twitter
rss

🎋सावित्रीबाई फुले विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्टच्या यादीत*

By pudhari | Publish Date: Apr 4 2017

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख असली तरी दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचे स्थान नगण्य असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या यादीवरून दिसून आले आहे. देशातील 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत एकमेव पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नाव असून हे विद्यापीठही दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत तब्बल 10 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 विद्यापीठांत प्रदीर्घ परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचाही समावेश नाही.

दर्जेदार शंभर विद्यापीठांमध्ये बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीचे जेएनयू विद्यापीठ दुसर्‍या, वाराणसीचे बनारस हिंदू विद्यापीठ तिसर्‍या, बंगळुरूची जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च ही संस्था चौथ्या, तर कोलकात्याचे जाधवपूर विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर चेन्‍नईच्या अन्‍ना विद्यापीठ, तेलंगणाचे हैदराबाद विद्यापीठ, दिल्‍ली विद्यापीठ, कोईमतूर-तामिळनाडूचे अमृता विश्‍व विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो. 10 व्या क्रमांकावर पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. सर्वंकष गुणवत्तेच्या बाबतीतही बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर आले असून चेन्‍नई आयआयटी दुसर्‍या, मुंबई आयआयटी तिसर्‍या, खरगपूर आयआयटी चौथ्या, तर दिल्ली आयआयटी पाचव्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ जेएनयू विद्यापीठ, आयआयटी कानपूर, गुवाहाटी आयआयटी, रुरकी आयआयटी आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचा क्रमांक आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, अध्यापनाचा दर्जा, विद्यार्थ्यांशी संवाद/सर्वसमावेशकता, शिक्षणाचा दृष्टिकोन, उत्पादक संशोधन आदी निकषांच्या आधारे ‘नॅक’ समितीकडून शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले होते. चालूवर्षी आठशे नव्या शिक्षण संस्था या प्रक्रियेत सामील झाल्या होत्या, यंदा वैद्यकशास्त्र आणि विधी शाखेची महाविद्यालयांची यादीही मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादीही जाहीर करण्यात आली असून त्यात दिल्‍लीचे मिरांडा हाऊस कॉलेज पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्‍नईचे लोयाला महाविद्यालय दुसर्‍या, दिल्‍लीचे श्रीराम कॉमर्स कॉलेज तिसर्‍या, तिरुचिरापल्लीचे बिशप हेबर महाविद्यालय चौथ्या, तर दिल्लीचे आत्माराम सनातन धर्म महाविद्यालय पाचव्या क्रमांकावर आहे. याखालोखाल कोलकाताचे संत झेवियर्स महाविद्यालय, दिल्‍लीचे लेडी श्रीराम महिला महाविद्यालय, दयालसिंग महाविद्यालय, दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालय व चेन्‍नईच्या वुमेन्स ख्रिश्‍चन महाविद्यालय यांचा क्रमांक लागतो. 10 नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयांत चेन्‍नईच्या आयआयटीचा पहिला क्रमांक असून मुंबई आयआयटी दुसर्‍या, खरगपूर आयआयटी तिसर्‍या, दिल्ली आयआयटी चौथ्या, कानपूर आयआयटी पाचव्या, रुरकी आयआयटी सहाव्या, गुवाहाटी आयआयटी सातव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर चेन्‍नईचे अण्णा विद्यापीठ असून नवव्या क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ, तर 10 व्या क्रमांकावर हैदराबाद आयआयटी आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛳‘शाळासिद्धी’त कोल्हापूर अव्वल*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘शाळासिद्धी’ मानांकनात कोल्हापूर जिल्ह्यातील 3,683 पैकी 610 शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत. कोल्हापूरने पुन्हा एकदा गुणवत्तेत स्थान अधोरेखित केले असून, राज्यात अव्वल ठरले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (न्यूपा) दिल्ली, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी  शाळा मानके व मूल्यांकनाचा (शाळासिद्धी) राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने 30 मार्च 2016 रोजी शाळासिद्धी उपक्रम हाती घेतला. प्रत्येक शाळेने स्व-सुधारणेसाठी उपाययोजना करणे व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे हा उपक्रमाचा उद्देश होता. दिल्ली येथील ‘न्यूपा’ संस्थेने शाळासिद्धी नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ निर्माण केले. त्यावर देशातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी स्वयंमूल्यमापन व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले होते.

