twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣2⃣

*🍲अहमदपूरचं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि पीएचडी 🎓*

_*✒बाळासाहेब राजे*_

      लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या. एम. ए., बी. एड्, सेट उत्तीर्ण, पेट उत्तीर्ण या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवितो म्हणून त्याचं कौतुक करावं की उच्चशिक्षित असूनही वशिलेबाजी आणि पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो. पेट ही पी. एच. डी.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन वसंत आता स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात 'हिंदी - मराठी दलित आत्मकथाओं का तुलनात्मक अध्ययन' या विषयांवर पी. एच. डी. करीत आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा जिद्दीचा असून हे सारं त्यानं स्वतःच्या बळावर केलंय हे विशेष.
      अठरावविश्वे दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. वसंत हे अकरावं अपत्य असून शेंडेफळ आहे. अकरा पैकी चार बालके दगावली. उरलेल्या सात पैकी चार भाऊ, तर तीन बहिणी. वडील हिरामण लामतुरे हे लाकडं फोडायचे तर आई गयाबाई निंदण, खुरपण, गवत कापणे यासारखी शेतमजुरीची कामं करायची. कळत्या वयात शाळेत जाणारा वसंत केसाला लावायला खोबरेल तेल हवं म्हणून हट्ट करी, तेव्हा "तू मोठा झालास की आपण खोबरेल तेल आणू" म्हणून आई त्याची समजूत घालत असे.
      बालवयातल्या गरिबीच्या चटक्यांनी वसंतला अकाली प्रौढत्व आलं. पैसा कमावल्याशिवाय कुटुंबाचा गाडा ओढणं अशक्य आहे, हे ओळखून त्यानं आयटीआयचा कोर्स पूर्ण करताच पुणं गाठलं. पुण्यातल्या एका कंपनीत तुटपुंज्या पगारावर फिटरचं काम करीत असताना त्याच्यासमोर झालेल्या अपघातात एका बंगाली कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. दुर्दैवाने आपलाही असाच अपघात झाला तर आपल्या आईवडिलांवर कोणती आपत्ती कोसळेल, म्हणून त्यानं पुणं सोडलं. आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
      सकाळी सहा वाजल्यापासून घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकायची, सव्वा आठ ते दोन वाजेपर्यंत कॉलेज करायचं, कॉलेजहून आल्यावर पाच वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, पाच ते आठ वाजेपर्यंत पिग्मी एजंट म्हणून काम करायचं आणि रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत अभ्यास करायचा, पुढची आठ वर्षे हीच त्याची दिनचर्या झाली. खेळकर वृत्तीचा वसंत घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकण्याच्या कामाला 'Morning Walk With Earning' असं म्हणतो. वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर तो अभ्यासाचे पॉईंट लिहिलेला कागद डकवित असे नि ते पॉईंट घोकत घोकत सायकलला पायंडल मारीत असे.
      वसंत कॉलेजला शिकत होता तेव्हाचा प्रसंग आहे हा. बऱ्याचदा पुस्तकं, वह्या घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसत. त्यावेळी अहमदपूरच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर असलेला इसम डॉक्टरचे कपडे इस्त्रीसाठी घेऊन येत असे. त्यावेळी एका ड्रेसच्या इस्त्रीला पाच रुपये दर होता. वसंतने त्या इसमाला पटविले. एका ड्रेसमागे एक रुपया कमिशन देऊन वसंत स्वतःच इस्त्री करू लागला आणि त्याने पैशाचा प्रश्न काही अंशी का होईना सोडविला.
            एके दिवशी वसंतच्या मनात विचार आला, रिक्षाचा नंबर यायला दोन तास वाट पहावी लागते आणि एका फेरीत कमाई होते फक्त वीस-तीस रुपये. याऐवजी आपण छोटंसं हॉटेल सुरु केलं तर? त्याने आपला मनोदय आईला सांगितला. त्याची आई म्हणाली, "वसंता!, इमानदार माणसाच्या हातातल्या मातीला सोन्याचं मोल असतंय. तू इमानाला जाग. तुला काई कमी पडणार न्हाई." पदवीचं शिक्षण घेताना दहा-बारा विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करून डबा पुरविण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच, त्याचा उपयोग या व्यवसायात खूप झाला. बी.