twitter
rss

November 30

विद्यार्थ्यांनी तयार केला सौरऊर्जेवरील ‘एसी’

म. टा. वृत्तसेवा, येवला

तंत्रनिकेतन अथवा अभियांत्रिकी कॉलेज म्हंटले की त्यातील भावी अभियंत्यांच्या अंगी असलेला जिज्ञासूपणा अन् विज्ञान युगातील वाटचाल लक्षात घेऊन शोधक वृत्तीने टाकलेले पाऊल हमखास समोर येते. येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी कॉलेजच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी शोधक वृत्तीतून सौरऊर्जेवर चालणारे 'एअर कंड‌िशनिंग उपकरण' साकारण्याची किमया केली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक अन् विजेची बचत करणाऱ्या उपकरणाची दखल या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये देखील घेण्यात आली आहे.
सर्वसामान्यपणे 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्ट‌िम'चा वापर करून 'एअर कंड‌िशनिंग'ची निर्मिती केली जात असते. त्यासाठी विविध रेफ्रिजरेंट वापरले जातात. मात्र, त्यातील काही रेफ्रिजरेंट हे पर्यावरणास घातक समजले जातात. तसेच त्यांची किंमत देखील अधिक असते. मात्र एसएनडीच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र या 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीम'चा वापर न करता इतर पर्यायांचा अभ्यास करून 'पेल्टीयर ईफेक्ट'वर आधारित एअर कंडीशनिंग उपकरण बनवले आहे. यामध्ये त्यांनी सौर उर्जा प्लेट, पेल्टीयर मॉडूल, पंखा, हिट शिंक, बॅटरी आदींचा वापर केला. या उपकरणाचा मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. तसेच सौर उर्जाचा वापर केल्यामुळे विजेची बचत होते, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सुमित खंडीझोड, खलिल शेख, बिपीन ढोकळे, तुषार सिंगर या यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने या उपकरणाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रबंध देखील प्रसिद्ध केला आहे. हे उपकरण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रा. एस. जी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. एम. ए. व्येंकटेश, प्रा. व्ही. जी. भामरे, प्रा. एस. पी. बडगुजर आदींनी या विद्यार्थ्यांच्या शोधवृत्तीचे तालुक्यात तसेच शैक्षणिक वर्तुळात कौतुक केले.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   
गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली 

November 22

संकटावर मात करत पिता-पुत्रांची "स्वप्नील'भरारी

- - सकाळ वृत्तसेवा


मालेगाव - संकटे कितीही येवोत, नाउमेद न होता त्यातून मार्ग काढत विजयाचे लक्ष्य ठेवून वाटचाल कशी करायची, हे शिकावे ते नाशिक जिल्ह्यातील अरुण पवार व वैभव पवार या पिता-पुत्रांकडून. अनेक वर्षांच्या पोल्ट्री उद्योगात प्रत्येक संकटाने त्यांच्या क्षमतेची परीक्षा पाहिली. मात्र, हिंमत, चिकाटी, अन्य पूरक व्यवसायाचा आधार, व्यावसायिक सलोखा जपणे, मेहनत आदी गुणांच्या आधारावर "स्वप्नील ऍग्रो ऍण्ड पोल्ट्री‘ कंपनी स्थापन केली. त्याची उलाढाल सुमारे 25 कोटींच्या घरात पोचवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

