twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣5⃣

*👩🏻Women’s Day 2019 – हमिदा खान: महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ले सर करणारी ‘हिरकणी’*

*_२००० साली तर त्यांनी चक्क १५० गड किल्ल्यांना भेट दिली_*

साभार -लोकसत्ता ऑनलाइन | March 8, 2019 10:09 am

गड- किल्ले फिरणं ही एक धुंदी असते… आणि जो ती धुंदी अनुभवतो त्यालाच ती जाणवते. गड- किल्ले फिरल्यावर आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल जास्त आपुलकी वाटू लागते. अशीच एक धुंदी जोपासत आहेत मुंबईत राहणाऱ्या हमिदा खान.
१९९० साली हमिदा यांनी युथ हॉस्टेल सोबत त्यांचा ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. शाळेत असल्यापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना कुतूहल होतं आणि म्हणूनच त्यांनी गड- किल्ले भटकंतीला सुरुवात केली. पण त्यांच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती १९९९ साली. कारण तेव्हाच त्यांना गड- किल्ल्यांची माहिती गोळा करण्याचा ध्यास लागला. १९९९ साली त्यांच्या या प्रवासाला कलाटणी देण्याचे मुख्य कारण म्हणजे या एका वर्षात त्यांनी एकूण १०० गड किल्ल्यांना भेट देत त्या किल्ल्यांच्या माहितीचे संकलन केले. त्यांनी संकलित केलेल्या माहितीमध्ये गडाच्या इतिहासाबरोबरच गडाचे फोटो, तिथे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक व गडावरील वास्तूंची नोंद अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
१९९९ नंतर हमिदा यांनी गड- किल्ल्यांना भेट देण्याचा सपाटाच लावला. २००० साली तर त्यांनी चक्क १५० गड- किल्ल्यांना भेट दिली. २००१ साली आणखी शंभर गड- किल्ले त्यांनी सर केले. अशा रितीने अवघ्या ३ वर्षांमध्ये हमिदा यांनी महाराष्ट्रातील ३५० गड- किल्ले सर केले. विशेष म्हणजे त्या कधीच एका विशिष्ट ग्रुपसोबत या मोहिमांना जात नसत. जो ग्रुप ट्रेकिंगला जाणार असेल त्यांच्यासोबत त्या गड- किल्ल्यांवर जातात. अगदीच कोणी नसेल तर अनेकदा त्या एकट्याही प्रवास करत. त्यांच्या सोलो प्रवासाच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, ‘अनेक चांगले अनुभव मला या प्रवासात आले. पण काही प्रसंगी मला खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. बऱ्याचदा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील लोकांनाही गडाचं नावदेखील माहित नसायचं. मग गावातील पोलीस पाटील किंवा शाळेतून काही माहिती मिळतेय का हे पाहून मी गड सर करायचे.’
असाच एक प्रसंगाबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘एकदा भर पावसात निमगिरी किल्ल्यावर मी जात होते. किल्ल्यावर पोहचल्यावर तिथे कोणीच नव्हते म्हणून मी गडावरील मंदिरापाशी जाऊन बसले. तेव्हा अचानक एक गुराखी तिथे आला आणि माझ्याशी संवाद साधू लागला. काही वेळ गेल्यावर मला त्याच्या हालचाली काही बऱ्या वाटल्या नाहीत. म्हणून मी हातात एक मोठा दगड घेऊन त्या माणसाला अद्दल घडवायचं ठरवलं. माझं हे रूप पाहून तो तिथून पळून गेला.’ हमिदांच्या या २० वर्षातील गड- किल्ल्यांच्या प्रवासातील आणखीन एक वाईट अनुभव त्यांना नळदुर्गला जात असताना रात्रीच्या वेळी तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत त्यांना मुक्कामासाठी राहू दिले नव्हते तेव्हा आला. महिलांना तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत राहण्याची परवानगी नाही असं सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. अशा प्रसंगांसंदर्भात बोलताना हमिदा म्हणतात, ‘मुलींनी एकटा प्रवास करताना जरा काळजी बाळगावी. एखादं धाडस करताना निसर्गाची साथ मिळते पण काही वेळा माणूसच माणसाला साथ देत नाही हे लक्षात घ्यायला हवे.’
आजवर हमिदा यांनी महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ल्यांना भेट दिली आहे. २०१८ साली ७ जून रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हमिदा खान यांचा संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते रायगडावर सत्कार करण्यात आला.
हमिदा यांनी महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांबरोबरच राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाबसारख्या राज्यांमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळांनाही भेट दिली आहे. वयाचं अर्धशतक गाठणाऱ्या हमिदा इथवरच थांबणार नाहीयेत. सामान्यांमध्ये फारसे परिचित नसलेले अजून बरेच गड- किल्ले त्यांना शोधून काढायचे आहेत. त्यांनी शोधलेला एक किल्ला म्हणजे बारड्याचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा कारंजा किल्ला.
हमिदांचा गड- किल्ल्यांविषयीचा अभ्यास नक्कीच दांडगा आहे. म्हणूनच सध्या ट्रेकच्या नावावर जी पिकनिक चालू आहे त्याविषयी त्या नाराजी व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘दुर्गसंवर्धन करताना अनेकदा गडाच्या मूळ वास्तूंना डावलले जाते जे चुकीचे आहे. त्यामुळे संवर्धन नक्कीच करा पण काळजीपूर्वक आणि निसर्गाची साथ घेऊनच करा.’
गड- किल्ल्यांवर भटकंती करत त्यामाध्यमातून इतिहास संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या हमिदा खान यांना जागतिक महिनादिनानिमित्त ‘गुरुवर्य ग्रुप’चा मानाचा मुजरा....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

https://www.loksatta.com/maharashtra-news/womens-day-2019-hamida-khan-women-who-visited-400-forts-in-maharashtra-1854062/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..