ए., राज्यशास्त्र व हिंदीत एम. ए., बी. एड् अशा चढत्या क्रमाने तो शिकत राहिला. अहमदपूरपासून जवळच असलेल्या माळेगावला मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची मोठी यात्रा भरते. नेमकं या यात्रेच्या वेळी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्याकडेची अनेक छोटी छोटी दुकानं, टपरीवजा हॉटेलं उठविली गेली. आता काय करायचं हा प्रश्न आ वासून त्याच्यापुढे होता.  त्यानं आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतलं आणि माळेगाव गाठलं आणि यात्रेत खिचडी भज्याचं हॉटेल थाटलं. यात्रेत बऱ्यापैकी गिऱ्हाईक होतं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खपल्यावर चार पैसेही गाठीशी उरत. याच वेळी एम. ए.चं सेमिस्टर चालू होतं. कसाबसा एक पेपर देऊन त्यानं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यात्रेच्या धावपळीत त्याचा अभ्यासही झाला नव्हता आणि काम नाही केलं तर घर कसं चालणार? चौथ्या सेमिस्टरला तो सर्व पेपरमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसानंतर पुन्हा अहमदपूरमध्ये त्याचं टपरीवजा हॉटेल सुरु झालं. पुढे तो हिंदी विषयाची सेट परीक्षाही उत्तीर्ण झाला. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळते. सेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असते.
चार पुस्तकं शिकली, एक दोन पदव्या मिळविल्या की नोकरी मिळेल याची खात्री हल्ली कुणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारखी आठ दहा शहरं सोडली तर इतर ठिकाणी रोजगाराच्या नावानं बोंबच आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत शिकून धड शिक्षणात अव्वल नाही आणि कष्टाची कामं करायला लाज वाटणारी पिढी वर्षानुवर्षे तयार होतेय. कदाचित तत्कालीन इंग्रज सरकारनं लागू केलेली कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती अंधपणे राबवित असल्याचा हा परिणाम असावा. सुशिक्षित बेरोजगार नावाचं न दिसणारं लेबल लावून हे तरुण आपल्या आसपास फिरताना आढळतात. यातले बरेच व्हाट्सअॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पडीक राहून आपली हुशारी वाया घालवीत असल्याचे चित्र सामान्य आहे. वसंतच्या गाड्यावरचं 'नोकरी लागत नाही म्हणून काय झालं? काम करताना लाजायचं नसतं.' हे वाक्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खूप काही सांगतं. वसंतच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटरमध्ये दररोज सत्तर ते ऐंशी किलो तांदळाची खिचडी शिजविली जाते. गरमागरम भजी आणि वडापावचा हिशोब वेगळाच. एका ग्रॅज्युएट तरुणाच्या खिचडी सेंटरमुळे दहाबारा लोकांना नियमित रोजगार मिळाला आहे.
      दोनतीन ठिकाणी प्राध्यापक पदाच्या मुलाखती दिल्यावर वसंतला चांगलाच अनुभव आला. दोन ठिकाणी हा माणूस खालच्या जातीतला आहे, अधेमध्ये काही भानगड झाली तर उगाच अॅट्रोसिटीचं लफडं नको म्हणून त्याच्या पात्रतेला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आणखी एका शिक्षण संस्थेत असलेला डोनेशनचा आकडा पाहून सेट उत्तीर्ण असण्याला काडीचीही किंमत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचं वसंत सांगतो.
      राजकारण हे मानवी जगण्याचं अविभाज्य अंग आहे. त्यापासून कुणीही अलिप्त राहू शकत नाही. वसंतही राजकारणाच्या धामधूमी पासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. अहमदपूर नगरपालिकेच्या मागील दोन निवडणुका उच्चशिक्षित वसंतानं लढविल्या. मात्र शिक्षणातली गुणवत्ता त्याला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजकारणात निव्वळ गुणवत्ता असून चालत नाही खिसाही गरम असावा लागतो, याचं भान आता त्याला आलं आहे.
            वसंतची आई गयाबाई निरक्षर आहे, काबाडकष्ट करून तिनं त्याला शिक्षण दिलं, कळत्या वयाचा झाल्यापासून वसंत स्वतः कमावून शिक्षण घेतोय. बिकट परिस्थितीत एखाद्याचं शिक्षण पूर्ण झालं नसतं, धडपड करून शिक्षण घेतल्यावरही एखाद्याने डोनेशनचा आकडा पाहून नोकरीचा नाद सोडला असता. पण वसंतचा निर्धार पक्का आहे. कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत त्या अडचणींचा डोंगर पार करून तो आता पीएचडी करतोय. त्याला प्राध्यापक व्हायचंय. निरोप घेताना वसंतची आई पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली, "माजा वसंत खरंच मास्तर व्हईल का?"

