🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣0⃣9⃣
*🏇🏻सांगलीच्या तलवारबाज मर्दानीची ऑलिंपिकसाठी घोडदौड...*
साभार- सकाळ वृत्तसेवा
_सांगलीची तलवारबाज राधिका आवटी आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करत भारतातील ‘टॉप’ ची खेळाडू बनली आहे. सांगलीच्या या तलवारबाज मर्दानीची २०२२ मधील एशियन्स गेम्स आणि २०२४ ची ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी घोडदौड सुरू आहे._
सांगली - केवळ तलवारबाजीसाठी आई-वडिलांनी नववीतल्या राधिकाला शेकडो किलोमीटर दूर अनोळखी केरळ प्रांतात पाठवले. तिनेही जिद्दीने तलवारबाजी शिकताना अनेक अडचणींची खिंड लढवत आर्थिक परिस्थितीचा मुकाबला सुरू ठेवला. आज ती भारतातील ‘टॉप’ ची खेळाडू बनली आहे. सांगलीच्या या तलवारबाज मर्दानीची २०२२ मधील एशियन्स गेम्स आणि २०२४ ची ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी घोडदौड सुरू आहे. मात्र तिच्या पाठीशी आर्थिक पाठबळाची कोणतीच संरक्षक ढाल नाही.
असा झाला राधिकाचा प्रवास
राधिका प्रकाश आवटी तिचे नाव
.. आवटी कुटुंब मूळचे अकिवाट (ता. शिरोळ) येथील आहे. शेती हेच त्यांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन आहे. राधिका आणि मोठा भाऊ अभिषेकच्या शिक्षणासाठी १९ वर्षांपूर्वी कुटुंब सांगलीत आले. राधिका कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकू लागली. पाचवीत असताना तिने शालेय खेळासाठी तलवार हाती घेतली. तलवारबाजीतील फॉईल प्रकार ती शिकू लागली. हरिपूरचे प्रशिक्षक सागर लागू यांनी तिच्यातले कौशल्य आणि कसब हेरले. तिला सर्व प्रकारचे डावपेच शिकवण्यास सुरवात केली.
तिला हवीय आर्थिक पाठबळाची ढाल
पहिल्याच वर्षी सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत तिने कास्य पदक पटकावले. त्यानंतर तिची तलवार आणखीनच तळपू लागली.२००६ मध्ये तिचे प्रशिक्षक सागर लागू स्पोर्टस् ॲथोरिटी ऑफ इंडिया (साई)च्या केरळ येथील प्रशिक्षण केंद्रात रुजू झाले. २००७ मध्ये श्री. लागू यांनी नववीतील राधिकाला केरळ येथे ‘साई’ कडून खेळण्यासाठी निमंत्रण दिले. आई-वडिलांची भेट घेऊन तिच्या करिअरसाठी पाठवण्याची विनंती केली. आई-वडिलांनी धाडस करून राधिकाला नववीत असताना २००७ मध्ये केरळला पाठवले. शेकडो किलोमीटर दूर गेलेल्या राधिकासाठी केरळ नवखाच होता. मराठीतून शिक्षण घेतलेल्या राधिकाला तिथे इंग्रजी माध्यमातून आणि स्थानिक मल्याळम भाषा शिकण्याचे खडतर आव्हान होते. पहिले सहा महिने ती रडतच होती. परंतु आई-वडील, भाऊ आणि प्रशिक्षकांच्या प्रेरणेतून तिने अडचणींवर देखील तलवार चालवली. खेळात आणि अभ्यासात ती सफाईदारपणे तलवार चालवत राहिली. दहावीत ८५ टक्के, बारावीत ८० टक्के गुण मिळवले. केरळमधून ती बी.ए. (फंक्शनल इंग्लिश) आणि तमिळनाडूच्या अण्णा विद्यापीठातून एमबीए झाली आहे.
राधिकाने परदेश ही गाजवला
श्री.लागू हे देशातले अग्रेसर प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राधिका आज देशातील टॉपची तलवारबाजपटू बनली आहे. नेपाळमधील काठमांडूत नुकतेच ६ ते ९ डिसेंबर अखेर झालेल्या आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन गेम्समध्ये तिने संघाला सुवर्णपदक मिळवून देताना वैयक्तिक रौप्य पदक पटकावले. राधिकाने सिंगापूर, फिलीपाईन्स, बॅंकॉक, स्कॉटलंड, सिंगापूर, मंगोलिया, चीन, टोकियो, हाँगकाँग, लिपझिंग, बार्सिलोना, कॅनबेरा, बुडापेस्ट आदी ठिकाणच्या २१ आंतरराष्ट्रीय स्पर्धातून संघाला तीन सुवर्ण, वैयक्तिक रौप्य आणि तीन कास्य पदके पटकावली. ३५ राष्ट्रीय स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि १५ कास्य पदके पटकावली आहेत. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सातवे स्थान मिळवले.नववर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या एशियन्स चॅंपियनशीप, २०२२ मधील एशियन गेम्स आणि ऑलिंपिक २०२४ मध्ये पदक पटकावण्यासाठी राधिका कसून सराव करतेय.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/radhika-awati-fencing-player-hard-work-olympics-sangli-marathi-news-248312
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_