प्राथमिक शिक्षण विभागाने सात मानांकनानुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. यात जिल्हयातील 3683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. यात 610 शाळा ‘अ’श्रेणीत असून टक्केवारीचे प्रमाण (16.55) आहे. याचबरोबर जिल्ह्यातील 1012 शाळा ‘ब’श्रेणी आहेत. उर्वरित 919 ‘क’ श्रेणी व 628 ‘ड’ श्रेणीत आहेत. या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद पुणे यांच्याकडून ‘अ’श्रेणीतील शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी 200पेक्षा जास्त निर्धारकांना राज्यभरातून प्रशिक्षीत केले आहेत. ही प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. बाह्य मूल्यमापनानंतर पात्र शाळांना ‘एसएस-2016’ हे शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते पाच वर्षापर्यंत वैध असेल.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿अल्प मानधनवाढीवर शिक्षकांची बोळवण*

By pudhari | Publish Date: Apr 3 ,2017

मुंबई : प्रतिनिधी

दहावी व बारावी पेपर तपासणार्‍या शिक्षकांच्या मानधनात केवळ 1 रुपयांची वाढ करुन राज्य मंडळाने शिक्षकांची बोळवण केल्याची शिक्षकांची तक्रार आहे.

गेल्या 9 वर्षांपासून बोर्डाच्या पेपर तपासणीसाठीच्या मानधनात कोणतीही वाढ केली गेली नव्हती. त्यावेळी झालेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने दहावी व बारावी पेपर तपासणार्‍या परीक्षक व नियामक यांच्यामध्ये असंतोष आहे.  बोर्डाने बारावीला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांकडून 75 रुपये वाढीव परीक्षा शुल्क घेतले आहे. परीक्षक व नियामक यांचे मानधन दुप्पट होईल असे अपेक्षित होते पण  1रुपये एवढी तुटपुंजी  मानधन वाढ करून  राज्य मंडळाने राज्यातील शिक्षकांची चेष्टा केल्याचे मत शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट मुंबईचे अध्यक्ष  प्रा. शरद गिरमकर यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून संघटना मानधनात वाढ करण्याची मागणी करत आहे. शिक्षकांना देण्यात येणारा प्रवास भत्ता हा फक्त 150 रुपये आहे. पुढच्यावर्षी मंडळाने मानधनात योग्य वाढ न केल्यास पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे  टीचर डेमोक्रेटिक फ्रण्टचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.

बर्‍याच वर्षानी ही वाढ केली आहे. मात्र ती समाधानकारक नाही, परीक्षा फी वाढवली आहे. मात्र त्या प्रमाणात मानधनात वाढ केलेली नाही असे मत काँग्रेस शिक्षक सेलच्या महादेव सुळे यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📱अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाइल*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

पुणे  : सुनील जगताप

राज्यात कोणत्याच जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार केली जाते. या तक्रारीची दखल केंद्र सरकारने घेतली असून, त्याचा परिणाम म्हणजे अंगणवाडी सेविकांना आता अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रथमतः राबविण्यात येणार असल्याने प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. शालेय पोषण सुधारणा आणि बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत हा निर्णय केंद्राने घेतला आहे. पोषण सुधारणा प्रकल्पाची पुनर्रचनाही करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्वी केंद्र हिस्सा 90 टक्के व राज्याचा 10 टक्के हिस्सा असे निधीचे प्रमाण होते, परंतु त्यामध्ये बदल करून केंद्र हिस्सा 88 टक्के, तर राज्याचा 12 टक्के हिस्सा करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय 30 एप्रिल 2014 रोजीच घेण्यात आला होता. त्यामध्ये 20 जिल्ह्यातील 317 प्रकल्पात या अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला होता; परंतु हा उपक्रम राबविण्यात त्यावेळचे सरकार आणि अधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

या प्रकल्पाची पुन्हा नव्याने पुनर्रचना करता त्यामध्ये काही प्रमाणात बदलही करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा शालेय पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा पोचविण्याच्या द‍ृष्टीने सरकारने पावले उचलल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी केंद्राने आता थेट अंगणवाडी सेविकांनाच अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये संबंधित सेविकेला सिम कार्डही देण्यात येणार आहे. त्यामुळे पोषण आहाराबाबतची थेट माहिती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा कार्यक्रमांतर्गतच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. *त्यामध्ये धुळे, हिंगाली, जालना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, परभणी व सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.* या जिल्ह्यांतर्गत येणार्‍या 103 प्रकल्पांमधील तब्बल 16 हजार 527 अंगणवाडी केंद्रांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आलेली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना या योजनेअंतर्गत अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ड मोबाईल फोन व डाटा प्लॅनसाठी सिमकार्ड पुरविण्याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्‍तांमार्फत निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे ज्या अंगणवाडीमध्ये पोषण आहाराबाबत हलगर्जीपणा दाखविला जात होता त्यावर आता काही प्रमाणात अंकुश येणार आहे. तसेच, आगामी काळात शालेय पोषण आहारामध्ये सुधारणाही होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯कॉपीबहाद्दर ‘रडार’वर*