                                        - *✒बाळासाहेब राजे*

दि. १३ जानेवारी २०१७, शनिवार

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣1⃣

*🛰इस्रोनं शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला*

By-महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated Jan 12 2018, 09.52AM IST

हैदराबाद:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज नवा इतिहास रचला. इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन ३१ उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीहरीकोटा येथून आज सकाळी ९.२९ वा पीएसएलव्ही सी ४०/कार्टोसॅट २ मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
पीएसएलव्ही सी ४० सोबत भारताने तब्बल ३१ उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये ३ भारताचे तर २८ उपग्रह अन्य ६ देशांचे आहेत. या सहा देशांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी ३९ हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. या अपयशानंतरही इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी ४० या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण केलं.

दरम्यान, भारताने स्वत:चा एक १०० किलोचा मायक्रो आणि एक १० किलोचा नॅनो उपग्रह आज आंतराळात सोडला आहे. याशिवाय भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट २ सीरिज उपग्रह. हा उपग्रह ७१० किलोग्रॅमचा असून कार्टोसॅट २ हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे.

आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.
कुणाचे किती उपग्रह सोडले

>> अमेरिका- १९

>> दक्षिण कोरिया - ५

>> कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी एक

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣0⃣

*🏔मुलांच्या शाळेसाठी त्याने डोंगर हलवला!*

By-Maharashtra Times | Updated Jan 11, 2018

वृत्तसंस्था, फुलबनी:

असलेल्या शाळा बंद करून मुलांचं शिक्षण वाऱ्यावर सोडण्याचे उद्योग राज्यात सुरू असताना, ओडिशामध्ये मात्र मुलांच्या शिक्षणाचं ‘वेड’ डोक्यात घेतलेल्या जालंधर नायक यांनी चक्क डोंगर हलवलाय! मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर अडथळा ठरणारा गुमसाही गावाजवळचा डोंगर फोडून फुलबनी शहरापर्यंतचा रस्ता त्यांनी एकट्याने तयार केला आहे. बिहारमधील दशरथ मांझी या अवलियानेही असाच एकट्याने २२ वर्षे डोंगर फोडून रस्ता तयार केला होता!

जिल्हा प्रशासनानेही या कामाची दखल घेतली असून आता त्यांना ‘मनरेगा’ योजनेखाली या कष्टांचा मोबदला दिला जाणार आहे. ‘नायक यांच्या कामाबद्दलची निष्ठा आणि त्यांनी त्यांसाठी घेतलेले प्रचंड कष्ट पाहून मी भारावले आहे,’ असे जिल्हाधिकारी वृंदा डी. यांनी सांगितले.

दोन वर्षे सतत कष्ट करून त्यांनी डोंगर फोडून ८ किमी रस्ता तयार केला. आता पुढच्या तीन वर्षांत आणि ७ किमी रस्ता तयार करण्याचं नायक यांनी पक्कं ठरवलं आहे. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या ४५ वर्षांच्या नायक यांना कधी शाळेचं तोंडही पाहता आलं नाही; म्हणून आपल्या तीन मुलांना कितीही अडथळे आले तरी शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासाठीच हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन शाळेची वाट अडवून उभ्या असणाऱ्या पहाडावर घाव घालायला त्यांनी सुरुवात केली. स्थानिक वर्तमानपत्रात त्यांच्या कामाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं. कंधमाल उत्सवात त्यांचा गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, गावात शाळा, इतर सुविधा नाहीत म्हणून गावातले लोक आधीच गाव सोडून गेले आहेत. नायक यांनी मात्र चक्क शाळाचं गावाजवळ आणली आहे!

