twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣9⃣

*नामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद*

संतोष जगताप 20/05/2019

नामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत असतात. एक सरकारी अधिकारी असा संवेदनाशील? असे एक नवल त्यांच्याबद्दल असते. नामदेव माळी रचनावादी शिक्षण, शिक्षकांसाठी कार्यप्रेरणा आणि जाणीवजागृती यासंबंधी कार्यरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील विसापूर (ता. तासगाव) हे नामदेव माळी यांचे गाव. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांनी त्यांचे शिक्षण शेतमजुरी व पडेल ते काम आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमावा आणि शिका’ योजनेतील कामे करत पूर्ण केले. ते शिक्षक म्हणून नोकरीला रत्नागिरी जिल्ह्यातील पैसाफंड विद्यालयात लागले.

त्यांना लिहिण्या-वाचण्याचा लळा महाविद्यालयात शिकत असताना लागला होता. ते कथालेखन, कथाकथन करत. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जगण्यानेच कोणासाठी लिहायचे, बोलायचे ह्याचे भान दिले. त्यांनी लिहिलेले ‘शंभर टक्के निकाल’, ‘आभाळदानी’, ‘तरवाड’ हे कथासंग्रह आणि ‘खरडाटणी’, ‘छावणी’ ह्या कादंबऱ्या हे लेखन प्रसिद्ध आहे.

नामदेव माळी यांची धारणा स्वीकारलेले काम स्वत:च्या आनंदासाठी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणाने करत राहवे ही आहे. त्यांनी शिक्षकाची नोकरी करत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता. त्यातून त्यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यांनी त्या पदावर रुजू होतानाच ‘त्यांना स्वत:ला समाधान मिळेल असे काम त्या पदाच्या माध्यमातून करायचे’ असे ठरवले. त्यांच्या कामाची प्रेरणा खेडोपाडी असलेल्या सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले हीच ठरली. ते ‘मला माझ्या मुलांचा आणि शिक्षकांचा अभिमान आहे’ असे म्हणत शाळांतील मुले आणि शिक्षक यांच्यात मिसळून जात. मुलांच्या जेवणाच्या सुट्टीत स्वत:च्या शबनममधील जेवणाचा डबा घेऊन मुलांबरोबर शाळेच्या व्हरांड्यात मांडी घालून जेवणारा असा अधिकारी लाभणे विरळा! साहजिकच, ते जेथे जातील तेथे शिक्षकांच्या कामाचा उत्साह दुणावला जाई. शिक्षकांना त्यांचे सहकारी मानणारा हा अधिकारी, शिक्षकांना त्यांचा भाऊ, मित्र वाटतो. त्यातच माळी यांना त्यांच्या कामात मिळालेल्या यशाचे गमक आहे. ते शिक्षकांना विश्वासात घेतात, त्यांच्या विचारांचा आदर करतात. त्यातून त्यांनी ‘गीतमंच’, ‘धडपड मंच’ अशा उपक्रमांतून शिक्षकांना प्रेरित केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी शाळांच्या दर्ज्यासंबंधी काही अभ्यासकांची त्यांच्या निरीक्षणानुसार प्रतिकूल मते माध्यमांतून समाजासमोर येऊ लागली होती. त्यातून सरकारी शाळांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागला. सरकारी शाळांतील शिक्षणाविषयी निराशेचे वातावरण निर्माण झाले. सरसकट सगळे एकाच मापाने तोलले जाऊ लागले. त्याचा परिणाम मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी  त्यांच्या पूर्ण क्षमतेने राबणाऱ्या शिक्षकांवर होऊ लागला. शिक्षकवर्गात निराशा पसरली. संवेदनशील नामदेव माळी त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या शिक्षकांमधील निराशेने अस्वस्थ झाले.

