसर लेखी परवानगी घेणे, त्यासाठी आधी अर्ज करणे, सांगितलेली वेळ पाळणे ही सर्व बंधने असायचीच; शिवाय, संस्थेच्या कामांव्यतिरिक्त अशा अवांतर कार्यक्रमांना
सातत्याने जाण्यास संस्था परवानगीही देत नसे. पैशाचा प्रश्न तर होताच. त्यामुळे
सोनालीची तगमग होई. विकलांगतेवर मात करून व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी सर्व सोयी
वसतिगृहात होत्या. पण त्यापुढील व्यक्तिमत्त्व विकास- त्यासाठी आवडीचे वाचन, सिनेमे, उत्तम कलाकृती आणि सादरीकरणाचा आस्वाद, त्यावर मारलेल्या पोटभर गप्पा आणि त्यातील चिंतनातून
रसिकांचे जगणे सोनालीला खुणावू लागले.
सोनालीने परत एकदा धाडस
करण्याचे ठरवले. आईबाबांशी त्याविषयी बोलली. वसतिगृह सोडून ती ‘स्वतःच्या घरात’
राहण्यास गेली. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील तळमजल्यावरील ब्लॉक आईबाबांनी
घेतला. सोनाली म्हणते,
“माझे पंख मजबूत करून, हे घरटं, माझ्या मनाच्या ताकदीनं विणणं हा आनंद मला उपभोगायचा होता.”
तिने स्वतःच्या घरासाठी
टाईल्स निवडणे, खोल्यांसाठीचा
रंग निवडणे, लाईटची
बटणे (जमिनिपासून अडीच फुटांवर), व्हिलचेअर फिरवण्यासाठी भरपूर जागा असलेले फोल्डिंग कमोडचे
प्रशस्त टॉयलेट कम बाथरूम, तेथे सोयीच्या उंचीवर नळ, कपड्यांसाठी बार, शिवाय त्यातच चेंजिंग स्पेस (त्यावेळी बेडवर झोपूनच कपडे
घालावे लागायचे), किचनमधील कट्ट्याची उंची, वॉशबेसिन, गॅलरीला दार, रॅम्प, सर्व व्हीलचेअरवर बसून ऑपरेट करता येईल असे! हॉलमधील
कॉम्प्युटर टेबलची उंची सुद्धा ... सोनालीने सारे काही, सर्व काही मनासारखे, कोणाची मदत लागू नये असे बनवून घेतले व तिने गृहप्रवेश १५
एप्रिल २००७ या दिवशी केला.
जे अपंग स्वावलंबनाने
जगू इच्छितात व जगू शकतात अशांसाठी सोनालीचे घर आदर्श आहे. अनेक लोक त्या घरास भेट
देतात,
फोनवरूनही सोनालीला माहिती विचारतात.
पहिली दोन वर्षे घर, नवे जग व काम हे शिकण्यात जातील, तेव्हा पैसे कमावणे अशक्यच ... म्हणून आईवडिलांनी
सुरुवातीची दोन वर्ष घरखर्च उचलावा मात्र तोवर ज्येष्ठ पत्रकार व गुरु उदय
कुलकर्णींच्या मदतीने ती नक्की मार्ग शोधेल असे तिने सांगितले. कॉम्प्युटर शिकली; त्याच्याशी दोस्ती केली. सोनालीला त्या संदर्भातील
व्यावसायिक कामे मिळू लागली. तिच्या स्वागत थोरात या मित्राने एक संधी तिला आणून
दिली. भारतातील पहिल्या नोंदणीकृत ब्रेल पाक्षिकाची – 'स्पर्शज्ञान' हे त्याचं नाव – उपसंपादक म्हणून जबाबदारी सोनालीने
स्वीकारली. सोनाली वृत्तपत्रात आधीपासून काहीबाही लिहित होतीच. उदय कुलकर्णी हे
सोनालीचे पत्रकारितेतील गुरु व एरवीही तिचा दृष्टिकोन स्वच्छ करणारे तिचे आत्मीय.
