twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣5⃣

*🦅'दयाळ' वर आली 'दया'...!'*

_*अन त्या बेशुद्ध मादी रॉबिनला मिळाली राहत...!*_

*🖋 श्री.प्रवीण जगताप.*

आमच्या घरासमोर काचेला धडकून बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या काळ्या रंगाच्या चिमणीला अर्ध्या तासात योग्य ते प्रथमोपचार करून आम्ही तिला जीवदान दिले. पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांच्याशी फोटो सह संपर्क केला असता तो पक्षी ओरिएंटल मॅगपी रॉबिन ( दयाळ ) या जातीची मादी असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही दोघांनी अर्धा तास त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला राहत दिली अन तो पक्षी अर्ध्या तासांनी मुक्त संचार करू लागला. सकाळी घराबाहेर पडताना अंगणात काचेला धडकून काहीतरी पडल्याचे दिसले. तेंव्हा एक काळ्या रंगाची बेशुद्ध अवस्थेत चोच उघडी करून खाली पडलेली दिसली. यावेळी सौ ना बोलावून त्याला सुरक्षित जागी सावलीत आणले. त्यावेळी ती दयाळ अर्धवट डोळे उघडत होती. त्यानंतर सुरुवातीस पाणी पाजले. पण फारसा फरक पडत नव्हता. त्यानंतर दोघांनी चर्चा करून साखर पाण्याचे ग्लुकोज करून दिले. त्यानंतर तो पक्षी आवाज करू लागला. पण त्याच्या उजव्या पायाला मुका मार बसल्याने त्याला बसता येत नव्हते. यावेळी राहत अनिमल या संस्थेच्या किरण कंठे व अन्य मदतनीस याना फोन केला असता. आता त्याला एका लहान उघड्या बॉक्स मध्ये ठेवायला सांगितले. शिवाय ते त्याच्या पायावर उपचार करण्यासाठी सलगरे येथे दाखल होणार होते. दरम्यान अर्ध्या तासाच्या अवधीत त्या पक्ष्याने पंख सुस्थितीत आणले. उघडी पडलेली चोचची उघडझाप सुरू झाली. ग्लुकोज पाण्यामुळे त्याला ऊर्जा मिळाली. आणि उजेडात उंच संरक्षक भिंतीवर कमी अंतर उडाला. आणि पुढे तो लांब एका झाडाची फांदी दोन्ही पायाने सुरक्षित पकडल्याचे मी पाहिले. यावेळी त्याला सुरक्षित जीवदान मिळाल्याचे लक्षात आले. या घटना क्रमाचे फोटो पाहून अनिमल राहतने आमचे अभिनंदन केले. तर पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांनी फोटो पाहून हा पक्षी ओरिएंटल मॅगपी रॉबिन ( दयाळ ) या जातीची मादी असल्याचे त्यांनी सांगितले.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

सर,मला लिहिता येतयंं...!

