🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣0⃣4⃣
*👩🏻 नवरात्र विशेष 👩🏻*
*गवंडी काम करणाऱ्या सुनिता गायकवाड यांची यशोगाथा*
साभार ~ रामदास वाडेकर
टाकवे बुद्रुक : कधी काळी घरात मूठभर धान्य नव्हते, खायला पावसाळ्यात शेताच्या बांधावरची कुर्डूची भाजी, आणि खेकडे पकडून दिवस निघायचे, त्याच घरात आर्थिक सुबत्ता आली आहे ,शिवाय दिमतीला चारचाकी वाहन आले, इतकी किमया हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करणाऱ्या सुनिता सुरेश गायकवाड यांनी साधली आहे.
आई एकवीरा देवीनेच हे बळ दिले आहे.त्यामुळेच तिच्या अखंड भक्ती पोटी ती नवरात्रात निराकार उपवास धरते. तिच्या वर माझी निस्सीम भक्ती व श्रद्धा आहे. म्हणूनच मी लढत राहिले, कष्ट करीत राहिले. त्या आईचीच आमच्या वर कृपा आहे.
कांब्रे आणि पंचक्रोशीतील अनेकांना निवारा बांधून, शौचालय बांधून देण्यात त्यांचा हातखंडा आहे, पुरूषाला ही लाजवेल असा त्यांच्या कामाचा वेग आहे. मुळच्या साई गावातील छगन जाधव व सुमन जाधव यांची थोरली लेक,असल्याल्या सुनिता यांच्या पाठीवर जाधव दांपत्याला आणखी चारजणी झाल्या,मुलगा नाही अशी सुरूवातीला आई वडीलांना खंत,त्यातच वडील व्यसनाधीन झाले.
त्यामुळे जेमतेम पाचवी पर्यत मध्यावर शिक्षण सोडून सुनिता ला दहीवली या आजोळी राहून वयाच्या अकराव्या वर्षीच रोजंदारीवर जावे लागले. पुढे चौदाव्या वर्षी कांब्रे तील सुरेश गायकवाड यांच्याशी विवाह होऊन जाधवांची लेक गायकवाडांच्या घराची लक्ष्मी झाली. नव्यानेच नऊ दिवस सरले, आणि विभक्त कुटुंबाच्या झळा पुन्हा पदरी पडल्या.
पाहुणे म्हणून आलेल्या माहेरच्या माणसांना चहा करायला घरात साखर आणि चहा पावडर नाही, म्हणून भिंतीच्या आडोशाला नवरा बायकोचे डोळे पाणावले, इतक्या काही संपले नाही. घरात मूठभर धान्य नाही, की आमटीला कडधान्य नाही. पावसाळयात खेकडे गिरवून त्यांची दोन वेळेला पुरले इतके कालवण करायचे, कधी कुर्डूची भाजी तर कधी माठाची भाजी खायची.
नवरा बायको सुरूवातीला गवंडयाच्या हाताखाली बिगारी म्हणून राबायला लागले, हे दिवस पलटायला पाहिजे, आपल्या घरात पसाभर धान्य शिजेल पाहिजे, पोटभर खायला तर मिळालेच पाहिजे पण आपल्याला प्रगती करायची आहे, पुढे जायचे आहे.
हा ध्यास घेत सुनिता गवंडी काम शिकण्याचा प्रयत्न करू लागल्या, एकनाथ नाणेकर या मिस्त्रीने त्यांच्यातील कलेला वाव दिला, सुरूवातीला वीटाचे बांधकाम,त्यानंतर त्यावर प्लास्टर, मग दगड काम शिकण्यास त्या रस घेऊ लागल्या, प्लास्टर करताना वाळू सिंमेटने भरलेली थापी सरळ मारता आली, पण हीच थापी उलटी मारता नाय आली,त्यावेळी त्यांनी हातांनी सिमेंट लावून भिंतीची गोठाई केली. अनेक कष्ट उपासत या कामात त्या आता तरबेज झाल्या आहेत. आज पुरुषाला अधिक चांगले घराचे बांधकाम त्या करीत असल्याचे गावकरी अभिमानाने सांगतआहेत. या कामात अधिक प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण ही घेतले आहे. कमीत कमी नफा मिळविल्याने त्यांना बाराही महिने काम मिळत राहिले.
शासनाच्या निर्मलग्राम योजनेसाठी त्यांनी पंचक्रोशीतील महिलांसाठी घराघरो माफक मजूरीत शौचालय बांधून दिली. त्याचा लाभ माझ्या मायमाऊल्यांना झाला, म्हणून या कामातील आवड अधिक वाढत गेली. वर्षाकाठी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळाल्याने दूध व्यवसाय, पिठाची गिरणी सारखे व्यवसाय वाढवता आले. अडीच एकरात ऊस लावून तो संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जातो, हे त्या अभिमानाने सांगत आहेत. या सर्व कामात पतीराजांचे मोठे सहकार्य मिळत आहे. समीर १४वीत तर काजल १० वीत शिकलेली दोन अपत्यांची माय मोठ्या स्वाभिमानाने जगत आहे. माझ्या लेकाने पुढे याच व्यवसायात करिअर करावे अशी माझी इच्छा आहे.
खेडया पाडयातील तरूण बांधकाम क्षेत्रात नगण्य आहे, ती उणीव त्याने भरून काढली पाहिजे.स्वतःचा प्रपंच सावरणा-या सुनिता गायकवाड इतरांसाठी धावत पळत आहेत. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या मदतीने त्या खेडयापाडयातील महिलांनी व्यवसायात उतरावे असा आग्रह धरीत आहे. त्यामुळे फावल्या वेळात महिलांना पनीर व साबण बनविण्याचे त्या प्रशिक्षण देत आहे.खेडया पाडयात हक्काचा निवारा आणि शौचालय बांधून देण्याच्या कामात रोजगारही मिळाला आणि पुण्य प्राप्त झाले, म्हणूनच आज घरात सुखाचे चार दिवस दिसत आहे, याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिता गायकवाड यांची आई सुमन जाधव व वडील छगन जाधव म्हणाले, "लेकींने घराचे नाव उजळले, त्यामुळे आम्हाला मुलगा नाही ही खंत आता वाटतच नाही, आमची लेक लेका पेक्षा सरस निघाली, त्याने आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_