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣9⃣

*हनुमानउडी*

*उडी* - लांब आणि उंच उडी...एक वैयक्तिक स्पर्धाच...
पण,याचा आपल्या जीवनाशी संबंध जोडला तर...
*लांब उडीचच बघा ना...*
लांबून पळत पळत यायचं आणि उडी घ्यायची......
जो जेवढया लांबून पळत येतो तेवढयाच  लांब त्याची उडी जाते....अर्थात जो जादा कष्ट करतो,जो जादा संघर्ष करत,त्याला यश देखील जादाच मिळतं...
अशाचप्रकारे परिस्थितीशी झगडून  *हनुमानउडी* मारणाऱ्या,
ज्या मातीने जगाला कबड्डी हा खेळ दिला,याच खेळाशी संबंधित एका मराठमोळ्या तरुण खेळाडूची ही संघर्षमय कथा....

*_ही कथा आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका मागासवर्गीय कुटुंबातील एका मेहनती तरुणाची..._*

18 डिसेंबर 1992 रोजी एका अल्पभूधारक आणि गरीब,तालमीशी संबंधित कुटुंबात या तरुणाचा जन्म झाला.
कुस्तीची आवड नसल्याने,वयाच्या 13 व्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली.
आपल्या 6 फूट उंचीचा पुरेपूर वापर करून त्याने कबड्डीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला.

2013 साल उजाडलं ते दुःखाचा डोंगर घेऊनच...याच वर्षी या तरुणाने आपल्या जन्मदात्याला गमावलं... *वय वर्षे 21* कब्बडीत करियर घडवायचंय तो पर्यंतच घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली.

हातात खुरपे घेऊन हा तरुण आता दुसरीच्या शेतावर कामाला जाऊ लागला... यावेळी या तरुणाच्या काकांनी त्याला मुंबईत जाऊन कबड्डीचा सराव करण्याचा सल्ला दिला.शिवाय प्रोत्साहन ही दिले..आणि हाच या तरुणाच्या जीवनातील खरा *टर्निंग पॉईंट* ठरला.
तो तरुण मुंबईला आला.मन लावून मेहनत करू लागला...

राष्ट्रीय पातळीवर निवड होण्यासाठी हा तरुण जीव लावून मेहनत करू लागला.पण,एक आक्रीत घडलं. *SAI (स्पोर्ट्स ऑफिरिटी ऑफ़ इंडिया)* ने या तरुणाला आणखी मेहनत कर असे सांगून त्याची निवड केली नाही.
हा तरुण या पराभवाने खचला नाही.मोठया जोमाने आणखी तयारी केली.प्रयत्नांची पराकाष्ठा केली.दुसऱ्या वेळी तो यशस्वी झाला.

महिंद्रासाठी खेळताना एका सामन्यात या तरुणाने *हनुमान उडी* मारून 7 पैकी 6 खेळाडू बाद करूनवेगळा इतिहास निर्माण केला.ही  हनुमान उडी त्या तरुणाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेली ते खाली न येण्यासाठीच....
2014 साली *प्रो-कबड्डी* स्पर्धेत या तरुणाला *दबंग दिल्ली* ने आपल्या संघात सामील करून घेतले. तो तरुण स्टार रायडर म्हणजेच.... *काशीलिंग आडके उर्फ काशी.*

हा काशी PKL चा एकमेव असा खेळाडू आहे,ज्याने दोन्ही सिजन मध्ये 100 पेक्षा अधिक पॉईंट मिळविले आहेत....

*मित्रांनो काशी चा प्रवास खरंच प्रेरणादायी असा आहे.जर त्याने काकांच ऐकून मुंबईला जाण्याची हनुमानउडी मारली नसती तर......आज काशीलिंग आडके हे नाव आपल्या ओठी असते का???परिस्थिती समोर न झुकता,अपयशाला न जुमानता प्रयत्नांची पराकाष्ठा केली.*
म्हणूनच, मला काशी एक *यशवंत* वाटतो.
आपल्यापैकी बरेच जण वेळेवर हनुमानउडी मारायला घाबरतात आणि वेळ निघून गेल्यावर मात्र रडत बसतात....आयुष्यात संधी पुन्हा पुन्हा येत नाही.तेंव्हा वेळेवर हनुमानउडी माराच.

आता इथेच थांबतो.उद्या भेटू संकटावर हनुमानउडी मारून यशस्वी होणाऱ्या आणखी एका *यशवंता* सोबत.
तोपर्यंत नमस्कार..

