twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣8⃣1⃣

*फुलेवाडीच्‍या पोराची जर्मनीत ‘किक’ ⚽*

कोल्हापूर - याचं नाव अनिकेत अशोक वरेकर. वय फक्त एकोणीस. फुलेवाडीत दुसऱ्या बसस्टॉपजवळ राहतो. वडील चांदी कारागीर. रोज कामावर जी मजुरी मिळेल, त्यावर कुटुंबाची गुजराण. फुलेवाडीत राहायला छोटंसंच घर. या घरातला अनिकेत फुटबॉल खेळतो.

कोल्हापुरात नव्हे, आपल्या देशातही नव्हे, तो चक्क जर्मनीत न्यू ड्रीम्स संघाकडून खेळतो. तेथेच फुटबॉलचे आधुनिक तंत्र गिरवतो. आता दोन महिने तो सुटीवर आलाय. ओळखीचे लोक त्याला विचारतात, ‘‘अनिकेत, तू कोठे दिसत नाहीस!’‘ तो म्हणतो, ‘‘मी जर्मनीत असतो.’’ लोकांना ते पटतच नाही; कारण कोल्हापुरातल्या कोल्हापुरातच कोणत्या तरी तालमीकडून, संघाकडून खेळून मैदान गाजवले, तरच तो खेळाडू मोठा, ही समजूत अजूनही कोल्हापुरातून गेलेली नाही.

अनिकेतच्या फुलेवाडी ते जर्मनी या फुटबॉल प्रवासाची कथा खूप वेगळी आहे. जर्मनीच्या न्यू ड्रीम्स फुटबॉल संस्थेच्या वतीने २०१५ मध्ये भारतातील नवोदित शालेय खेळाडूंसाठी एक निवड चाचणी घेण्यात आली. त्यात देशभरातून पंधरा हजार विद्यार्थी प्राथमिक फेरीत निवडण्यात आले. त्यांतून जे तीसजण व त्यातही पहिले दहाजण निवडण्यात आले, त्यांत कोल्हापुरातील अनिकेत व प्रणव कणसे यांचा समावेश झाला. ते दोघेही महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी.

फक्त कोल्हापूर ते मुंबई विमानतळापर्यंतचा खर्च पालकांनी व त्यानंतर मुंबई ते जर्मनी विमानप्रवास, तेथील राहणे, खाणे-पिणे व शिक्षणाची पूर्ण जबाबदारी न्यू ड्रीम्सच्या तर्फे स्वीकारण्यात आली. अनिकेत गेली दोन वर्षे जर्मनीत आहे. नामवंत फुटबॉल प्रशिक्षकाकडून फुटबॉलचे धडे घेत आहे. स्थानिक वीस मॅचमध्ये त्याचे एकतीस गोल आहेत; तरीही त्याला अजून सरावाच्या कसोटीस रोज उतरावेच लागते आहे. केवळ गोल मारला म्हणजे हिरो नव्हे, तर संपूर्ण मॅचमध्ये ज्याचा कस दिसतो, जो दुसऱ्या खेळाडूकडे पास टाकतो, जो स्वत:च्या नावापेक्षा संघाच्या नावासाठी खेळतो, तोच खेळाडू आदर्श व श्रेष्ठ, असे जर्मनीत मानले जाते आणि याच तऱ्हेचे धडे त्याला दिले जात आहेत. एवढेच नव्हे तर त्याला इंग्रजी, जर्मनी, फ्रेंच व स्पॅनिश या भाषा शिकविल्या जात आहेत. फुटबॉल खेळाडूला केवळ फुटबॉलचे ज्ञान नव्हे, तर जगातील इतर घडामोडींचे ज्ञान असले पाहिजे, याच तयारीने त्याला प्रशिक्षण दिले जात आहे.

दोन महिन्यांच्या सुटीसाठी तो घरी आला आहे; पण त्याचा मित्राच्या साथीने रोज तीन तास सराव सुरू आहे. घराकडे सुटीवर गेला आहे, म्हटल्यावर ‘पाहिजे ते खा’ यावर पूर्ण बंधन आहे; मात्र त्याच्या कष्टकरी बापाची इथेच खरी कसोटी आहे. जर्मनीत त्याला रोज जो खुराक देण्यात येतो, तो येथे न परवडणारा आहे. दहा बाय दहाच्या एका खोलीत राहणाऱ्या या कुटुंबाला आपल्या ‘फॉरेन रिटर्न’ पोराची देखभाल म्हणजे कसोटी ठरली आहे. रोज फळे, ज्युस, कडधान्ये, पालेभाज्या, अन्य पूरक आहार व हे करून त्याचे वजन न वाढण्याची खबरदारी याचा ताळमेळ घालणे म्हणजे गोंधळ उडाला आहे. कारण त्याला परत जर्मनीत जाताना त्याचे वजन, त्याचे हिमोग्लोबिन व इतर शारीरिक तंदुरुस्ती याची वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि त्यात तो फिट ठरणेच आवश्‍यक आहे.

या परिस्थितीत वरेकर कुटुंब पोराचे कौतुक व त्याचा खर्च याच कात्रीत सापडले आहे. लोकांना काही सांगून कोणाकडून मदत घ्यायला गेले, तर अनिकेत जर्मनीत आहे, हे सांगितले तर लोकांना पटतच नाही अशी अवस्था आहे. ‘तुम्ही एवढे साधे आणि तुमचा मुलगा जर्मनीत कसा,’ अशा विचित्र भावनेच्या नजरेला अनिकेतच्या बाबांना रोज तोंड द्यावे लागत आहे.

*लोकांना पटतच नाही...*

बिकट परिस्थितीतूनही अनिकेत पुन्हा जर्मनीला जाणार आहे; पण फुलेवाडीतलं एक पोरगं जर्मनीत फुटबॉल खेळतंय, हे लोकांना पटतच नाही, हे खूप मोठं शल्य आहे. कारण इथल्या तालमीकडून, संघाकडून फुटबॉल खेळले, तोच मोठा हीच समजूत आणखी किती दिवस कोल्हापूरकरांत राहणार, हा खरा प्रश्‍न आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_