स्वागत थोरातने २००८
साली लुई ब्रेल यांच्या व्दिजन्मशताब्दीच्या मुहूर्तावर ‘स्पर्शज्ञान’चा दिवाळी
अंकही प्रसिद्ध केला. ‘स्पर्शज्ञान’चा २००९ सालचा दिवाळी अंक ‘जंगल, पर्यावरण, प्राणी-पक्षी जीवन’ या विषयांवर होता. त्याची पूर्ण
जबाबदारी सोनालीवर होती. त्या अंकाला राज्यस्तरीय तीन पुरस्कार लाभले. आता गेली
साडे पाच वर्षे ती 'रिलायन्स दृष्टी' या हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीही सदर लिहिते आहे.
सोनालीला अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनातील नवोदित कवींच्या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची
संधी मिळाली. त्याशिवाय सोनालीने स्वतःला अनेक संस्थांशी जोडून घेतले आहे. उदा.
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, बी चॅनल, देवल क्लब, कोल्हापूर महोत्सव समिती, करवीरनगर वाचन मंदिर इत्यादी. त्या संस्थांच्या सोनालीच्या
घरातून होणाऱ्या चर्चांमधून खूपशा कार्यक्रमांचे नियोजन अनौपचारिक रीत्या होत
असायचे. व्याख्यानमालांचे विषय व वक्ते ठरायाचे. नव्या जगात पाऊल रोवताना या
सगळ्याच गोष्टी महत्वाच्या ठरत गेल्या. आता जेव्हा क्षितीज आणखी विस्तारले आहे
तेव्हा ती नव्या गोष्टीत गुंतून आपला आवाका वाढवते आहे. अनेक नामवंत लेखिका, लेखक, कलाकार, उद्योजक अशी मित्रमंडळी सोनालीला लाभली आहेत. सोनाली
त्यामुळे फार बिझी असते. त्यातूनच 'ड्रीमरनर' या ऑस्कर पिस्टोरिअसच्या
(दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणारा धावपटू) पुस्तकाचा मराठी अनुवाद,
'स्वच्छंद' नावाचे चिंतनात्मक ललित लेखाचे पुस्तक, कविता महाजन संपादित 'भारतीय लेखिका' मालेतील सलमा नावाच्या तामिळ लेखिकेच्या कादंबरीचा 'मध्यरात्रीनंतरचे तास' नावाचा अनुवाद अशी कामे पुस्तकरूपाने बाहेर पडली आहेत.
गेल्या दोन वर्षात सोनालीने दोन पुस्तकांचे काम हातावेगळे केले आहे. पैकी एक आहे, मेधा पाटकरसंबंधी. वाढत्या वयातील मुलांना मेधाताईंची
जडणघडण कळावी यादृष्टीने हे पुस्तक आहे. दुसरे पुस्तक विंग कमांडर अशोक लिमये
यांची साहसी जीवनगाथा अशा प्रकारचे आहे. सोनालीने त्यासाठी खडकवासल्याच्या
‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’त जाऊन
सोनालीने अपंग
व्यक्तींसाठी कोठे कोठे व काय काय सुधारणा करणे गरजेचे आहे, याविषयीचे पत्र कोल्हापूरच्या महापौरांना लिहिले होते.
राजर्षी शाहू भवन, केशवराव भोसले नाट्यगृह, या ठिकाणी अनेक चांगले कार्यक्रम होतात. पण तेथे रॅम्प
नाहीत,
व्हीलचेअर जाईल अशा मोठ्या लिफ्ट नाहीत. तेथे लिफ्ट
बसवल्यास तिचा ग्रंथालयात जाण्यासाठी अपंगांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही उपयोग
होऊ शकेल. शाहू स्मारक भवनात व्हीलचेअर वापरणाऱ्यांना जाण्यासाठी व स्वच्छतागृहाचा
वापर करण्यासाठी योग्य सोयी हव्या याचा पाठपुरावा, सोनालीने ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे
केला. लक्ष्मीकांत देशमुख कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी ‘शाहू
स्मारक’मध्ये अपंगांसाठी काही ठिकाणी रॅम्प व टॉयलेट यांची सोय केली.