*✒लेखन:-श्री संदीप पाटील सर,*
*मु.पो.दुधगाव.ता.मिरज,जि.सांगली.*
*9096320023*

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣7⃣

*👨🏻‍🏫 ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार,*

*_मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण_*

Monday, 25 Dec,2017

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तेही जिल्हा परिषदेतील शाळेत ई-लर्निंगची सुविधा मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या संमेलनाचे आकर्षण ठरले. वडवणी तालुक्यातील देठेवाडी ही दोन शिक्षकांची शाळा. रवींद्र गायकवाड हे शाळेचे मुख्याध्यापक ध्येयवेडे शिक्षक आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही शाळा. या शाळेतील विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व शासनाच्या निधीअभावी ई-लर्निंगचे शिक्षण व टॅब कसे मिळणार? ही समस्या गायकवाड गुरुजींना भेडसावू लागली.
त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या लग्नात सासरवाडीकडून मिळालेली अंगठी मोडली. या अंगठीतूनही ई-लर्निंगचा खर्च निघेना म्हणून त्यांनी भविष्य निर्वाह निधीची ५० हजारांची रक्कम कर्जरूपी उचलली व या माध्यमातून शाळा ई-लर्निंग केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब दिले. इतकेच नाही तर देठेवाडीची शाळा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर होती.

या शाळेला जायला डोंगरदर्‍याचा रस्ता. गायकवाड गुरुजी शाळेत जाता-येता रस्त्यावरील दगड उचलून दूर करण्याचे काम करीत. या ध्येयवेड्या शिक्षकाची कहाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर आली आणि त्यांनी आजच्या साहित्य संमेलनात रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक भरपेहराव आहेर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. एक अंगठी विद्यार्थ्यांसाठी मोडणार्‍या या गुरुजींना यावेळी दोन अंगठ्या भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या विशेष सत्काराने उपस्थित सर्वच पाहुण्यांनी गायकवाड गुरुजींच्या कार्याचा गौरव सातत्याने आपल्या भाषणातून केला.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣6⃣

*जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!*

*_प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे._*

By: वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई .
Tuesday, 5 December
      
मुंबई : प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे. या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करुन थेट इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळवली आहे

प्रथमेशने पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण अगदी साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत केलं. त्यांनतर कॉलेजमध्ये प्रवेशाची वेळ आली त्यावेळी त्याने आपली आप्टिट्यूड टेस्ट दिली आणि त्यात त्याला कला शाखेत प्रवेश घेण्याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आलं. मात्र, आपल्याला इंजिनिअरींग करायचं असा प्रथमेशनं आपल्या आई-वडिलांना सांगितलं.

आपली जिद्द कायम ठेवत प्रथमेशनं इंजिनिअरींगचं शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याने टाटा, एल अँड टी या सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केलं.पण त्यावर समाधान न मानता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसोबत इस्रोच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासही प्रथमेशने सुरु ठेवला.
मे महिन्यात जेंव्हा 16000 विद्यार्थ्यांमधून प्रथमेशची निवड इस्रोमध्ये झाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जे स्वप्न प्रथमेशनं पाहिलं होतं ते त्यानं सत्यात आणलं होतं. प्रथमेश हा मुंबईतून पहिला वैज्ञानिक आहे जो इस्रोमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣4⃣

_जागतिक एड्स दिन विशेष_

*HIV वर मात करणाऱ्या रत्ना यांना थेट स्वित्झर्लंडचं निमंत्रण*

_साभार - अभिजीत कांबळे, BBC News Marathi._

लग्नानंतर काही वर्षातच नवऱ्याचा HIVने मृत्यू झाला. त्यानंतर 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्यानं दम तोडला. या आघातामुळे मग त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण नशीबात काही औरच लिहिलं होतं.

आज त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली आणि सर्वांना अचंबित केलं. ही कहाणी आहे रत्ना जाधव यांची.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातलं टाकळी खंडेश्वरी नावाचं एक गाव. इथल्या रत्ना जाधव यांचं वयाच्या 15व्या वर्षीच एका वाहनचालकाशी लग्न झालं.

आपल्या नवऱ्यासोबत त्यांनी पनवेलला संसार थाटला. पण लग्न होऊन दीड वर्ष झालं नाही, तोच त्यांचे पती सारखे आजारी पडू लागले. त्याचवेळी रत्ना गरोदर राहिल्या.

