🐀डोंगर पोखरून काढला उंदीर!*
सकाळ वृत्तसेवा
02.48 AM
_*सोलापूर - प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशामध्ये किंचित बदल करत सुधारित धोरण गुरुवारी निश्चित केले. मात्र, हे सुधारित धोरण म्हणजे "डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे' असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिल्या आहे. या सुधारित धोरणाबाबत संघटना नाखूष आहेत.*_
सोलापूर - प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशामध्ये किंचित बदल करत सुधारित धोरण गुरुवारी निश्चित केले. मात्र, हे सुधारित धोरण म्हणजे "डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे' असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिल्या आहे. या सुधारित धोरणाबाबत संघटना नाखूष आहेत.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा विषय 27 फेब्रुवारीला ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशापासून गाजत आहे. या नवीन धोरणाच्या विरोधात राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अनेक शिक्षक संघटनांनी ग्रामविकासमंत्री, ग्रामविकास सचिव यांच्याशी अनेक वेळा चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सुधारित धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्या धोरणामुळे या बदली प्रक्रियेमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाले.
याआधीच्या आदेशामध्ये एका शिक्षकाला बदलीसाठी 20 शाळांच्या पसंतीचा प्राधान्यक्रम दिला होता. नव्या धोरणानुसार शिक्षकांनी पसंतिक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास त्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी उपलब्ध शाळांच्या यादीपैकी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देण्याची संधी दिली जाणार आहे. ही संधी दिल्यानंतर काही शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही तर अंतिमतः त्यांची बदली उपलब्ध रिक्त जागांवर केली जाणार आहे. त्याचबरोबर मणक्याचे विकार असलेले कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत.
*इतर मागण्यांचा विचार नाही*
सरकारच्या या सुधारित धोरणामध्ये शिक्षक संघटनांनी केलेल्या एकाही मागणीचा समावेश झाला नाही. महिलांच्या बदलीसाठी वयाची अट 50 करणे, शिक्षकांच्या तालुक्याच्या बाहेर बदल्या न करणे, समानीकरण न करणे या प्रमुख मागण्यांचा विचारच ग्रामविकास विभागाने केला नाही. त्यामुळे शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी केलेली धडपड वाया गेली आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ वेतन*
*एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा*
विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 19, 2017
रात्रशाळांतील शिक्षकांना दिलासा; एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा
राज्यातील रात्रशाळांमधील शिक्षकांची एका तपाची प्रतीक्षा अखेर संपली असून आता या शाळांमधील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पगार मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार एकाच वेळी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये नोकरी करून रात्रशाळेतही घुसखोरी करणाऱ्या शिक्षकांना चाप लागणार आहे. यापुढे रात्रशाळांमध्ये काम करणारा शिक्षक हा पूर्णवेळ शिक्षक म्हणून गणला जाणार आहे. शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तसेच या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी रात्रशाळेत या मुलांना सामावून घेण्यासाठी खास तरतूद करण्यात आली असून वयाच्या अकराव्या वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असला तरी प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट मात्र लागू राहणार नाही याचीही खास तरतूद या निर्णयातून करण्यात आली आहे.
राज्यात आत्तापर्यंत रात्रशाळांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, मात्र या निर्णयामुळे या शाळा आता अर्धवेळ शाळा म्हणून गणल्या जातील.
प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाचीही बायोमेट्रिक हजेरी केली जाणार असून अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे लाभ या शाळेतील शिक्षकांना मिळणार आहेत. यात वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शालेय वेतन प्रणाली, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाने भरती धोरणही लागू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळणार
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रयोगशाळेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तूर्तास आजूबाजूच्या शाळेतील प्रयोगशाळांचा वापर करता येईल, मात्र त्या-त्या शाळांमध्ये प्रयोगशाळांसाठी अनुदानही मंजूर केले जाणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎋रात्रशाळा शिक्षकांना दिलासा*
Updated May 18, 2017
*कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार; वैद्यकीय लाभ मिळणार*
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता वैद्यकीय सुविधांसोबत सेवेतील इतर लाभही मिळणार आहेत.
राज्यात १७६ माध्यमिक रात्रशाळा, ५६ ज्युनियर कॉलेज आणि ८ सीनियर कॉलेज आहेत. त्यामध्ये मिळून ३३,५८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा-कॉलेजांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २,१००पेक्षा अधिक आहे. त्यापैकी एक हजार ३५८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी दिवसा पूर्णवेळ आणि रात्री अर्धवेळ शाळा-कॉलेजांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची नोकरी दुबार होत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ३४.५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडत होता.
मात्र, सरकारच्या या निर्णयाचा फायदा गेल्या अनेक वर्षांपासून रात्रशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना होईल. त्यांची संख्या सुमारे ६१० इतकी आहे. दुबार नोकरीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय घेऊन रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता शिक्षक-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियामवलीनुसार वैद्यकीय सुविधा आणि सेवेतील इतर लाभ मिळणार आहेत.