पराकोटीचे अपंगत्व
असूनही,
स्वावलंबी आयुष्य जगणारी व्यक्ती याचे रोल मॉडेल म्हणून,
‘राजर्षी शाहू युवा पुरस्कारा’साठी
सोनालीची निवड २०१० साली झाली. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजर्षी शाहू भवनात, रंगमंचावर जाताना, सोनालीला दोन/तीन जणांची मदत घ्यावी लागली होती. (कारण तेथे
अपंगांसाठी सोयी नाहीत.) म्हणूनच पुरस्कार प्रदान केल्यानंतर मानचिन्ह व पुरस्कार
देण्यामागची माया व आपुलकी यांचा स्वीकार सोनालीने केला, पण सोबत दिलेला वीस हजार रुपयांचा धनादेश सोनालीने तेथल्या
तेथे,
अपंगांसाठी या भवनात सुधारणा करण्यासाठी देऊन टाकला!
सोनालीला उपचार घ्यावे
लागतात त्या 'आधार
हॉस्पिटल'ने तिच्या सविस्तर पात्राची दाखल घेत आपल्या नव्या
प्रोजेक्ट मध्ये अपंग व्यक्तींना मैत्रीपूर्ण ठरतील अशा सर्व सोयी केल्या.
सोनालीचे ज्येष्ठ मित्र, हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष व व्यावसायिक बाळ पाटणकर यांनी आपल्या Atriya
या हॉटेलची एक खोलीही तिच्या विनंतीचा मान ठेवून अशीच
सोयीची करून दिली आहे. रोजच्या दिसण्या-पाहण्यातले असेच अनेक जण या सोयी
करण्यासाठी आपणहून पुढे येत आहे. असे मिसळून जाता आले तर हक्क नि सोयींसाठी
आपल्याच झगडावे लागते असे नाही तर आपल्याशी अनाम नात्याने जोडलेली चांगली माणसे
आपोआप बदलाला उत्सुक होतात असे सोनाली म्हणते!
सोनालीच्या कहाणीत
जिद्द आहेच, परंतु
त्यापुढे जाऊन प्रतिकूल परिस्थितीतदेखील व्यक्तिमत्त्वविकास साधण्याची व ते
सुसंस्कृत बनवण्याची ओढ आहे; ती विरळाच!
मुंबईचे लेखक सतीश
तांबे यांची ओळख सोनालीला गोव्यात राहणाऱ्या लेखक विश्राम गुप्ते यांनी करवून दिली. त्यांना वाटलं, ही आणखी स्वावलंबी व्हायला हवीय. तिची गरज ओळखून त्यांनी
आपले मित्र श्रीपाद हळबे व डॉ सुलभा हळबे
यांच्याकडे शब्द टाकला आणि सोनाली जॉय स्टिकवर ऐटीत हात ठेवत कोल्हापूरभर एकटीच भटकू
लागली. या ‘पॉवर चेअर’ने एक वेगळीच एनर्जी तिला दिलीय. ती सांगते,
''मनात आलं की उठून स्वतःचं स्वतः
बाहेर पडू शकणं ही गोष्ट किती मोठं स्वास्थ्य देते! आता जगणं अधिक रंगतदार नि
उत्फुल्ल वाटतंय!''
सोनाली
नवांगुळ,
📱9423808719.
🖊पद्मा कऱ्हाडे
📚📕📗📘📙📔📒📚
संकलन
गुरुवर्य
ग्रुप कवठेमहांकाळ सांगली