देवळा व चांदवड या दुष्काळी तालुक्‍यांच्या सीमेलगत वडाळागावातील बी.एस्सी., बी.एड. झालेले अरुण पवार शिक्षकीसेवेत कार्यरत होते. त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तो एक हजार पक्ष्यांपासून. भांडवलाची स्थिती बिकट असताना श्री. पवार नेटाने या उद्योगात उतरले. पुढे शिक्षक व शेतकरी अशा दोन्ही आघाड्या एकावेळी सांभाळणे शक्‍य न झाल्याने नोकरीचा राजीनामा देत ते पूर्णवेळ पोल्ट्री उत्पादक झाले. अर्थात, या वेळचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईच्या एका व्यापायाने पिल्ले खरेदी केली आणि मालासह पोबारा केला. दरम्यानच्या काळात पोल्ट्रीला जोड म्हणून सात एकर क्षेत्रावर भगव्या डाळिंबाची लागवड केली. पुढे ही संपूर्ण डाळिंब शेती तेल्याच्या कचाट्यात सापडली अन्‌ संपूर्ण बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर वाइन द्राक्षाची लागवड केली व पुढील वर्षात वाइन उद्योगाचेही तीन तेरा वाजले. या काळात पोल्ट्री व्यवसाय हळूहळू रुळत चालला होता. या व्यवसायातून घरप्रपंचाला आधार मिळण्याइतके उत्पन्न मिळत होते. मात्र, लागोपाठ दोन वर्षांच्या अंतराने "बर्ड फ्लू‘च्या साथीच्या तडाख्याने पवार यांना झोडपून काढले. या काळात पावणेदोन लाख पक्ष्यांचे नुकसान झाले. जोडव्यवसाय म्हणून त्यांनी जेसीबी मशिन घेतले. मात्र, उत्पन्नापेक्षा उधारीच अधिक झाल्याने हा व्यवसायही बंद करावा लागला.


यानंतर वैभव पवार यांचे या व्यवसायात आगमन झाले. कृषी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत वैभवने कुक्कुटपालन हा विषय अधिक तन्मयतेने समजून घेतला. पॅंरेट्‌स पक्षी (बीडर) फार्म सुरू करण्याची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात आणली. बीडर फार्मचे पक्षी याच उद्योगातील एका आघाडीच्या कंपनीकडून घेतले जातात. त्यापासून अंडी व पक्षी तयार केले जातात. व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून वैभवने एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. व्यवसायातील सखोल बारकावे, बाजारातील उलथापालथ समजावून घेतली. राज्याबाहेर जाऊन अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेतल्या. शिक्षण, अनुभव, नवीन तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर विविध ठिकाणी व्यवसायाच्या जागी जाऊन पाहणी केली. अनावश्‍यक खर्चावर निर्बंध घातले तर उत्पादन खर्चात आमूलाग्र बदल होतो, हे वैभवला समजले. व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यापेक्षा स्वत:च अडतदार होऊन थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यास सुरवात केली. वजनकाट्याचा व्यवसाय सुरू केला. वाया जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण, खेळत्या भांडवलाची तजवीज, पक्ष्यांना पाण्यासाठी निपल सिस्टिम, खाद्य देण्यासाठी स्वयंचलित पद्धतीचा वापर केला. जिद्द, चिकाटी, नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर वैभवने आपला पोल्ट्री व्यवसाय एका नव्या उंचीवर नेला आहे.

November 17

मजूर दांपत्याची कन्या झाली "सी.ए"


- - सकाळ वृत्तसेवा

पाचोरा - मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. बेताची आर्थिक परिस्थितीही अशा ध्येयवेड्यांचा आड येऊ शकत नाही, याची प्रचिती खरजई (ता. चाळीसगाव) येथील मूळ रहिवासी असलेल्या संगीता कदम हिने दिली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) झालेल्या संगीताच्या यशाने मजुरी करणाऱ्या मायबापाच्याही कष्टाचे चीज झाल्याची यशोगाथा अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

खरजई (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र गोपीचंद कदम हे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नाशिकला वास्तव्यास आहेत. ते सेंट्रिंग काम करतात, तर त्यांच्या पत्नी बेबाबाई कदम धुणे, भांडी व स्वयंपाकाची कामे करून फाटक्‍या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतात. कदम दाम्पत्याला तीन मुली असून, या मुलीही शिक्षणासोबत आई-वडिलांना मदतीचा हात देतात.

*काम करून शिक्षण*

संगीता ही घरातील मोठी मुलगी. भाऊ नसल्याने आपण आई-वडिलांना मुलाप्रमाणे आधार द्यावा, या विचाराने प्रेरित झालेली. संगीताने प्रतिकूल परिस्थितीत आईसोबत कामाला जाऊन मिळेल तेवढ्या पैशांतून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. चांगल्या मैत्रिणींचा सहवास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तिने सी.ए. होण्याचा निर्धार केला आणि अभ्यासासाठी कंबर कसली. या कुटुंबातील एकमेव शिक्षित असलेले संगीताचे काका मो. ग. कासार (भडगाव) यांनी संगीताला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात संगीता सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली. संगीताची ही भरारी खरजई परिसरात कौतुकाचा विषय बनली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

