🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣0⃣8⃣
*वाहवा ! अंध चंद्रकांत देशमुखे यांचे डोळस प्रबोधन*
संतोष कणसे,सकाळ वृत्तसेवा
04.53 AM
_कवी देशमुखे दीड वर्षाचे असताना त्यांना अंधत्व आले. शिक्षणाची प्रचंड ओढ असूनही त्यांना अंधांसाठीचे शिक्षण घेता आले नाही. लहानपणी भावंडांशी खेळण्या-बागडण्यात त्यांचा वेळ गेला;_
कडेगाव ( सांगली ) - बालपणापासून अंध व शिक्षणाचा कसलाही गंध नसलेले कडेगाव येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अंधकवी चंद्रकांत देशमुखे. त्यांनी जग पाहिलेले नाही; परंतु समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचा नायनाट करण्यासाठी, नागरिकांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी कवितेच्या माध्यमातून ते गेल्या 55 वर्षांपासून डोळसपणे अव्याहतपणे धडपड करीत आहेत.
कवी देशमुखे दीड वर्षाचे असताना त्यांना अंधत्व आले. शिक्षणाची प्रचंड ओढ असूनही त्यांना अंधांसाठीचे शिक्षण घेता आले नाही. लहानपणी भावंडांशी खेळण्या - बागडण्यात त्यांचा वेळ गेला; परंतु पुढे वय वाढत गेले तसे त्यांना एकाकी वाटू लागले. त्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना रेडिओ दिला. त्या वेळी रेडिओवरील कार्यक्रम हेच त्यांना जगाची माहिती मिळण्याचे एकमेव साधन बनले. घरातील लोक त्यांना विविध वृत्तपत्रेही वाचून दाखवत. यातून त्यांना जगातील घडामोडींची माहिती मिळे. 1965 मध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले. त्या वेळी देशमुखे यांचे वय सतरा वर्षांचे होते. त्या वेळी युद्धाच्या बातम्या व प्रसंग तसेच देशभक्तिपर गीते ते रेडिओच्या माध्यमातून ऐकत होते.
देशासाठी योगदान देण्याचा संकल्प
आपण अंध आहे म्हणून गप्प बसायचे नाही, तर देशासाठी व समाजासाठी काही तरी करावयाचे, असा संकल्प करत काय करावे म्हणजे देशसेवा होईल, असा विचार सुरू केला. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचा नायनाट करण्यासाठी व नागरिकांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी कविता करण्याचे त्यांनी ठरवले. देश व समाजहितासाठीचे वास्तववादी विचार त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यांच्या कविता लोकप्रिय होत गेल्या.
देशमुखे साहित्य वर्तुळात लोकप्रिय
अंधकवी म्हणून कडेगावच्या चंद्रकांत देशमुखे यांचे नाव साहित्य वर्तुळात चमकू लागले. 2002 व 2017 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या देशभक्तीपर व सामाजिक कवितांनी अनेक दिग्गज साहित्यिक व विविध विचारवंतही भारावून गेले. "मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत, डॉ. आ. ह. साळुंखे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पद्मश्री कवी सुधांशू आदींनी त्यांच्या जनसेवेचे कौतुक करून हे व्रत अखंडितपणे जोपासावे, असे आवाहन केले. त्यामुळे चंद्रकांत देशमुखे गेल्या 55 वर्षांपासून अखंडितपणे देश व समाजहिताच्या कसदार काव्यरचना करीत असून, त्यांची ही धडपड व काव्य उपासना अव्याहतपणे सुरू आहे.
हिशेब करतात फास्ट
अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांनी कसलेही शिक्षण घेतले नाही, की ब्रेल लिपीही शिकलेले नाहीत. तरीही ते त्यांचे वडिलोपार्जित धान्याचे दुकान चालवतात. धान्य खरेदी-विक्री ते अनुभवाने स्वतः करतात. आकारावरून कोणती नोट किती रुपयांची आहे हे ते लीलया ओळखतात; तर हिशेब कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट करतात. हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/blind-chandrakant-deshmukhe-inspiring-poems-patriotism-245982
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_