आमची शाळा सुरु होवून एक महिना झाला होता. सकाळी दहाची वेळ असेल,मी शाळेत गेल्यावर आज ''Good morning sir.'' याऐवजी ''सर,राणीचं बोट दरवाजात चेंबलयं .'' असे माझे स्वागत झाले. राणी म्हणजे इयत्ता पहिलीतील आमची विद्यार्थीनी आराध्या कोळी , राणी हे तिचं टोपणनाव.(राणी,माऊली,गऱ्या,चिनपाल ही आमच्या कोळीवस्तीवरील मुलींची टोपणनावे आहेत.)
   सकाळी राणी दरवाजात असताना दुसऱ्या मुलीने दरवाजा बंद केला अन् राणीचे एक बोट दरवाजाच्या फटीत सापडले . जखम झाली नसली तरी ते चांगलेच लाल झाले होते.मी तिला जवळ बोलावले,'' आराध्या,इकडे ये.'
   आराध्या जवळ आल्यानंतर मी तिला म्हंटलं, ''चल,आपण गावात डॉक्टरांच्याकडे जावू.'' ''नको सर...!'' ती म्हणाली.आता काय करायचं ? मला प्रश्न पडला.नंतर मी सर्व मुलांना माझ्याजवळ बोलावले . आराध्याला जवळ घेतले अन् तिच्या दुखावलेल्या बोटावर एक हळूवार फुंकर घातली आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितले , ''आता,तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने आराध्याच्या बोटावर एकेक फुंकर घालावयाची.'' लगेच सर्व मुलामुलांनी आनंदाने तिच्या बोटावर फुंकर घातली. आता  आराध्याचा चेहरा खुलला,ती हळूहळू हसू लागली.
   परिपाठानंतर आम्ही वर्गात आलो, हजेरी घेतल्यानंतर मी लगेच सांगितले,''राणी ,आज तू पाटीवर किंवा वहीत काहीही लिहायचे नाही,फक्त वाचन करायचं.'' जड अंत:करणाने आराध्या दिवसभर फक्त वाचत राहिली,कधी फळ्यावरील शब्द वाचायची तर कधी स्वत:च्या वहीतील... काहीवेळ फक्त पुस्तकातील चित्रे पाहत बसली.
   दुपारनंतर साडेचार वाजता पहिलीतील मुले घरचा अभ्यास घेण्यासाठी जवळ आली. मी सर्वांचा कालचा स्वाध्याय तपासून नवीन स्वाध्याय देत होतो. मी आराध्याचा कालचा स्वाध्याय तपासला आणि तिला सांगितले ,''तुझ्या बोटाला आज लागले आहे,तुला लिहिता येणार नाही म्हणून मी तुला आज स्वाध्याय देणार नाही.''
आराध्या निराश होवून मान खाली घालून जागेवर जाऊन बसली. मी दोन - तीन विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला असेल,तितक्यात आराध्या आनंदाने उड्या मारीत माझ्याजवळ आली आणि म्हणाली,''सर,मला लिहिता येतयं..तुम्ही मला अभ्यास द्या.'' तिने मला तिची वही दाखवली,त्यामध्ये तिने फळ्यावरील शब्द लिहिले होते.मी तिला पुन्हा माझ्यासमोर शब्द लिहायला सांगितले ,तिने ते पटकन लिहून दाखविले. आता माझा नाईलाज झाला ,मी तिला वहीत स्वाध्यायाचा नमुना दिला.ती नाचत जावून आपल्या बेंचवर बसली. थोड्या वेळाने शाळा सुटली आणि आराध्या आनंदाने मुलांच्यासोबत आपल्या घरी निघून गेली.
   पण बोटाला लागलेलं असतानाही आपण इतरांच्या मागे राहू नये यासाठी जिद्दीने प्रयत्न करणारी आराध्या आज मलाच खूप काही शिकवून गेली .ज्ञानाच्या भुकेने झपाटलेली अशी पाखरं भेटली की शिक्षक झाल्याचं खूप समाधान वाटते.

✒श्री.दीपक माळी ९६६५५१६५७२.
खरशिंग,ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣4⃣

*🛰चांद्रयान 3 मोहिमेत कोल्हापूरच्या तरूणावर आहे 'ही' जबाबदारी*

सकाळ वृत्तसेवा,
रविवार, 1 डिसेंबर 2019

कोल्हापूर - गेल्या सप्टेंबरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न अपुरे राहिल्यानंतर आता इस्रो मिशन २०२० अंतर्गत चांद्रयान ३ मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेत येथील युवा संशोधक धनेश बोरा याची निवड झाली आहे. अतिसूक्ष्म उपग्रह (नॅनो टेक्‍नॉलॉजी बेस्ड्‌ सॅटेलाईट) आणि सेन्सर तयार करण्याची जबाबदारी त्याच्यासह पाच जणांवर असेल. दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या मुलाखतीतून इस्रोचे संचालक डॉ. सतीशराव यांनी धनेशची निवड केली.