By pudhari | Publish Date: Apr 3 ,2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांमध्ये सहभागी झालेले कॉपीबहाद्दर बोर्डाच्या ‘रडार’वर आहेत. 6 एप्रिलपासून कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून (बोर्ड) बारावीच्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. कोल्हापूर विभागात दहावीसाठी 1 लाख 51 हजार व बारावीच्या परीक्षेला 1 लाख 32 हजार विद्यार्थी बसले होते. विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले. मात्र, अनेक परीक्षा केंद्रांवर राजरोस गैरप्रकार सुरू होते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर अनेक विद्यार्थी गैरप्रकारामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.

यावर्षी बारावीच्या परीक्षेला 24 व दहावीच्या परीक्षेला 23 कॉपी प्रकरणे उघडकीस आली. यात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत प्रमाण जास्त आहे. या सर्व प्रकरणांतील कॉपीबहाद्दरांना 6 एप्रिलपासून बोलावण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनाही याची एक प्रत पाठविली आहे. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची निवृत्त अधिकार्‍यांकडून चौकशी होईल, जबाब लिहून घेतले जातील. त्यानंतर चौकशी अधिकार्‍यांचा अहवाल तदर्थ समितीसमोर ठेवण्यात येईल. बोर्डाच्या नियमानुसार दोषी आढळल्यास ‘त्या’ विद्यार्थ्यांची चालू परीक्षेची संपादणूक रद्द व पुढील एका परीक्षेस प्रतिबंध अशी शिक्षा सुनावली जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌻विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

मागासवर्गीय शिष्यवृत्ती पद्धतीमध्ये ऑनलाईनमुळे होणार्‍या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालय व समाजकल्याण विभाग यांच्यात सुसूत्रता आणावी. विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करून सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत वारसा पद्धत पुढे चालू ठेवण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, व्यक्ती वा कुटुंब जास्तीत जास्त किती श्रीमंत असावे याची मर्यादा निश्‍चित करावी, 1989 ते डिसेंबर 2016 या कालावधीतील अ‍ॅट्रॉसिटीच्या संदर्भातील सर्वंकष माहिती देणारी श्‍वेतपत्रिका शासनाने प्रसिद्ध करावी आदी मागण्या करण्यात आल्या. धरणे आंदोलनात संग्राम सावंत, अवंती कवाळे, डॉ. भरत नाईक, प्रा. जयकुमार सरतापे, अजयकुमार देशमुख, प्रमोद पाटील, शिवाजीराव नाईक, पुंडलिक कांबळे, लवकुमार देसाई, वैभव कांबळे, प्रकाश देवकर, दिग्विजय खवनेवाडकर आदी सहभागी झाले होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻  दहावी नापासांसाठी आता कौशल्य सेतू!*

By pudhari | Publish Date: Apr 2 2017

कोल्हापूर : प्रवीण मस्के

दहावीत तीन विषय गेलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. नापास विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाकांक्षी ‘कौशल्य सेतू अभियान’ हाती घेतला आहे. यामुळे आता नापास विद्यार्थीही हिमतीने समाजात स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार आहेत.

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करून चुकीचे पाऊल उचलतात. याचा कुटुंबासह समाजव्यवस्थेवर परिणाम होतो. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्मितीसाठी शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग व राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य सेतू अभियान राबविण्यात येत आहे.

केद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत मेक इन इंडिया, स्कील इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान कौशल्य योजना राबविण्यात येत आहे. देशातील विद्यार्थ्यांना कौशल्याची संधी देणारा चाकोरीबाहेरील हा प्रकल्प ‘कौशल्य सेतू’ सुरू झाला आहे. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयांत नापास झालेल्यांना या उपक्रमात सहभागी होता येईल. ‘एसएससी’ बोर्डाच्या अ‍ॅप्लिकेशनवर शाळेतील नापास विद्यार्थ्यांची नोंद करण्यात येते. आयटीआय समकक्ष हा कोर्स आहे. कोर्ससाठी विद्यार्थ्यांची 80 टक्के हजेरी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची यादी कौशल्य सेतू विभागाकडे जाते. यात पात्र विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

मोबाईल हार्डवेअर रिपेअरिंग, टू व्हिलर, थ्री व्हिलर मॅकेनिक, सॉफ्टवेअर, हँड अ‍ॅब्रॉयडरी, रिटेल सेल्स, आदी कोर्सचा समावेश आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्ज करता येईल. निकालानंतर ऑगस्ट महिन्यात कोर्स सुरु होणार असल्याचे समजते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋 प्राध्यापकांचे बहिष्कारास्त्र मागे*

Maharashtra Times | Updated Apr 2, 2017.