गोरगरीब, कष्टकरी यांची मुले खेड्यापाड्यांतील सरकारी शाळांमध्ये असतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांची निराशा धोकादायक आहे, हे नामदेव माळी यांच्या लक्षात आले. त्यांना धडपडणाऱ्या शिक्षकांचा उत्साह वाढला पाहिजे, त्यांच्या कामातून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे असे वाटू लागले. म्हणून त्यांनी सरकारी शाळांतील दुसरी बाजू समाजासमोर आणण्याचे ठरवले. त्यांनी महाराष्ट्रातील काही उपक्रमशील शाळांना भेटी दिल्या. त्या शाळांतील उपक्रम समजावून घेतले. त्या शिक्षकांनी जीव लावून उभे केलेले रचनात्मक काम जाणून घेतले. नामदेव माळी त्यातून मुलांना मिळणाऱ्या आनंददायी शिक्षणाने प्रभावित झाले. त्यांनी त्यांचे अनुभव ‘साधना’ साप्ताहिकात शाळाभेट ही लेखमाला लिहून व्यक्त केले. त्यातून ‘शाळा आहे आणि शिक्षणही आहे’ हे वास्तव समोर आले. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवरांनी त्या शाळांना भेटी दिल्या. अनेकांनी त्या शाळांना वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली. त्या लेखमालेचे ‘शाळाभेट’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिक्षणक्षेत्रात उत्साह निर्माण झाला, सकारात्मक बदलाची सुरुवात झाली. ते पुस्तक शिक्षकांना कार्यप्रेरणा देण्यासाठी दीपस्तंभ ठरले आहे.

दरम्यान, नामदेव माळी यांची मिरज तालुक्याला बदली झाली. 2012-13 मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट रचनावादी शिक्षणाच्या प्रयोगाने महाराष्ट्रभर प्रकाशझोतात येऊ लागले होते. ज्ञानप्रबोधिनी, सृजन आनंद विद्यालय, ग्राममंगल, अक्षरनंदन ह्या प्रयोगशील खाजगी शाळांमध्ये रचनावादी शिक्षण अगोदरपासूनच सुरू झालेले होते. कुमठे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी त्या शाळांमध्ये जाऊन रचनावाद समजावून घेतला. त्यांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी रचनावादी शिक्षण उपयोगी आहे हे जाणून कुमठे बीटमधील सरकारी शाळांमध्ये रचनावादी शिक्षणाचा प्रयोग अंमलात आणला. त्यातून शिक्षकांना त्यांच्या कामासाठी नवी दिशा गवसली. शिकवण्यापेक्षा मुलांचे शिकणे केंद्रस्थानी आले. नामदेव माळी यांनी मिरज तालुक्यातही तो प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी प्रतिभा भराडे आणि कुमठे बीटमधील शिक्षक यांच्या मदतीने मिरज तालुक्यातील सर्व शाळांमध्ये रचनावादानुसार शिक्षण चालू केले. नामदेव माळी यांनी स्वत:ला त्या प्रयोगात झोकून देऊन काम केले. प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्या शिकण्याला गती देणारा तो प्रयोग मिरज तालुक्यात यशस्वी झाला. मुलांच्या गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणासाठी कुमठे बीट आणि मिरज तालुक्यातील रचनावाद यांची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली. तो प्रयोग राज्यभरातील शिक्षक, अधिकारी हे तेथे जाऊन समजावून घेऊ लागले. राज्याच्या शिक्षण विभागाने रचनावाद स्वीकारला!

नामदेव माळी यांनी मुलांनी स्वत: विचार करावा, चर्चा करावी, अनुभव घ्यावा, कृती करावी ह्या बाबींना प्राधान्य देणारी रचनावादी शिक्षणपद्धत तालुक्यातील शाळांमध्ये अंमलात आणत असताना आणखी एक उपक्रम हाती घेतला. तो होता मुलांच्या अभिव्यक्तीचा. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांची भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असते. भाषा हे विचार करणे आणि व्यक्त होणे ह्यासाठी उत्तम माध्यम आहे. म्हणूनच मुलांना भाषाशिक्षणामध्ये ‘त्यांचे विचार, अनुभव, भावना, कल्पना इत्यादी परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखनकौशल्य प्राप्त व्हावे’ हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट नमूद करण्यात आले आहे. ते ध्यानात घेऊन माळी यांनी मिरज तालुक्यात मुलांच्या अभिव्यक्तीचा उपक्रम हाती घेतला.

