📋एमएम-सीईटी आज*
Updated May 11, 2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
इंजिनीअरिंगसह, औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीची राज्य सरकारतर्फे घेतली जाणारी एमएम-सीईटी आज, गुरुवारी होणार आहे. राज्यभरातील १ हजार ११० उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदा तब्बल ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सकाळी ११ वाजता ही परीक्षा सुरू होणार असून साडेनऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित आहे. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान ‘नीट’प्रमाणे सीईटीला ड्रेसकोड नसल्याने या बंधनातून विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे.
सीईटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर अधारित आहे. राज्यभरातून पीसीएम ग्रुप (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या विषयासाठी १ लाख ४४ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी ग्रुपसाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) ९५ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएमबी ग्रुपसाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) १ लाख ४९ हजार १६२ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. मुंबई विभागातून ८० हजार ३३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सीईटी परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फोटोकॉपी मशीन, इंटरनेट, मोबाइल तसेच दूरध्वनी केंद्रांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र सोडता येणार नाही.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯खासगी शाळांच्या मनमानीला चाप*
By pudhari | Publish Date: May 10 2017
*शिक्षणमंत्र्यांची घोषणा*
पुणे : प्रतिनिधी
खासगी शाळांसह सीबीएसई, आयसीएसई शाळांद्वारे भरमसाठ फी आकारण्यात येत आहे. खासगी शाळांद्वारे मनमानीपणे आकारण्यात येणारे शुल्क आता पालकांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पालकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आणि शाळांच्या अवाजवी फी वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्यात बदल करण्यात येणार आहे. शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शुल्क नियंत्रण कायदा कडक करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या 53व्या वर्धापनदिनाच्या समारंभात तावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, भीमराव तापकीर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या विचार
भारती विशेषांकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना तावडे म्हणाले की, प्रत्येक पालकांना आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा असे वाटत असते. त्यासाठी त्यांना परवडेल एवढे शुल्क भरण्याची पालकांची तयारीही असते. मात्र, अलीकडे सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांद्वारे मनमानीपणे फीवाढ करण्यात येत आहे. पालकांना शाळांची फी न परवडणारी झाली आहे. शाळांद्वारे मुलांना शाळेत प्रवेश देताना आकारण्यात येणारी फी, तसेच त्यानंतर विविध सोयी सुविधांच्या नावाने आकारण्यात येणारे शुल्क आवाक्याच्या बाहेर जात आहे.
खासगी शाळांच्या बेकायदेशीरपणे आकारण्यात येणार्या फीवाढीच्या विरोधात शुल्क नियंत्रणासाठी सध्या अस्तित्वात असलेला कायद्यामध्ये पुरेशा तरतुदी नाहीत. राज्यातील अनेक शहरातील खाजगी शाळांच्या फीवाढीविरोधात पालकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे शुल्क नियंत्रण कायदा अधिक सक्षम करत खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाफ लावण्यात येणार असल्याचे तावडे यावेळी म्हणाले.
यावेळी डॉ. पतंगराव कदम म्हणाले, महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांच्या शिक्षण क्षेत्रात एक मोठा फरक आहे. इतर राज्यात शिक्षणक्षेत्रात सरकारी संस्थांचे योगदान आहे. परंतु, महाराष्ट्राच्या विकासात खाजगी शिक्षण संस्थाचे योगदान मोठे आहे. राज्यात खासगी शिक्षण संस्थानी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यामुळे सरकारने व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून चांगल्या शिक्षणसंस्थाना प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, हे करत असताना चुकीचे काम करणार्या संस्थावर ठामपणे निर्णय घेतले पाहिजेत.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
♻‘राज्यातील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस’*
*प्रबंध ऑनलाइन जाहीर करण्याच्या सूचना*
प्रतिनिधी, पुणे | Updated: May 11, 2017
*शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वक्तव्य*
‘राज्यातील अध्र्याहून अधिक पीएच.डी प्रबंध हे नक्कल (कॉपी-पेस्ट/बोगस) आहेत,’ असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केले. फक्त पगार वाढवण्यासाठी पीएच.डी केली जाते असेही ते म्हणाले.
भारती विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापनदिन सोहळ्यात तावडे बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार भीमराव तापकीर, मोहन कदम, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तावडे म्हणाले, ‘आपल्या विद्यापीठांमधील अध्र्याहून अधिक पीएच.डी या कॉपी पेस्ट असतात. फक्त पगार वाढवण्यासाठी किंवा नावामागे डॉ. लावण्यासाठी पीएच.डी केली जाते. पीएच.डीसाठी निवडण्यात आलेल्या बहुतेक विषयांचा पुढे काहीच उपयोग होत नाही. मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार आपल्याकडील पीएच.डीपैकी १.३ टक्के प्रबंधांचे संदर्भ (सायटेशन) वापरले जातात. त्यासाठी आता सर्व संशोधन केंद्रांना पीएच.डीचे प्रबंध ऑनलाइन जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून प्रबंधांची नक्कल करून पदवी मिळवण्याला अटकाव होवू शकेल.
*पदव्या घेणारी बेकारांची फौज*
कौशल्य विकास अभ्यासक्रमांची गरज असल्याचे सांगून तावडे म्हणाले, ‘पदवीचा संबंध नोकरीशी आणि नोकरीचा संबंध पुढे लग्नाशी जोडला जातो. मात्र त्यामध्ये मुलाला नेमके काय शिकायचे आहे, आपण जे शिकवतो ते त्यांना आवडते का याचा विचार होत नाही. त्यामुळे पदव्या घेणारी बेकारांची फौज शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडते आहे.’
*शिक्षणमंत्र्यांना घेराव*
शाळांमध्ये चालणाऱ्या नियमबाह्य़ शुल्कवाढीमुळे हैराण झालेल्या पालकांची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पुणे शहरातील काही शाळांनी केलेल्या शुल्कवाढीमुळे संतापलेल्या पालकांनी शिक्षणमंत्र्यांनाच घेराव घातला. शुल्कवाढ करणाऱ्या शाळांबाबत लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आश्वासन तावडे यांनी पालकांना दिले. शहरातील अनेक शाळांची प्रवेशद्वारे सध्या पालकांच्या जथ्थ्याने अडवलेली दिसतात. नियमबाह्य़ शुल्कवाढ झाल्याची तक्रार घेऊन पालकांनी आंदोलने सुरू केली आहेत. सध्या पुणे विभागीय शिक्षण संचालनालयाकडे १८ शाळांबाबत शुल्कवाढीच्या तक्रारी आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांबाबत शुल्कवाढीच्या तक्रारी येत आहेत. कायदा अधिक कडक करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे,’ असे तावडे यांनी पालकांना सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