धनेशची ओळख रोबो रायटरचा निर्माता, अशी असून विज्ञानविषयक विविध प्रकल्पांत त्याचा सक्रिय पुढाकार आहे. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची लेखनिकाची अडचण दूर करण्यासाठी इस्रोमध्ये काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांसह धनेशने रोबो रायटरची निर्मिती यापूर्वीच केली आहे. ज्याद्वारे अंध, अपंगांना लेखनिक मिळेल. शिवाय संपूर्ण शैक्षणिक वर्षांत तो त्यांच्याकडून अभ्यास करून घेईल, अवांतर वाचन करून घेईल. या रोबोला जगभरातील सर्व भाषांचे ज्ञान आहे. परीक्षेत विद्यार्थी सांगतील आणि रोबो रायटर प्रश्नपत्रिका लिहिणार, अशा पद्धतीने हा रोबो आता काम करणार आहे. या रोबोचा प्रत्यक्षात वापर सुरू झाल्यास देशातील तीस लाख अंध-अपंगांना याचा फायदा होणार आहे.

*‘इस्रो’ची टीम चांद्रयान -३ च्या मोहिमेत व्‍यस्‍त*

चांद्रयान २ च्या अपयशातून खचून न जाता नव्याने ‘इस्रो’ची टीम पुढच्या मोहिमेसाठी कामाला लागली आहे. इस्त्रोने आतापर्यंत लॅंडिंग साईट, दिशादर्शनासह दहा महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले आहे. मोहिमेत लॅंडरचे पाय भक्कम करण्यावर अधिक भर दिला आहे. जेणेकरून वेगाने लॅंडिंग झाले तरी लॅंडर सुस्थितीत राहील. एकूणच हे इस्रोचे आश्‍वासक पाऊल ठरणार आहे.

*ही अभिमानाचीच गोष्ट*

चांद्रयान मोहिमेत संधी मिळणे, ही एक अभिमानाचीच गोष्ट असली तरी ती महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आमची टीम मोहिमेसाठी अतिसूक्ष्म उपग्रह आणि सेन्सर तयार करणार आहे.

- धनेश बोरा.

https://www.esakal.com/paschim-maharashtra/young-scientist-dhanesh-bora-chandrayaan-3-mission-240136



📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣3⃣

*चिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्‌*

साभार-गजेंद्र पोळ,दैनिक सकाळ.
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

चिखलठाण : चिखलठाण (जि. सोलापूर) च्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या गावरान व देशी-विदेशी बियांचा संग्रह करण्याच्या छंदातून त्यांनी सिडबॅंकच साकारली असून ते फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बियांची देवाणघेवाण करत अस्सल देशी बियानांचे संवर्धन करत आहेत. सध्या त्यांच्या ग्रुपच्या बॅंकेत 300 पेक्षा ज्यास्त प्रकारच्या बियांचा संग्रह असून दिवसोंदिवस यामध्ये वाढच होत आहे.

सध्या अनेक गावरान देशी फळे, भाज्या, पिके, फुले आशा विविध वनस्पतींचे वाण दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याची ओरड आपणास सर्वत्र ऐकण्यास मिळते. यांच्या संग्रह व संवर्धन करण्याचे फारसे प्रयत्न कोणी करत नाहीत. मात्र चिखलठाण क्रमांक दोन येथील उपक्रमशील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या जवळ तब्बल तीनशे अस्सल देशी वाणाच्या बियाणांचा संग्रह आहे. ज्या वनस्पतींना बिया नाहीत त्यांची रोपे तयार केली आहेत. तसेच जेऊर येथील त्यांच्या घराच्या टेरेसवर आशा वनस्पतींची बागही फुलवली आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून ते आपल्यजवळील बिया व रोपे यांची आपल्या परिचयाच्या व याची आवड आसणारांशी देवाणघेवाण करत होते. प्रमोद तांबे यांच्या फेसबुकवरील 'माती विरहीत बाग' या ग्रुपपासून त्यांना आणखी समविचारी नवीन मित्र मिळाले. यातूनच 5 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी स्वत: व नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संजय नरोटे, बीड येथील श्रुती ओझा या तीन समविचारी मंडळीनी एकत्र येऊन तिघांच्या नावातील अध्याक्षर घेऊन एस. व्ही. एस सीडबॅंक फेसबुक ग्रुपची व सिडबॅंकेची निर्मिती केली. या ग्रुपचे संपूर्ण देश व परदेशात पाच हजारांच्यावर सभासद आहेत. सध्या या तिघांजवळ विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची बीया उपलब्ध असून राज्याच्या काना कोपऱ्यातील सभासद मंडळींना याची देवाणघेवाण करतात पोष्टाच्या माध्यमातून पाकिटाद्वारे ना नफा ना तोटा या तत्वावर करत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्यात बियांची देवाणघेवाण केली आहे. याशिवाय फिलाडेल्फिया येथून तिथे पिकणाऱ्या लालमका आणि सूर्यफूल आशा बियांची सिडबॅंकेत भर पडली आहे. एखाद्याने फेसबुकवर विशिष्ट प्रकारच्या बियांची मागणी केली असता ते पोस्टाने या बिया पाठवतात. त्याबदल्यात त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी त्या परिसरातील गावरान व देशी वनस्पतींच्या बिया पाठवतात. आपली शाळा संभाळून ते राबवत आसलेल्या उपक्रमात त्यांची पत्नी व कुटूंबातील सर्व सदस्य मदत करत आसतात त्यांच्या या देशी वाणांचे बियाणे संवर्धन आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पाथ्रुडकर यांच्याजवळ संग्रही असलेल्या बिया
पालेभाज्या : अंबाडी, पालक, मेथी, शेपू, चुका, चाकवत, पोकळा, लालमाठ, राजगिरा, कोबी, करडई, तांदूळसा, तांबडेपान, कोथिंबीर, कडिपत्ता, मायाळू, फुलकोबी आदी.