मुलांना त्यांच्या शालेय जीवनात साहित्याची गोडी लागावी, त्यांनी मुलांनी वाचते आणि लिहिते व्हावे म्हणून शिक्षकांना विश्वासात घेऊन त्या उपक्रमाचे महत्त्व आणि गरज विशद केले. शिक्षकांनी ते करण्यासाठी उत्साह दाखवला. त्यांच्यामुळे उपक्रमात जोम आला. मग माळी यांनी शिक्षकांचा ‘सृजन’ नावाचा एक गट कार्यरत केला. उपक्रमाची आखणी केली. स्वत: शाळांमध्ये फिरून मुलांना ऐकते, बोलते आणि वाचते केले. त्यांनी अनुभवलेखन, प्रसंगलेखन असे विषय देत मुलांना लिहिते केले. आवश्यक अशा लेखन कार्यशाळा आणि शिबिरे घेतली. ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत मुलांचा कृष्णात खोत, जी.के. ऐनापुरे, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, बाळ पोतदार, अनंत भावे, गोविंद गोडबोले, भीमराव धुळूबुळू, शशिकांत शिंदे, अविनाश ओगले, दयासागर बन्ने या साहित्यिकांशी संवाद घडवून आणला. मुले आणि शिक्षक यांना लेखनासाठी मार्गदर्शन केले.

‘मुलांनी त्यांच्या अनुभवावर नवीन रचना करावी’ ह्या रचनावादाच्या तत्त्वानुसार मुलांना त्यांचे स्वत:चे विचार, कल्पना मांडण्याची, लिहिण्याची संधी दिली. मुलांनी त्यांच्या सभोवतालचे लिहावे, अनुभवाचे आशयात रूपांतरण करावे, लिहीत असताना अनावश्यक भाग कोणता ते ओळखावे, योग्य शब्दांची निवड करावी, लेखनातून आटीव आशय व्यक्त व्हावा अशा बारीकसारीक बाबींसंबधी मुलांशी संवाद, मंथन होत राहिले. मुले नामदेव माळी यांच्या जवळ अशा संवादांतून येऊ लागली; लिहिलेले त्यांना दाखवण्यासाठी गराडा घालू लागली. एरव्ही साहेब शाळेत गेले, की मैदानातील मुले धावत गुरुजींकडे जातात, साहेब आल्याची वर्दी देतात. नामदेव माळी यांच्या बाबतीत उलटे झाले. ते शाळेत गेले, की मुले धावत त्यांज्याजवळ येऊ लागली. त्यांना हाताला धरून वर्गात नेऊ लागली. तो बदल शिक्षणक्षेत्रात खूप महत्त्वाचा आहे.

मुलांच्या कल्पनांना धुमारे तालुक्यातील शिक्षक, पालक आणि अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुटले. मुले मोठ्यांनी चकित व्हावे असे लेखन करू लागली. मुलांचा तो प्रतिसाद बघून नामदेव माळी यांनी आणखी एका कामाची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे ठरवले. सूत्रसंचालन, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मुलाखत अशा सर्व जबाबदाऱ्या मुलांना दिल्या गेल्या. ‘सब कुछ मुले’ असणारे महाराष्ट्रातील ते पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन. ते यशस्वी झाले. मुलांना भरभरून आनंद देणाऱ्या त्या संमेलनाने विद्यार्थी साहित्य संमेलनाचा नवा पायंडा पाडला गेला. मिरज तालुक्यातील मुले दरवर्षी ते संमेलन यशस्वीपणे पार पाडतात. मुलांच्या लेखनकौशल्याची चुणूक संमेलनात दिसून येते.           

कविता, गोष्ट, अनुभवलेखन, प्रसंगलेखन अशा रूपातील मुलांचे लेखन पुस्तकरूपातही प्रसिद्ध झाले आहे. मुलांनी लिहिलेली ‘शाळकरी मुलांच्या कविता’, ‘किलबिल गोष्टी’ ही पुस्तके दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने प्रकाशित केली आहेत. ह्या उपक्रमाने मुलांना आत्मबळ प्राप्त झाले. रानोमाळ भटकणाऱ्या पारधी समाजातील पवन आणि अभय पवार ही मुले किलबिल गोष्टींतून त्यांचे जगणे व्यक्त करता करता ‘लई शिकणार मी’ असा निश्चय करून पुढे जात आहेत.

सृजन आनंद विद्यालय, कमला निमकर बालभवन, खेळघर, आनंदनिकेतन अशा काही प्रयोगशील शाळा मुलांच्या लेखनाचे उपक्रम घेतात. नामदेव माळी यांनी तो उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेतला. त्या शाळा खेड्यापाड्यांत आहेत. तेथील बहुतांश मुलांना वाचण्याचाही कौटुंबिक वारसा नाही. माळी यांनी त्या मुलांना लिहिण्या-वाचण्यास प्रेरित केले. मुलांनीच बालसाहित्य लिहिणे हा प्रवाह सुरू झाला आहे. तो चळवळीचे रूप धारण करू पाहत आहे.

