twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣9⃣

*या अधिकारी महिलेने ओळखले परिस्थितीचे गांभीर्य आणि वाचले शेकडो प्राण !*

_*नऱ्हे भागातील परिस्थिती बघून घरी जाणाऱ्या वृषाली पाटील या अधिकारी थबकल्या आणि तात्काळ संदेशांची देवाण-घेवाण करून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी लिहिलेला हा अनुभव अंगावर काटे उभे करतो. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात.*_

*By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 26, 2019 08:54 PM*

पुणे : बुधवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाःकार उडवला असताना पुणे जिल्हा, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेले कामही कौतुकास्पद आहे. त्यातच नऱ्हे भागातील परिस्थिती बघून घरी जाणाऱ्या वृषाली पाटील या अधिकारी थबकल्या आणि तात्काळ संदेशांची देवाण-घेवाण करून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी लिहिलेला हा अनुभव अंगावर काटे उभे करतो. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात......

              25 सप्टेंबर ची रात्र..! उपराष्ट्रपती महोदय यांचे विमानतळ आगमन कार्यक्रम आटोपून ऑफिसला निघाले. रस्त्यात पावसानं गाठलं. त्यात ट्रॅफीक जाम. ऑफिसला जावून काम पूर्ण करुन निघेपर्यंत पाऊस चांगलाच वाढला होता.. दरम्यान मोठ्या कॅटबरी आठवणीनं घेवून येण्यासाठी घरुन मुलांचा फोन झाला होता. रेनकोट घालून मी दुचाकीवरून सेंट्रल बिल्डिंग मधून रात्री ९ वाजता बाहेर पडले..

पावसाची खबरदारी म्हणून नदीपात्राच्या रस्त्याने न जाता मध्यवस्तीतून निघाले, पण पाऊस इतका जास्त होता की शहरात लक्ष्मी रोड, अलका टॉकीज, सिंहगड रोड परिसरातील रस्त्यांवरही गुडघाभर पाणी वाहत होते. मुलांच्या ओढीनं भर पावसात भिजत कसा-बसा सिंहगड रोड पार केला. एव्हाना पावसानं रुद्रावतार धारण केला होता. नवले ब्रीजला आल्यावर हायवे वरुन घसरतीने पावसाच्या पाण्याचा लोंढा इतका वाढला होता की सर्व्हीस रोडवरुन नऱ्हे कडे वळताना या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाते की काय अशी भीती वाटू लागली.. परंतू सगळी सकारात्मक शक्ती एकवटली आणि गाडीचा वेग वाढवून क्षणार्धात नऱ्हे कडे वळले आणि सुटकेचा निश्वास टाकला. पुढे उजव्याच बाजूला नवले हॉस्पिटलच्या आवारात पोलीस चौकी दिसली. खरं तर ती रोजच दिसते. पण आजची परिस्थिती वेगळी होती. आपण सहीसलामत बाहेर पडलो पण अन्य कुणावर असं संकट येऊ नये, म्हणून काहीतरी करायला हवं, असं वाटलं आणि पोलीस चौकीजवळ जावून थांबले. चौकीत असणा-या पोलीसांना परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं आणि तात्काळ नवले ब्रीजला जाण्याबाबत विनंती केली.. त्यांनीही लगेच कार्यवाही सुरु केल्यामुळं बरं वाटलं.
आता 5 मिनिटांत घरी पोहोचणार.. असा विचार करत मुलांसाठी कॅडबरी घ्यायला दुकानं पाहत गाडीवरुन पुढं जात होते. परंतु रात्रीचे साडे दहा वाजले होते, त्यामुळं आतापर्यंत सगळी दुकानं बंद झालेली.. एक वळण घेऊन पुढं गेलं की घरी पोहोचणार, असा विचार करते न करते.. तोच समोरून गाड्या लगबगीनं उलट दिशेनं वळताना दिसल्या. पाहते तर या वळणावर असणारा ओढा ओसंडून वाहत होता. एवढंच नाही तर रस्त्यावरुन कडेनं 4 ते 5 फूटांवरून दोन्ही बाजूला 10 ते 12 फूट  बाहेर येवून जोराने ओढ्याचं पाणी वाहत होतं. गाडी बाजूला लावणार इतक्यातच पाण्याची पातळी वाढू लागली, त्यामुळ उंच ठिकाणी गाडी लावली आणि डिकीतील फक्त मोबाइल घेऊन मी पावसातून आणि लोकांच्या गर्दीतून या ओढ्याच्या प्रवाहाजवळ आले. लगेचच 4-5 फोटो काढले आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त सौरभ राव, माहिती उपसंचालक राठोड साहेब, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांना पाठवून याठिकाणी नागरिक अडकल्याचा संदेश पाठविला.
धोधो कोसळणाऱ्या पावसात फोटो आणि मदतीसाठीच्या संदेशांची देवाण - घेवाण सुरु असतानाच मोबाइलने आयत्यावेळी दगा द्यायला सुरवात केली. माझाही आवाज जाईना आणि मलाही कोणाचा आवाज ऐकू येईना. पावसाचा जोर वाढतच असल्यामुळं 70 ते 80 नागरिक, 12-13 चारचाकी 30 ते 35 दुचाकी एकाच ठिकाणी अडकून होत्या. मध्यरात्र झाली होती, शिवाय वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळं सगळीकडं काळोख पसरला होता. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून माहिती देणं गरजेचं होतं. याठिकाणी थांबलेल्या श्री.जाधव आणि सुश्री अहिरे या दोघांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम साहेब, विठ्ठल बनोटे सर, नायब तहसीलदार शेळके, पोलीस प्रशासन यांच्याशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दरम्यान दोन व्यक्ती, चारचाकी आणि दुचाकी  गाड्या ओढ्यात वाहून गेल्याचं कळलं. बराच वेळ अडकून पडल्यामुळं नागरिक पाण्यातून पुढं जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं आतून मी घाबरलेली असताना अडकलेल्या नागरिकांना मात्र "पाण्याचा प्रवाह कमी होईल, थोडा वेळ वाट पाहूया. पाण्यात उतरू नका. प्रशासनाचे अधिकारी लवकरच पोहोचतील," असा दिलासा देत होते.
तेवढ्यात पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच ग्रामविकास अधिकारी गावडे सर, महसुल विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले आणि मदत व बचाव कार्य जोमाने सुरु झाले. त्यामुळे नागरीकांची भीती कमी झाली आणि सुटकेचा निःश्वास टाकला. गाडी बाजूला लावून गुडघाभर पाण्यातून वाट काढत दुसऱ्या रस्त्यानं मी मध्यरात्री 1.30 च्या दरम्यान घराजवळ पोहोचले. माझ्यासाठी हा अनोखा व वेगळा अनुभव होता..

--वृषाली पाटील
सहायक संचालक(माहिती),
विभागीय माहिती कार्यालय,
पुणे.

https://m.lokmat.com/pune/officer-recognized-seriousness-flood-and-saved-hundreds-lives/?fbclid=IwAR026rQLI_bdgtWgRmLnSQqZVypL0kQwxUcrOZvWUYRw9Y406yRqa_pPjsg

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_