फळभाज्या : मिरचीचे 4/5 प्रकार, काकडी, घोसाळी, कर्टुले, डबलबी, मुळा, गाजर, ढेमसे, पावटा, घेवडा, वाल, शेंदाड (चिबूड), खरबूज, कलिंगड, टोमॅटो, पडवळ, अबई, पठाडी, गवार, दोडका, दूधी व काशिफळ भोपळा, कोहळा, डांगर, शेवगा, हादगा, भेंडी, रानभेंडी, कारले, वाटाणा, कारळे, अळसुंदा आदी.

कडधान्ये : चवळी, जवस, हुलगा, काळे तीळ, राजमा, मका, ज्वारी, गहू, उडीद, भगर आदी.
वृक्ष /औषधी झाडे : सीताअशोक, अशोक, करंज, कडूनिंब, रायआवळा, आपटा, शमी, बेल, खैर कवठ, मेंदी, खजूर, बहावा, चिंच, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, सरकी, देवकापूस, शिरीष, कांचन, लाल, गुलाबी हादगा, अर्जुन, ऐन, शिवण, गुंज, रीठा, तुळशीचे विविध प्रकार, रतनगुंज, ताम्हण, बिक्‍सा, गुलमोहर, विलायती चिंच, गुळवेल, हिरडा, एरंड, चिकू, पपपई, कोकम, बोर, जांभूळ, काटेसावर, कॉफी, अपामारी, रिंगणी, टिकोमा, बीजा, रोहन, पळस, अंजीर आदी.

फुलझाडे : कमळ, अबोली, पारिजातक, पेंटास, डेझी, लॅव्हेन्डर, आईस्क्रीम क्रीपर, सदाफुली, डेलिया, रेनलिली, मेक्‍सिकन सूर्यफूल, भेंडीगुलाब, दुपारी, वैजयंती, गणेशवेल, सुपारी, मॉर्निंग ग्लोरी, बदकवेल, गुलबक्षी, गोकर्ण, बेसिल, चिनीगुलाब, लसूणवेल, कॉसमॉस, झेंडू, झिनिया, अक्कलकारा, गलांडा, तेरडा, ऍडेनियम, लाजाळू, पॅशनफ्रूट....

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣2⃣

*शाळेबाहेर जेवणाची वाट पाहणाऱ्या मुलीच्या फोटोने तिचं आयुष्य बदललं*

बोभाटा,November 11, 2019

सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तो किती प्रभावशाली ठरू शकतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. बिनकामाचे मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक सोशल मीडियावर शेयर केले तर बदल घडतो याचे एक मोठे उदाहरण आज आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत.