नामदेव माळी यांनी अशा लिहित्या मुलांचा शोध घेतला. त्यातून सांगोला तालुक्यातील सोनाली गावडे ह्या मुलीचे लेखन त्यांच्या हाती आले. सोनालीच्या लेखनातील जिवंतपणा त्यांना भावला. मग माळी यांनी सांगोला तालुक्यातील अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी लेखन कार्यशाळा घेतली. त्यांना लेखनासाठी मार्गदर्शन केले. त्यातून सोनाली गावडे हिची दैनंदिनी पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. सांगलीच्या सृजन प्रकाशनाने ‘माझी दैनंदिनी’ हे पुस्तक प्रकाशित केले. ग्रामीण भागातील, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सोनालीची ती दैनंदिनी. अशा स्वरूपाची व पुस्तकरूपात प्रकाशित झालेली महाराष्ट्रातील ती पहिली दैनंदिनी असावी. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सोनालीच्या दैनंदिनीचा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

नरेंद्र लांजेवार, पृथ्वीराज तौर, तृप्ती अंधारे, गोविंद पाटील, रवींद्र जंगम, मंजुषा स्वामी इत्यादी साहित्यिक, शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी पूर्वीपासून उपक्रम घेत आहेत. नामदेव माळी यांनी तो उपक्रम चळवळीत रूपांतरीत केला आहे. मिरज तालुक्यातील सारिका पाटील, गौतम पाटील, समृद्धी शेलार, तेजश्री पाटील, शिवानी चौगुले ह्या विद्यार्थ्यांचे कवितासंग्रह ‘छोट्या दोस्तांनी लिहिलेले साहित्य’ या उपक्रमात सांगलीच्या सृजन प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत. त्या मुलांना लिहिण्याचा लळाच लागला आहे. ती मुले खेड्यापाड्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांतील आहेत. त्यांचे लेखन, त्यातून समोर येणारे त्यांचे भावविश्व आणि अभिव्यक्त होण्याची त्यांची शैली कसदार आहे. त्यातून सृजनशीलतेचा मळा फुलत आहे. आनंददायी शिक्षण, भाषा संवर्धन आणि अभिव्यक्ती यांसाठी आश्वासक रचनात्मक कार्य उभे होत आहे. शिकवून कोणी शिकत नसते; पण मुलांच्या अंगचे सुप्त गुण हेरून त्यांना अभिव्यक्तीची संधी देणे हे शिक्षकाचे कार्य आहे ह्या धारणेने नामदेव माळी यांनी त्यांच्यातील शिक्षकाला कायम जागते ठेवले आहे. त्यांनी ‘मुलांचे लेखन ही गांभीर्यपूर्वक करवून घेण्याची गोष्ट आहे’ हे तत्त्व पक्के करून त्यांची लेखन चळवळ आकाराला आणली आहे. त्या चळवळीतून पुढे आलेल्या गौतम पाटील ह्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ‘गौतमच्या कविता’ ह्या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘बालकवी पुरस्कार’ मिळाला आहे. ह्या पुरस्काराने मुलांच्या लेखन चळवळीला बळ मिळाले आहे.

मुले त्यांच्या भाव-भावना शब्दांत गुंफत आहेत. शिक्षक आणि पालक यांनी मुलांना अभिव्यक्तीसाठी उद्युक्त केले आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ पुरवले तर किती सौंदर्यपूर्ण आणि आशयघन लेखन हाती येऊ शकते ह्याचा उत्तम नमुना नामदेव माळी यांच्या ह्या उपक्रमातून समोर आला आहे. नामदेव माळी म्हणतात, ‘हा उपक्रम म्हणजे मुलांना चांगला माणूस बनवण्याची पूर्वतयारी आहे.’ अभिव्यक्ती हा स्वातंत्र्याचा उद्गार आहे. म्हणून शालेय वयातच मुलांना अभिव्यक्तीची सवय लावण्यासाठी प्रयत्नरत असलेले नामदेव माळी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. उद्याच्या निकोप समाजासाठी ती मूलभूत रुजवण आहे. 