नवव्या महिन्यात रत्ना बाळंतपणासाठी माहेरी आल्या असताना तिकडं पनवेलमध्ये नवऱ्याची तब्येत आणखी खालावू लागली. दरम्यान रत्ना यांना मुलगा झाला.

मुलगा काही आठवड्यांचा असतानाच रत्ना यांची सासू त्यांच्याच्याकडे आली आणि रत्ना यांना घाईघाईनं पनवेलला घेऊन गेली.

पनवेलला पोहोचल्यावर रत्ना यांना धक्काच बसला. नवऱ्याच्या आजारपणामुळे केलेल्या तपासणीत त्याला HIV असल्याचं उघड झालं होतं.

रत्ना हादरूनच गेल्या. आता त्यांचीही HIV चाचणी करावी लागणार होती.

रत्ना यांची मुंबईत तपासणी झाली आणि दुर्दैवानं त्यांची भीती खरी ठरली. रत्नालाही नवऱ्यापासून HIVचं संक्रमण झालं होतं. तिथून सुरू झाला एक अत्यंत वेदनादायी आणि खडतर प्रवास.

रत्ना यांच्याच तोंडून ऐकायचं तर, "आम्हा नवरा-बायकोला HIV असल्याचं कळल्यावर पहिला धक्का बसला तो पनवेलमध्ये. आम्ही ज्या सोसायटीत राहत होतो ती सोसायटी सोडावी लागली. आमच्या आजाराबद्दल कळल्यानंतर काही लोकांनी आम्हाच्या तिथं राहण्याला आक्षेप घेतला."

"मग आम्ही माझ्या नवऱ्याच्या बीड जिल्ह्यातल्या गावी आलो. तिथं काही दिवस राहिलो नाही तोच गावातल्या लोकांचा त्रास सुरू झाला. सासरच्यांनाही वाटू लागलं की आम्ही त्यांच्यासोबत राहायला नको. शेवटी आम्हाला गाव सोडून शेताचा आसरा घ्यावा लागला."

"हळूहळू नवऱ्याची प्रकृती आणखीनच ढासळू लागली. एका दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनं हात लावायलाही नकार दिला. अखेर 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला," असं रत्ना सांगतात.

नवरा गेला आणि मग सासरच्यांनी रत्ना यांना त्यांच्यासोबत राहू दिलं नाही. म्हणून त्या माहेरी आल्या आणि आईसोबत राहू लागल्या.

"पण आईच्या मैत्रिणींनी तिला HIVबद्दल भीती घातली, 'हिला सोबत ठेवलं तर तुम्हालाही आजार होऊ शकतो'," रत्ना सांगतात.

"मग आईलाही भीती वाटू लागली की माझ्यामुळे माझ्या भावंडांना HIV होईल. आई मला लांबच ठेऊ लागली. अखेर मी माझ्या बाळाला घेऊन वेगळी राहू लागले."

"सुरुवातीला घरकामाला, शेतावरच्या कामाला जाऊ लागले. पण काही दिवस काम केल्यानंतर माझ्या आजाराबाबत त्यांना कळलं की तेही काम हातातून जायचं," जुन्या आठवणी त्या सांगत होत्या.

काही दिवस त्यांची अक्षरश: उपासमार झाली. मग रोजगार हमीचं काम मिळालं.

मग एके दिवशी, बाळ 11 महिन्यांचं असताना, त्या कामावरून घरी आल्या आणि पाहिलं की त्यांच्या बाळानं दम तोडला होता.

"माझं बाळ जाण्याचा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. आता आपण जगून काही उपयोग नाही, असं मला वाटलं आणि मीही विष प्यायले."

पण रत्नाच्या शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, म्हणून त्यांचा जीव वाचला.

नवरा गेला, मूल गेलं, एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्नही झाला. पण रेखाच्या नशीबात काय होतं, कुणास ठाऊक?

पुढच्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "त्यानंतर जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणारी एक आरोग्यसेविका माझ्या संपर्कात आली. ती मला प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळेंकडे घेऊन गेली. त्यांनी लगेचच माझ्यावर औषधौपचार तर सुरू केले."

सोबतच, डॉ. आरोळेंनी रत्नाला प्रकल्पाच्या खडकतमधल्या शेतावर नोकरी दिली. त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली खरी, पण तो आजार आणि त्यामुळं होणारा सामाजिक त्रास काही पाठ सोडत नव्हता.

