twitter
rss

🎯दहा प्रश्‍नांचे पर्याय "सीईटी'मध्ये चुकीचे*

सकाळ वृत्तसेवा
03.39 AM

पुणे - राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत एकूण दहा प्रश्‍नांचे पर्याय चुकीचे दिले गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 200 गुणांपैकी 11 गुणांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरची काठीण्य पातळीसुद्धा "जेईई-मेन' परीक्षेसारखी होती, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

गणिताच्या "व्हर्जन 11' प्रश्‍नपत्रिकेतील 39 क्रमांकाच्या प्रश्‍नासाठी "के व्हॅल्यू' देण्यात आलेली नव्हती. या प्रश्‍नासाठी दोन गुण आहेत. तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या "व्हर्जन 11' प्रश्‍नपत्रिकेतील 14, 15, 28, 33, 39, 40, 41, 42 आणि 43 क्रमांकाच्या प्रश्‍नांसाठी चुकीचे पर्याय देण्यात आले आहेत. प्रश्‍न क्रमांक 14 मध्ये डेटा अचूक दिला गेला नव्हता, 15, 28 व 33 व्या प्रश्‍नामध्ये पर्याय चुकीचे दिले गेले, 39 व्या प्रश्‍नाची मांडणी चुकीची होती आणि 40 व्या प्रश्‍नामध्ये "युनिट्‌स' व "नंबर ऑफ टर्न' दिले नव्हते. 41, 42 व 43 व्या प्रश्‍नांचीही मांडणी चुकली होती, अशी माहिती खासगी क्‍लासचालक संदीप देवधर यांनी दिली.

भौतिकशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ लागला. बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रत्येकी एक गुण असलेले असे किमान पाच प्रश्‍न अनुत्तरीत राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. रसायनशास्त्र विषयाचा पेपर खूप सोपा असल्याचेही त्यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*🥀शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणाच्या लेखापरीक्षणासाठी शासनाला पत्र*

*अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता*

प्रतिनिधी, सोलापूर  | Updated: May 12, 2017

सोलापुरात समाजकल्याण खात्यात घडलेल्या सुमारे साडेसहा कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून पोलीस तपास यंत्रणेने संपूर्ण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक बाबींचे लेखापरीक्षण होण्यासाठी राज्य शासनाच्या लेखा व हकदारी विभागाच्या महालेखाकारांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार लेखापरीक्षण झाल्यास या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
२०११-१२ ते २०१४-१५ या कालावधीत समाजकल्याण खात्यात शिष्यवृत्ती घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात एकूण १२१ आरोपी निष्पन्न झाले असून यात तत्कालीन समाजकल्याण सहायक आयुक्त मनीषा फुले, सुनील खमितकर, दीपक घाटे आदी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसह नऊ शासकीय सेवकांचाही सहभाग उघड झाला होता. यापैकी आतापर्यंत केवळ २३ जणांना अटक होऊन त्यातील २१ जणांचा गुन्ह्य़ातील सहभाग पुराव्याच्या आधारे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात  प्राथमिक दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नंतर पुन्हा पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तथापि, या घोटाळ्याचा तपास अद्यापि चालूच आहे. घोटाळ्यातील फसवणुकीची रक्कम व व्याप्ती पाहता, तसेच या घोटाळ्याच्या कालावधीतील समाजकल्याण खात्याच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडून कोषागाराला सादर करण्यात आलेली देयके व मंजूर देयकांप्रमाणे रक्कम वितरणाकरिता बँंकांना पाठविण्यात आलेले ईसीएस यांची रक्कम यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुन्ह्य़ातील अपहाराची तथा फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यताा असल्याने या संपूर्ण बाबींचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या लेखा व हकदार विभागाच्या महालेखाकाराला पत्र पाठवण्यात आल्याचे तपास अधिकारी तथा गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सांगितले.

या घोटाळ्यात सहभागी आारोपी नऊ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे. मात्र त्यापूर्वी कायद्यानुसार नियुक्ती व बडतर्फीसाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वमंजुरी घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. सक्षम मंजुरीचे आदेश प्राप्त होताच शासकीय सेवक असलेल्या संबंधित नऊ आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे घारगे-वालावलकर यांनी स्पष्ट केले. मात्र यापूर्वी या प्रकरणात न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपपत्रानुसार खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यास त्याचा लाभ शासकीय सेवक असलेल्या आरोपींना होऊन खटल्याचा निकाल प्रभावित होण्याची व खऱ्या अर्थाने गुन्ह्य़ाची उकल न होण्याची शक्यता पोलीस तपास यंत्रणेने वर्तविली आहे. त्यासाठी शासकीय सेवक असलेले आरोपी व इतर आरोपींविरूध्द सदर खटल्याची एकत्र सुनावणी घेण्याची आवश्यकता न्यायालयात सादर केलेल्या पत्राद्वारे दर्शविण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌺अकरावीच्या जागा‌‌‌ वाढणार*

Updated May 12, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

यंदा ३९ नव्या कॉलेजांची भर पडल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या वाढीव जागांची संख्या चार हजार असण्याची शक्यता असून, ​मुंबई शिक्षण उपसंचालक विभाग येत्या दोन दिवसांत निश्चित आकडेवारी जाहीर करणार आहे.
मुंबई विभागातील अकरावीचे सर्व प्रवेश यंदा ऑनलाइन होणार आहेत. आर्टस, सायन्स आणि कॉमर्स या शाखांबरोबरच एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेशही यंदा ऑनलाइन होतील. गेल्यावर्षी अकरावीकरिता तिन्ही शाखा मिळून सर्व कोट्यानिहाय २ लाख ८० हजार ५०० जागा उपलब्ध होत्या.
वसई-विरार आणि ठाणे, नवी मुंबई या परिसरातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, स्वयंअर्थसहाय्य या माध्यमातून कायम विनाअनुदानित तत्त्वावरील कॉलेज तसेच विनाअनुदानित तुकड्या सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालकांकडे पाठवले होते. त्यानुसार या नव्या कॉलेजांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी अकरावीसाठी उपलब्ध कॉलेजांची संख्या ७३९वरून ७७८वर पोहोचली आहे. या नव्या कॉलेजांच्या मान्यतेमुळे अंदाजे चार हजार जागा वाढण्याची शक्यता शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, या वाढीव जागांमुळे शहरातील अनेक कॉलेजांच्या मुख्याध्यापकांची चिंताही वाढणार आहे. अनेक लहान ज्युनिअर कॉलेजांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अकरावी प्रवेशाच्या सुमारे ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा हा आकडा कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