नामदेव माळी 8657252962/9423869404
namdeosmali@gmail.com

- संतोष जगताप,
santoshjagtaplonvire@gmail.com

https://www.thinkmaharashtra.com/node/3324

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣7⃣

*🌀जैद बारस्करचा प्रामाणिकपणा...*

_*जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने परत केले सापडलेले २८००० रुपये*_

गुरुवर्य न्यूज,कवठेमहांकाळ.
दि.१४/०३/२०१९

      नागज :-    आज पैशाच्‍या  मागे सर्वजण धावताना दिसतात. केवळ शेपाचशे रुपयांसाठी समाजात भांडणे लागल्‍याचे आपण पाहिले आहे. पण अठ्ठावीस हजार रुपयांची रक्कम सापडूनही परत करण्याचे औदार्य नागज येथील शाळकरी विद्यार्थ्याने दाखवले आहे.
   ज्या वयात पैशासाठी हठ्ठ करायचा त्या वयात मोठी रक्कम सापडूनही ती रक्कम प्रामाणिकपणे परत जैदने परत केली आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या जिल्हा परिषद शाळेतील मुलाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
       जैद जहिर बारस्कर हा विद्यार्थी नागज येथिल जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकत आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळ सत्रात सुरु आहे.
    काल संध्याकाळी ५ वाजता जैद  नमाजला मशीदीमध्ये जात होता. या मशीद जवळ हाजी मुन्ना तांबोळी यांचे बांगड्यांचे दुकान आहे. या दुकानाजवळ जैद आला असताना त्याला रस्त्यावर पैशांचे पुडके पडलेले दिसले. काही  क्षणासाठी तो थोडा घाबरला पण त्याने ते पैसे उचलले आणि त्या शेजारच्या दुकानातील मुन्ना तांबोळी यांना ते पैसे दिले. मुन्ना तांबोळी आणि गावकऱ्यांनी  पैशाबद्दल चौकशी केली असता नागज गावात डाळींब आणि चिकू खरेदीसाठी नांदेड ,सोलापूर येथिल व्यापारी लोकं आले आहेत, ते व्यापारी नमाजला जाताना एका व्यापाऱ्याचे पैसे पडल्याचे समजले... पूर्ण चौकशी करून त्या व्यापाऱ्याला ते २८००० रुपये देण्यात आले.त्या व्यापाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल जैदला ५०० रु बक्षीस म्हणून दिले...

आज शाळेमध्ये जैदचे त्याचे वर्गशिक्षक जुबेर पटेल आणि सर्व मित्रांनी अभिनंदन केले ,जैदच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात कौतुक होत आहे, खरोखरचं जैद बारस्कर याने कसलीही लालसा न दाखवता प्रामाणिकपण पैसेे परत करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
    जैद तुला गुरुवर्य ग्रुपचा सलाम...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣5⃣

*👩🏻Women’s Day 2019 – हमिदा खान: महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ले सर करणारी ‘हिरकणी’*