हैदराबादच्या एका गरीब मुलीला सोशल मीडियामुळे अशा शाळेत प्रवेश मिळाला आहे, जिथे तिच्या आई वडिलांना प्रवेश घेऊन देणे शक्य झाले नसते.  मध्यंतरी सोशल मीडियावर एक फोटो वायरल झाला. त्या फोटोत एक मुलगी हातात वाडगे घेऊन वर्गातील मुलांचे जेवण संपेल आणि उरलेले आपल्याला मिळेल या आशेने एका वर्गाच्या बाहेर उभी आहे. कुणीतरी हा फोटो घेतला आणि एका स्थानिक पेपर मध्ये तो छापून आला. 'भुकेला चेहरा' असे टायटल देऊन तो फोटो छापण्यात आला होता. हा फोटो गुडीमलकापूर येथील देवल झाम सिंग नावाच्या सरकारी शाळेतील आहे.
त्या मुलीचे नाव दिव्या असे आहे. तिचे आईवडील कचरा गोळा करण्याचे काम करतात. मंडळी आईवडील कामाला गेले की ती शाळेबाहेर उभी राहून थोडं फार खायला मिळेल या आशेने वर्गाबाहेर उभी राहायची. हा तिचा रोजचा दिनक्रम झाला होता.

दिव्याचा हा फोटो लहान मुलांसाठी काम करणारी NGO एमवी फाऊंडेशनचे वेंकट रेड्डी यांच्या नजरेस आला आणि त्यांनी तो फेसबुकवर शेअर केला.  त्यांनी सिस्टीमवर टीका केली आणि एक लहान मुलगी भुकेजून वर्गाबाहेर उभी राहत असेल तर आपल्याला लाज वाटायला हवी असेही लिहिले. फक्त एवढे करून ते थांबले नाहीत त्यांनी त्या शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि तिला तेथे प्रवेश मिळवून दिला.
वेंकट रेड्डींनी नंतर दिव्याचा स्कूल युनिफॉर्म घातलेला फोटो शेअर केला. सोबत तिचे आईवडील सुद्धा दिसत आहेत. रेड्डी स्वतः तिच्या घरी गेले आणि त्यांनी दिव्याची आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती जगापुढे आणली.

मंडळी, एका रात्रीत बदल घडून येत नाहीत आणि फक्त सोशल मिडियावर पोस्टस लिहून तर नाहीच नाही. पण सामाजिक कार्यासाठी उचललेले लहान पाऊलही  समाजात मोठा बदल घडवून आणू शकते, हे दिव्याच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. वेंकट रेड्डी यांच्यासारखे अजून लोक समाजात तयार झाले तर बदल घडायला वेळ लागणार नाही.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣1⃣