त्या सांगतात, "शेतावर काम करणारे इतर लोक माझ्यापासून फटकून वागू लागले."

"डॉ. आरोळेंना ही गोष्ट कळाल्यावर एक दिवस ते शेतावर आले. सर्व जण जेवायला बसले आणि डॉ. आरोळेंनी मला त्यांच्या ताटात जेवायला बसवलं. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला."

मग डॉ. आरोळेंनी प्रकल्पातील इतरांना समजावून सांगितलं की हा आजार सोबत राहिल्यानं होत नाही. "मग त्या सगळ्यांनी मला स्वीकारलं," रत्ना सांगतात.

"त्यानंतर मी स्वत:ला कामात बुडवून घेतलं. एकेक गोष्ट शिकत गेले. रोपवाटिका तयार करायला शिकले, गांडूळ शेतीचं प्रशिक्षण घेतलं. पोल्ट्री, शेळीपालनाचंही प्रशिक्षण घेतलं. या कामामुळं मी माझं दु:ख विसरून गेले."

ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या कृषी संशोधन केंद्रावर कामगार म्हणून रुजू झालेल्या रत्ना आज या केंद्राच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेळीपालन प्रकल्प चालवत आहे आणि गाई-बैलांचा सांभाळही करत आहे.

एवढंच नाही तर इथे भेटीला येणाऱ्या व्यक्तीला गांडूळ खत प्रकल्पाची माहिती देणं, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणंही रत्नाची जबाबदारी आहे. सर्व हिशोब त्याच सांभाळतात.

शेतीशिवाय बचत गटांमध्येही रत्ना कार्यरत आहेत. बचत गट चालवणाऱ्या महिलांना त्या मार्गदर्शन करतात.

ज्या लोकांनी रत्ना यांना दूर सारलं तेच सर्वजण आता त्यांना सन्मानानं बोलावतात. नातेवाईक लग्न किंवा इतर कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करतात.

पुढे जाऊन रत्ना यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीला 3 वर्षांची असताना दत्तक घेतलं. आज ती मुलगी अकरावीत शिकत आहे.

रत्ना यांनी केवळ त्यांचंच आयुष्य नाही पालटलं तर आसपासच्या लोकांच्याही त्या प्रेरणास्रोत झाल्या. त्या सांगतात, "HIV-एड्ससह जगणारे लोक आणि त्यांचे नातेवाईक जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मी त्यांना सांगते की, मी HIV असूनही मी स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांचा विश्वास बसत नाही. मग मी माझे मेडिकल रिपोर्ट दाखवते."

"मग त्यांचा विश्वास बसतो, आणि विश्वासही वाढतो की HIVशी संघर्ष करून जगता येऊ शकतं. इतर एड्सबाधितांची, त्यांच्या नातेवाईकांची हिंमत वाढवणं, यामध्ये मला खूप समाधान मिळतं."

रत्ना यांच्या या संघर्षाची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या वाटचालीची दखल स्वित्झर्लंडमधील जी. आय. सी. ए. एम. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं घेतली.

आज 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी रत्ना यांना व्याख्यान देण्यासाठी स्वित्झर्लंडला आमंत्रित करण्यात आलं आहे.

रत्ना सांगतात, "मला हेच मांडायचं आहे की, समाजाने HIV-एड्ससह जगणाऱ्यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. त्यांचा तिरस्कार करू नका. कॅन्सर आणि डायबेटिस यासारखा हाही एक आजारच आहे."

"HIV-एड्ससह जगणाऱ्यांना औषधोपचार तर मिळायलाच हवेत. पण त्यांना रोजगारही मिळायला हवा. स्वत:च्या पायावर उभे राहिले तर ते सन्मानानं जगू शकतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे HIV-एड्ससह जगणाऱ्यांच्या मुलांना दूर सारू नका," असं त्या सांगतात.

स्त्रोत- अभिजीत कांबळे, BBC News Marathi

*रत्नाताई च्या दुर्दम्य ईच्छाशक्ती ला ऊत्तुंग भरारीला सलाम..*

   *त्यांच्या मध्ये जगण्याची ऊमेद जागवणार्या डाँ आरोळे यांना साष्टांग दंडवत.....*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_