*_२००० साली तर त्यांनी चक्क १५० गड किल्ल्यांना भेट दिली_*

साभार -लोकसत्ता ऑनलाइन | March 8, 2019 10:09 am

गड- किल्ले फिरणं ही एक धुंदी असते… आणि जो ती धुंदी अनुभवतो त्यालाच ती जाणवते. गड- किल्ले फिरल्यावर आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल जास्त आपुलकी वाटू लागते. अशीच एक धुंदी जोपासत आहेत मुंबईत राहणाऱ्या हमिदा खान.
१९९० साली हमिदा यांनी युथ हॉस्टेल सोबत त्यांचा ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. शाळेत असल्यापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना कुतूहल होतं आणि म्हणूनच त्यांनी गड- किल्ले भटकंतीला सुरुवात केली. पण त्यांच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती १९९९ साली. कारण तेव्हाच त्यांना गड- किल्ल्यांची माहिती गोळा करण्याचा ध्यास लागला. १९९९ साली त्यांच्या या प्रवासाला कलाटणी देण्याचे मुख्य कारण म्हणजे या एका वर्षात त्यांनी एकूण १०० गड किल्ल्यांना भेट देत त्या किल्ल्यांच्या माहितीचे संकलन केले. त्यांनी संकलित केलेल्या माहितीमध्ये गडाच्या इतिहासाबरोबरच गडाचे फोटो, तिथे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक व गडावरील वास्तूंची नोंद अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
१९९९ नंतर हमिदा यांनी गड- किल्ल्यांना भेट देण्याचा सपाटाच लावला. २००० साली तर त्यांनी चक्क १५० गड- किल्ल्यांना भेट दिली. २००१ साली आणखी शंभर गड- किल्ले त्यांनी सर केले. अशा रितीने अवघ्या ३ वर्षांमध्ये हमिदा यांनी महाराष्ट्रातील ३५० गड- किल्ले सर केले. विशेष म्हणजे त्या कधीच एका विशिष्ट ग्रुपसोबत या मोहिमांना जात नसत. जो ग्रुप ट्रेकिंगला जाणार असेल त्यांच्यासोबत त्या गड- किल्ल्यांवर जातात. अगदीच कोणी नसेल तर अनेकदा त्या एकट्याही प्रवास करत. त्यांच्या सोलो प्रवासाच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, ‘अनेक चांगले अनुभव मला या प्रवासात आले. पण काही प्रसंगी मला खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. बऱ्याचदा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील लोकांनाही गडाचं नावदेखील माहित नसायचं. मग गावातील पोलीस पाटील किंवा शाळेतून काही माहिती मिळतेय का हे पाहून मी गड सर करायचे.’
असाच एक प्रसंगाबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘एकदा भर पावसात निमगिरी किल्ल्यावर मी जात होते. किल्ल्यावर पोहचल्यावर तिथे कोणीच नव्हते म्हणून मी गडावरील मंदिरापाशी जाऊन बसले. तेव्हा अचानक एक गुराखी तिथे आला आणि माझ्याशी संवाद साधू लागला. काही वेळ गेल्यावर मला त्याच्या हालचाली काही बऱ्या वाटल्या नाहीत. म्हणून मी हातात एक मोठा दगड घेऊन त्या माणसाला अद्दल घडवायचं ठरवलं. माझं हे रूप पाहून तो तिथून पळून गेला.’ हमिदांच्या या २० वर्षातील गड- किल्ल्यांच्या प्रवासातील आणखीन एक वाईट अनुभव त्यांना नळदुर्गला जात असताना रात्रीच्या वेळी तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत त्यांना मुक्कामासाठी राहू दिले नव्हते तेव्हा आला. महिलांना तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत राहण्याची परवानगी नाही असं सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. अशा प्रसंगांसंदर्भात बोलताना हमिदा म्हणतात, ‘मुलींनी एकटा प्रवास करताना जरा काळजी बाळगावी. एखादं धाडस करताना निसर्गाची साथ मिळते पण काही वेळा माणूसच माणसाला साथ देत नाही हे लक्षात घ्यायला हवे.’
आजवर हमिदा यांनी महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ल्यांना भेट दिली आहे. २०१८ साली ७ जून रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हमिदा खान यांचा संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते रायगडावर सत्कार करण्यात आला.
हमिदा यांनी महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांबरोबरच राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाबसारख्या राज्यांमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळांनाही भेट दिली आहे. वयाचं अर्धशतक गाठणाऱ्या हमिदा इथवरच थांबणार नाहीयेत. सामान्यांमध्ये फारसे परिचित नसलेले अजून बरेच गड- किल्ले त्यांना शोधून काढायचे आहेत. त्यांनी शोधलेला एक किल्ला म्हणजे बारड्याचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा कारंजा किल्ला.
हमिदांचा गड- किल्ल्यांविषयीचा अभ्यास नक्कीच दांडगा आहे. म्हणूनच सध्या ट्रेकच्या नावावर जी पिकनिक चालू आहे त्याविषयी त्या नाराजी व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘दुर्गसंवर्धन करताना अनेकदा गडाच्या मूळ वास्तूंना डावलले जाते जे चुकीचे आहे. त्यामुळे संवर्धन नक्कीच करा पण काळजीपूर्वक आणि निसर्गाची साथ घेऊनच करा.’
गड- किल्ल्यांवर भटकंती करत त्यामाध्यमातून इतिहास संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या हमिदा खान यांना जागतिक महिनादिनानिमित्त ‘गुरुवर्य ग्रुप’चा मानाचा मुजरा....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

https://www.loksatta.com/maharashtra-news/womens-day-2019-hamida-khan-women-who-visited-400-forts-in-maharashtra-1854062/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣3⃣