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीची परीक्षा सुरू असतानाच प्राध्यापकांच्या काही संघटनांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेऊन पेपर तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होत, त्यानंतरही सुरू असणारे नॉन ग्राण्टेडच्या ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन अखेरीला शमले आहे.
ज्युनिअर कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दरवर्षी बारावीच्या पेपरचे निमित्त साधून या मागण्या चव्हाट्यावर येतात. मात्र, केवळ आश्वासनांचे फुगे हवेत सोडत पुढे ‘जैसे थे’ च राहतात, या स्थितीमुळे प्राध्यापकांची चांगलीच नाराजी सरकारवर आहे.
यंदाही या प्राध्यापकांद्वारे आंदोलन छेडण्यात आले होते. दिवसाकाठी अवघी एकच प्रश्नपत्रिका तपासून ‘स्लो’ पध्दतीने हे आंदोलन सुरू झाले होते. मात्र शिक्षणमंत्री व शिक्षणसचिवांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समिती याला अपवाद ठरली होती. अखेर मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विना अनुदानित प्राध्यापकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगत बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका घटनेचे अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांनी मांडली.
समितीच्या सदस्यांनी या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात हे बेमुदत आंदोलन छेडले होते. संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

*म्हणून आंदोलन मागे*

महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर छेडण्यात आलेल्या उपोषण आंदोलनास राज्यभरातून सुमारे २२ हजारावर शिक्षकांचा पाठिंबा दर्शविल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मोठ्या पाठिंब्याच्या बळावर हे आंदोलन चिघळले असते तर विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम झाला असता. विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये व मुख्यमंत्र्यांनीही विनाअनुदानित प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿  ‘जेईई मेन’ला दहा लाख विद्यार्थी*

Maharashtra Times | Updated Apr 3, 2017.

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली जॉइंट एन्ट्रन्स एक्सामिनेशन मेन (जेईई) परीक्षा रविवारी देशभर पार पडली. देशभरात १ हजार ७८१ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला देशभरातून सुमारे १० लाख २० हजार विद्यार्थी बसले होते.
गणिताची प्रश्नपत्रिका लांबलचक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. मात्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या होत्या. बीई/बीटेक आणि अन्य अभियांत्रिकी शाखांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये सीबीएसईच्या ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमाचा समावेश होता.

या परीक्षेला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील एक प्रश्न आला होता तर एका प्रश्नाला दोन बरोबर उत्तरांचे पर्याय देण्यात आले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका अ​धिक कठीण होती. त्या तुलनेत रसायनशास्त्र आणि गणिताची प्रश्नपत्रिका सोपी होती. सामान्य श्रेणीतील कटऑफ साधरणपणे ९७-९८ इतका असणार आहे. अंदाजे अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र होण्याची अपेक्षा आहे.

या परीक्षेत वरच्या श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना ३४५ ते ३५० गुण मिळू शकतील, असे राव आयआयटी अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार यांनी सूचित केले. गणिताची प्रश्नपत्रिका सोपी असली तरी मोठी असल्याने ते प्रश्न सोडवायला वेळ लागल्याची माहिती ‘आयआयटीएन्स पेस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण त्यागी यांनी दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣5⃣7⃣

*गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचा वसा*

By pudhari | Publish Date: Apr 2 2017

पिंपरी : वर्षा कांबळे

गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले  कुवत असूनही पुढे जाऊ शकत नाहीत. ज्या शाळांमध्ये ते शिक्षण घेतात, त्यातून प्रत्येकाचा विकास साधेलच असे नाही आणि शिक्षण फक्त नावापुरतेच घेतले न जाता या मुलांनाही शिकून डॉक्टर, इंजिनिअर होता यावे यासाठी आळंदी येथील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’मार्फत मोफत शिकविण्याचे काम करत आहेत.