दरम्यान, आता शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतरत्र दुबार नोकरी करता येणार नाही. तसेच, रात्रशाळा आणि कॉलेजांना बायोमेट्रिक प्रणाली लावावी लागेल. या कर्मचाऱ्यांना सेवा मिळण्यासाठी प्रा. अविनाश ताकवले, निरंजन गिरी, सुनील सुसरे, दर्शना पांडव यांच्यासह शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. ताकवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विभागाचे सचिव नंदकुमार यांचे अभिनंदन केले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
🎯कॉपीबहाद्दरांसाठी विद्यापीठाची खास सूट*
By pudhari | Publish Date: May 18 2017 9:42PM
औरंगाबाद : प्रतिनिधी
परीक्षा आटोपल्यानंतर त्याच दिवशी उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रातून विद्यापीठाच्या स्ट्राँगरूममध्ये जमा होणे अत्यावश्यक असते, परंतु विद्यापीठाकडूनच या परीक्षा केंद्रांना उत्तरपत्रिका जमा करण्यास दोन ते चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराचा फायदा साई इन्स्टिट्यूटसारखे महाविद्यालये उचलत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बुधवारचा सामूहिक कॉपीचा प्रकार उजेडात आल्यानंतरही विद्यापीठाने या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.
उत्तरपत्रिका दोन-दोन दिवस केंद्रप्रमुखांच्या ताब्यात राहत असल्यामुळे परीक्षा संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्या जात असल्याचा गैरप्रकार बुधवारी उघडकीस आला. असे असतानाही विद्यापीठ प्रशासन उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात कुचराई करताना दिसत आहे. 13 मे ते 16 मे दरम्यानच्या उत्तरपत्रिका अद्याप विद्यापीठात पोहोचलेल्या नाहीत. जालना, बीड, उस्मानाबाद येथील 16 तारखेचे पेपर शुक्रवार आणि शनिवारपर्यंत विद्यापीठात पोहोचणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेपासून ते एमपीएससी-यूपीएससी परीक्षेत, पेपर संपल्यानंतर त्या उत्तरपत्रिका त्याच दिवशी स्ट्राँग रूममध्ये जमा केल्या जातात. रात्री कितीही उशीर झाला तरीही उत्तरपत्रिका स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी परीक्षा नियंत्रकाची असते.
मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनच दोन ते चार दिवसांचा कालावधी केंद्रप्रमुखांना देण्यात आला आहे. उस्मानाबाद उप केंद्रांतर्गत येणार्या महाविद्यालयांना चार दिवस तर औरंगाबाद आणि जालना येथील केंद्र प्रमुखांनी दोन दिवसांत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडूनच देण्यात आलेल्या होत्या. हीच संधी होम सेंटर असलेल्या महाविद्यालयांना मिळाली. सायंकाळी पाच वाजता पेपर संपल्यावर सील फोडून पुन्हा उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिल्या गेल्या. होम सेंटरला परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका तातडीने विद्यापीठाकडे देण्याच्या सूचना नव्हत्या.
विद्यापीठाची गाडी जेव्हा त्या मार्गावर येईल, त्या वेळेला सील केलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विद्यापीठ प्रशासन उचलून नेते. विद्यापीठाकडे दोनच वाहने आहेत. त्यामुळे जरी विद्यापीठाने औरंगाबाद-जालन्यासाठी दोन दिवस दिले असले तरीही प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनंतर उत्तरपत्रिका विद्यापीठात पोहोचविण्यात आल्या. साई इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या प्रकारानंतरही या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. प्रशासनाकडून धिम्यागतीने पावले उचलली जात आहेत. विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका आणण्यासाठी वाहन व्यवस्था नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
*17 रोजी एका सेंटरचीच गाडी पाहोचली विद्यापीठात...*
16 मे रोजी अभियांत्रिकाच्या उत्तरपत्रिकेचा गैरप्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठच्या परीक्षा विभागाकडून शहरातील उत्तरपत्रिका अर्ध्यातासाच्या आता विद्यापीठात पोहोचल्या पाहिजे म्हणून सूचना देण्यात आल्या. सकाळ आणि दुपारच्या सत्रात 13 सेंटरवर औरंगाबादेत परीक्षा झाली. त्यापैकी केवळ एकाच सेंटरची गाडी 17 रोजी सायंकाळी सहा वाजता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उत्तरपत्रिका घेऊन उभी होती.
*मूल्यांकन केंद्राचे संचालक उत्तरपत्रिकांची करणार पडताळणी*
2 मे ते 15 मे दरम्यान झालेल्या विविध विषयांच्या उत्तरपत्रिका या मूल्यांकन केंद्राचे संचालक व त्या विषयातील तज्ज्ञांकडून पडताळल्या जाणार आहेत. त्यानंतर या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाईल. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत साम्य आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. साई अभियांत्रिकी महाविद्यालयात 13 मे पर्यंत विविध पाच शाखांच्या 82 विषयांचे पेपर झाले. 2 हजार 200 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या हातात आल्या आहेत. 14 ते 16 दरम्यान झालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका मात्र अद्याप विद्यापीठाला मिळालेल्या नाहीत. त्या साई केंद्रावरच अडकलेल्या आहेत. 16 मे पूर्वीच्या सर्व उत्तरपत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