*अभिनंदनची बिग फाईट!*

Published On: Mar 01 2019 1:33AM

_जमावाने घेरताच गोळीबार करत अभिनंदन धावत सुटले. थोडा वेळ मिळताच खिशातील कागदपत्रे गिळून नष्ट केली अन् मग झुंजत राहिले जमावाशी..._

*मुंबई : पुढारी वृत्तसेवा*

एखाद्या हॉलीवूड युद्धपटाच्या नायकाप्रमाणे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चवताळलेल्या पाकिस्तानी तरुणांशी झुंजले. विमान कोसळल्यानंतर जखमी अवस्थेत असूनही, त्यांनी जे धाडस दाखविले, ते पाहून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील. खिशात असलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि नकाशे शत्रूच्या हाती लागू नयेत, म्हणून त्यांनी काही चक्‍क गिळून टाकली, तर काही पाण्यातून बुडवून नष्ट केली.

पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र ‘डॉन’ने याबाबतचे वृत्त होरान गावच्या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने कथन केलेल्या माहितीवरून प्रसिद्ध केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील होरान गावच्या आकाशात सकाळी पावणेनऊ वाजता आगीचे मोठे लोळ दिसले. त्यानंतर अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले. त्यांचे लँडिंग खूपच सफाईदार होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हे ठिकाण सात कि. मी. अंतरावर आहे.

खाली उतरताच अभिनंदन यांनी स्थानिक तरुणांना हाक दिली आणि मी कुठे आहे; हा भारत आहे की पाकिस्तान, अशी विचारणा केली. त्यातल्या एका चालू तरुणाने ‘तू भारतातच आहेस’, असे सांगितले. ते ऐकताच अत्यानंद झालेल्या अभिनंदन यांनी भारतीय लष्कराच्या घोषणा दिल्या. भारतातील हे नेमके कोणते  ठिकाण आहे, असे त्यांनी विचारले असताना एका तरुणाने सांगितले, हे किलान आहे. तोपर्यंतही अभिनंदन यांना आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज आलेला नव्हता.

माझी पाठ प्रचंड दुखत आहे, मला थोडे पाणी द्या, अशी विनंती त्यांनी  केली. मात्र, अभिनंदन यांनी दिलेल्या भारतीय घोषणांमुळे जमलेल्या तरुणांचा पोटशूळ उठला होता. त्यांनी अभिनंदन यांना पाणी तर दिले नाहीच, उलट ‘पाकिस्तान आर्मी झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि तेव्हा कुठे आपण पाकिस्तानच्या हद्दीत आहोत, याची जाणीव अभिनंदन यांना झाली. त्यांनी कमरेचे पिस्तूल काढले आणि हवेत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पाक तरुणांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले.

हातात पिस्तूल घेऊन अभिनंदन सुमारे अर्धा किलोमीटर विरुद्ध दिशेने धावत राहिले. त्यांचा पाठलाग करणार्‍या तरुणांना घाबरवण्यासाठी अभिनंदन यांनी आणखी काही फैरी हवेत झाडल्या. याचदरम्यान ते एका पाण्याच्या डबक्याजवळ आले. तेथे थांबून त्यांनी खिशातली कागदपत्रे आणि नकाशे बाहेर काढली. काही कागदपत्रे त्यांनी गिळून टाकली आणि काही पाण्यात फेकून नष्ट केली.

तोपर्यंत पाठलाग करणारे तरुण त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांनी अभिनंदन यांना त्यांच्याजवळचे पिस्तूल टाकून देण्यास बजावले. एकाने अभिनंदन यांच्या पायावर वार केला. इतरांनीही अभिनंदनना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही जणांनी त्यांचे दोन्ही हात धरून त्यांना फरपटत नेले. या परिस्थितीतही अभिनंदन या तरुणांशी झटापट करत राहिले. तोपर्यंत पाक लष्कराचे सैनिक तेथे पोहोचले आणि त्यांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले. ‘अभिनंदन यांनी या तरुणांना मोठ्या धाडसाने खूपच झुंजवले’, असे प्रत्यक्षदर्शी महंमद रज्जाक चौधरीने सांगितले.

भारताचा शूर योद्धा अभिनंदन यांना गुरुवर्यचा सलाम.....!