twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣0⃣

*👨🏻‍🏫बांधावर अभ्यास करून गुरुजी बनला उपजिल्हाधिकारी*

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Feb 2019,

पंढरपूर (सुनील दिवाण)

स्पर्धा परीक्षा हे अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बनत असून यासाठी अनेक वर्षे हि मुले पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरात राहून या परीक्षांची तयारी करतात. यासाठी भक्कम फी असलेल्या नामांकित क्लासेसमध्ये प्रवेश घेत आपले नशीब अजमवतात. काल आलेल्या राज्य स्पर्धा परीक्षेच्या निकालात एका गुरुजीने नोकरी सांभाळत शेताच्या बांधावर अभ्यास करून राज्यात पहिला येण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

महेश जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील तरुण. परिस्थितीमुळे बारावीनंतर डीएड करून रयतेच्या शाळेवर नोकरीला लागला. मुलांना शिकवताना त्याला शिक्षणाची आवड शांत बसू देत नव्हती आणि यातूनच त्याने मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. गेल्यावर्षी त्याची दहिवडी वरून गावाजवळील भाळवणी येथील शाळेवर बदली झाली आणि त्याला आपण स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी असा विचार मनात आला. आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्नही सुरू केले. एका वर्षात दोन परीक्षांत तो पासही झाला आणि त्याची निवड देखील झाली.
दिवसभर शाळेत शिकवून घरी आल्यानंतर रात्री तो अभ्यासाला बसत असे. स्पर्धा परीक्षांसाठी खूप पुस्तकांचा अभ्यास लागतो यावर मात्र त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणूनच मोजक्याच पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करुन जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर महेशने भर दिला. मुख्य परीक्षेसाठी शाळेतून एक महिना रजा घेऊन त्याने या काळात भरपूर अभ्यास केला. महेशचे कुटुंब त्याचा पगार आणि दोन एकर शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आई वडील दिवसभर शेतात काम करीत तर त्याचा लहान भाऊ शेतातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असे. महेशचे घर शेतातच असल्याने त्यानेही लहान भावाप्रमाणे शेताच्या बांधावर बसून अभ्यास केला. यावेळी त्याची सव्वा वर्षाची मुलगी हेच त्याचा विरंगुळा होता. या परीक्षेसाठी त्याला ना कोणती शिकवणी होती ना कोणाचे मार्गदर्शन मात्र आपल्या पास झालेल्या मित्रांशी बोलून त्याने सर्व तयारी केली आणि तो इतर मागास प्रवर्गातून राज्यात पहिला आला तर ओपन मधून दुसरा. महेशच्या यशाने मुलाने पांग फेडल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. शाळेतही महेशचे कौतुक होत असून सलग तीन परीक्षा पास झालेला महेश आजही शाळेत मुलांना शिकवण्यात तेवढाच रममाण होत असतो. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मुलांनी कोणते क्लास लावले आणि किती पुस्तके वापरली यापेक्षा जो अभ्यास कराल तो मन लावून करा आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवर भर द्या असा सल्ला महेशनं दिला आहे.

https://m.maharashtratimes.com/kolhapur-western-maharashtra-news/solapur/mpsc-result-2019-mahesh-jamdade-comes-first-in-state/articleshow/68009029.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=jamdade140219&fbclid=IwAR01mv1Uul3L0bCr1RK128pKik22lzw61t9cnPtmEH0HcHhQcL8MEwYRJ_c

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_