*निरपेक्ष वृत्तीने ग्राम स्वच्छता करणारे देशिंगचे गोविंदआण्णा क्षिरसागर*

_साभार-दै. पुण्यनगरी ,देशिंग / विठ्ठल हुलवान_

-- घराची कळा अंगण सांगते व गावाची कळा परिसरावरून कळते
अशा आशयाची स्वच्छतेचे महत्व सांगणारी ग्रामीण भागातील एक म्हणं आहे,
त्यामुळे प्रत्येकजण आपापले घर आपला परिसर दररोज झाडून स्वच्छ ठेवत असतो विशेषतः ही जबाबदारी महिला वर्गांवरच असते,
आपलं घर, आपलं अंगण , आपलं व्यवसायाचे ठिकाण व आपला परिसर तर सगळेच स्वच्छ राखतात पण त्याहीपुढे जाऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करताना मात्र लोकांना कमीपणा वाटतो.
स्वच्छतेचे हेच महत्त्व जाणून माजी ग्रामविकास मंत्री आर आर आबा पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांना एक उपक्रम दिला व तो यशस्वीपणे राबवला, बक्षिसासाठी का असेना? अनेक गावांनी यांमध्ये सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले होते व फोटोपुरतं का असेना? गावच्या पुढाऱ्यांनी हातात खराटे घेऊन त्यावेळेस गावे स्वच्छ केली होती. कालांतराने ही स्वच्छता मोहीम थंडावली असली तरी सध्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर देत स्वतः समुद्रकिनारी स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेसाठी प्रवृत्त करण्याचा संदेश देत आहेत.
पगार घेऊन स्वच्छता तर सफाई कामगार सुद्धा करतातच, पण आज निरंकारी मिशन सारखी एक अध्यात्मिक विचारधारेचे सेवादल रेल्वे स्टेशन बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबवत आहेत,
निरपेक्ष वृत्तीने विनामोबदला स्वच्छतेचे काम करणारे हे स्वच्छतादूत खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचे वारसदार ठरतात,
स्वच्छतेचा हाच वसा
देशिंग येथील श्री गोविंद क्षीरसागर यांनी चालवला आहे, स्वच्छतेचा हा उपक्रम अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे,
"गोंदाअण्णा" या नावाने ते परिचित आहेत, देशिंगच्या लक्ष्मी चौकात त्यांचे केश कर्तनालय आहे , गेली कित्येक वर्षे त्यांचा हाच पिढीजात व्यवसाय चालू आहे,
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत त्यांचे ग्राहक आहेत, त्यांच्या या सर्विस सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं सर्विसिंग करून चकाचक केले जातं, पण ते केवळ व्यक्तीची स्वच्छता करतात असं नाही तर स्वयंप्रेरणेने ते आपल्या परिसराची व रस्त्याची दररोज सकाळ-संध्याकाळ स्वच्छता करत असतात,
त्यांचा हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड चालू आहे,
सकाळी उघडलेलं दुकान दुपारी बंद केल्यानंतर ते झाडू घेऊन आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील रस्त्यावर पडलेले कागद, कचरा प्लास्टिक गोळा करून कचरा कुंडीत टाकतात, व संपूर्ण परिसर झाडून चकाचक करतात,
रात्री दुकान बंद झाल्यानंतरही ते संपूर्ण परिसर झाडून लोटून स्वच्छ करतात,
त्यांचा हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून चालू आहे.
दररोज पहाटे लवकर उठून ते हरोली येथील हरिपीर दर्ग्याचा परिसर झाडलोट करुन स्वच्छ करतात.
स्वच्छता त्यांच्यामध्ये इतकी भिनली आहे की ते कोणतेही रस्त्यावरुन चालताना वाटेवरील पडलेले दगड-धोंडे प्लास्टिक कचरा उचलून कचराकुंडीत नेऊन टाकत असतात.
हि गोष्ट जरी छोटी असली तरी ती डोंगरा एवढी मोठी आहे.
त्यांचा हा स्वच्छतेचा आदर्श समाजाने घेण्याची आवश्यकता आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग - नाबाद 5⃣0⃣0⃣*

*चालून आलेली हज़ारोंची 'लक्ष्मी' धनाजीने प्रामाणिकपणे परत केली*

साभार- विशाल गुंजवटे,सकाळ वृत्तसेवा.
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

_परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे मनाने श्रीमंत असलेले व्यक्तीचे करावे तेवढे काैतुक कमीच म्हणावे लागेल._

बिजवडी (जि. सातारा) : घरी जायला प्रवासासाठी पैसे नसल्याने कोणतरी ओळखीचे मिळेल या आशेने वाट पहात बसलेल्या पिंगळी ( बु.ता.माण) येथील धनाजी जगदाळे या व्यक्तीला बसलेल्या ठिकाणी ४० हजार रूपये सापडले मात्र ते घेऊन निघून जावे असा किंचितही मनात विचार न आलेला धनाजी पैसे कोणाचे आहेत असे विचारू लागतो.

ज्याचे पैसे आहेत त्याला माघारी देताना बक्षीसरूपी १ हजार मिळत असताना धनाजी म्हणतो कसा ,मला पिंगळीला जायचय माझ्याकडे पैसे नाहीत मला फक्त प्रवासासाठी ७ रूपये द्या. अन तो धनाजी ४० हजारातील फक्त ७ रूपये घेऊन निघून गेला.
मनाने धनवान असलेल्या या देवदूत धनाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे  (वय ५४) याचे हातावरचे पोट. रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती. दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा  उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत. चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला.

खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले.

धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले.

तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी  ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यातून पाणी आले.
ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने घेणार हा देवदूतच म्हणावे लागेल ना.

परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. त्याच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली.

- राजेंद्र जगदाळे  (सर) पिंगळी बु.ता.माण.

https://www.esakal.com/kahi-sukhad-paschim-maharashtra/dhanaji-honestly-returned-thousands-ruppees-229896

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_