अजीज-उर-रहमान यांनी 2014 मध्ये जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्टची स्थापना केली. झोपडपट्टी आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी बळ देणे, हा ट्रस्टचा उद्देश आहे. ज्यामुळे ही मुलेही इतर मुलांसारखी इंजिनिअर, डॉक्टर बनतील. पुण्यात आल्यानंतर अजीज-उर-रहमान इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना त्यांनी पाहिले की, त्यांचा एखादा मित्र कोणत्याही विषयात कमजोर  असेल, तर त्याचे संपूर्ण वर्षाचे नुकसान होते. रहमान यांची गणितावर चांगली पकड होती. त्यांनी आपल्या ज्या मित्रांचे गणित कच्चे होते त्यांना गणित विषय शिकविण्यास सुरुवात केली. अशी दोन वर्षे शिकवत राहिल्यानंतर त्यांना कळून आले की, ते चांगले शिकवू शकतात. ही गोष्ट महाविद्यालयात शिक्षक आणि प्राचार्यांना समजल्यावर त्यांना महाविद्यालयात शिकविण्याची परवानगी मिळाली. याबरोबरच गणित विषय शिकविण्याचे काम सुरूच ठेवले.  त्यांच्या मनात विचार आला की, कामाचा अजून  विस्तार करावा.

एक दिवस रहमान शासकीय शाळेत गेले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना आपली इच्छा सांगितली की, शाळेतील मुलांना कॉम्प्युटर शिकवायचा आहे. मुख्याध्यापकांनीही परवानगी दिली; मात्र रहमान यांच्या एकट्याने हे काम होणार नव्हते, मग त्यांनी आपल्या मित्रांची मदत घेतली, ज्यांना त्यांनी यापूर्वी गणित विषय शिकविला होता.

सुरुवातीला त्यांनी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्‍या आळंदी गावातील एका शाळेची निवड केली. या ठिकाणी रहमान आणि त्यांची टीम मुलांना गणित, इंग्रजी आणि कॉम्प्युटर शिकवितात. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दर शनिवारी व रविवारी हे क्लास घेतले जातात, मुलांना गृहपाठही दिला जातो.

हळूहळू कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना माहिती झाले की, रहमान ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ चालवित आहे. तेव्हा कॉलेजमधील 48 विद्यार्थी ट्रस्टमध्ये सामील झाले. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  याप्रकारे दरवर्षी कॉलेजचे विद्यार्थी ट्रस्टशी जोडले जात आहेत. आज ट्रस्टशी 126 विद्यार्थी जोडले गेले आहेत, जे इंजिनिअरिंग क्षेत्रातील आहेत.

‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ गरीब, अनाथ आणि दिव्यांग मुलांना मोफत कॉम्प्युटर, गणित आणि इंग्रजीचे शिक्षण देत आहे. आळंदी गावातील या कोचिंग क्लासेसमध्ये 40 मुलांकरिता रोज सांयकाळी 5 ते 7 पर्यंत शिकविले जाते. यामध्ये मुलांना शिक्षणात येणार्‍या समस्या सोडविल्या जातात; तसेच ज्या कारणामुळे मुलांना अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागते ते शोधून त्यांना पुन्हा शाळेत भरती केले जाते. रहमान यांची इच्छा आहे की, हे काम फक्त आळंदीपुरतेच मर्यादित न राहता दुसर्‍या शहरांमध्ये देखील वाढावे, जेणेकरून जास्तीत जास्त मुले याचा फायदा घेतील.

टीम ही आठवड्यातून एखाद्या दिवशी दिव्यांग मुले आणि गोरगरीब मुलांना शिकवितात. मुलांना शिकविण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्यास प्रोत्साहन देण्याचे कामही करते. यासाठी मुलांचे ग्रुप डिस्कशन, वादविवाद, चर्चा, सामान्य ज्ञान, आणि खेळाचेही प्रशिक्षण दिले जाते.

रहमान यांच्याबरोबर तीन कॉलेजही जोडले गेले आहेत. जास्तीत जास्त तरुण या ट्रस्टशी जोडले जातील, हाच प्रयत्न आहे. कारण हे सर्व एकट्याने होणार नाही. मित्र आणि सदस्यांच्या देगणीवर ट्रस्ट आपला खर्च चालविते; तसेच ज्या विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आणि कोठे नोकरी करत आहेत, असे विद्यार्थी आपल्या पगारातील 10 टक्के रक्कम ट्रस्टसाठी देतात.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

  - http://guruvarykm.blogspot.in/

   या आपल्या Blog ला भेट द्या.....