November 9

गरजूंपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवणारे शिक्षक


नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांवरच विद्यार्थ्यांची जडणघडण अवलंबून असते, असे म्हणतात. अर्थात, हे शिक्षक म्हणजे चार भिंतींत शिकवणारे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर भिंतीबाहेरही अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदान करणारे शिक्षकही तितकेच आपल्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. आदिवासी भागात, खेड्यापाड्यांत, तसेच रात्रीच्या शाळेत, रस्त्यावरच्या दिव्याखाली वंचितांना, गरजूंना शिक्षण देणारे शिक्षक हे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत. अशाच काही आदर्श शिक्षकांचा येथे उल्लेख करता येईल.


*कोरकूंच्या लेकरांसाठी*

कोरकू आदिवासींच्या मुलांमध्ये शाळा सोडण्याचे आणि शाळेत न जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही मुले असे का करतात, याचा शोध ‘उन्नती इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड एज्युकेशनल चेंज’ या संस्थेने घेतला. त्यांना कारण सापडले. कोरकू मुलांची मातृभाषा कोरकू आणि शिक्षणाची भाषा मराठी. या मराठीचीच त्यांना भीती वाटते. ती घालवण्यासाठी देशमुख महिन्यातून दोनदा अकोल्याला जातात. तिथल्या कोरकू मुलांना मराठीचे धडे देतात. गोरेगाव येथील दी शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत प. बा. सामंत शिक्षण समृद्धी प्रयास हे केंद्र चालवण्यात येते. त्याच्या प्रमुख म्हणून त्या काम पाहतात.


*गरीब विद्यार्थ्यांना आधार*

November 3


...तरीही ‘ती’ एमआयटीत पोहोचली. मुंबईकन्या मालविका जोशीची उत्तुंग भरारी


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र नसले की, कॉलेजामध्ये प्रवेश
ही मिळत नाही. मात्र मुंबईची कन्या मालविका जोशीने हे
समीकरण मोडत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

दहावी आणि बारावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र नसतानाही केवळ
आपल्या ज्ञानाच्या जोरावर या मालविकाने चक्क मॅसॅच्युसेट्स
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (एमआयटी) प्रवेश मिळवला
आहे. मालविकाचे कम्प्युटरमधील ज्ञान आणि ऑलम्पियाड
स्पर्धेतील तिची कामगिरी लक्षात घेता एमआयटीने
तिच्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत.
मालविकाच्या कामगिरीबद्दल सांगताना तिची आई सुप्रिया
जोशी म्हणतात, मालविकाने दादर पारसी युथ असेम्ब्ली या
शाळेत सातवीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता
ती एमआयटीत बॅचलर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत आहेत.
मालविकाने इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ इन्फॉरमेटिक या
स्पर्धेत दोन रौप्य आणि एक कांस्य पदाची कमाई केली असून या
कामगिरीच्या जोरावर एमआयटीने तिच्याशी संपर्क साधत
तिच्यासाठी शिक्षणाची दालने खुली केली आहेत. यासाठी
तिला एमआयटीकडून शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे.

मालविकाला कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्यात
पहिल्यापासून फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे तिने सुरुवातीला
एमआयटीने दिलेला प्रस्ताव फेटाळला होता. मात्र त्यानंतर
तिने संस्थेबाबत आणि अभ्यासक्रमाबाबत माहिती गोळा केली,
आणि त्यानंतर होकार कळवला, असेही तिच्या आईने सांगितले.
तिच्याकडे दहावी आणि बारावीची मार्कशीट नसली तरी
एमआयटीत प्रवेश घेताना तिचे कयुटरमधील ज्ञानाचा एक
अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतरच तिची निवड
करण्यात आली, असेही तिच्या आईने सांगितले.
आपल्या मुलांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली
नाही. तर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते.
मालविकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही तिच्या
आईने सांगितले. तर मालविकाला आयआयटीत प्रवेश घ्यावायचा
होता. मात्र तिच्याकडे बारावीचे प्रमाणपत्र नसल्याने तिला
तिथे प्रवेश नाकारण्यात आला होता, असे तिचे शिक्षक महेंद्र
करकरे यांनी सांगितले.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   

गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली