♻ शासनाची ‘सरल’ वेबसाईट वेडीवाकडीच*
By pudhari | Publish Date: May 12 2017
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा नव्याने वेळापत्रक काढले तरी शासनाची सरल वेबसाईट ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरळ होत नसल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन अर्जाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे शिक्षकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी सुधारीत धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दि 28 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन सादर करावेत, असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि.शं. कांबळे यांनी दिले होते.
आता शासनाने पुन्हा सुधारीत वेळापत्रक काढले. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेसाठी 12 ते 15 मेअखेर ऑनलाईन अर्ज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरण्याचा फतवा काढला आहे.दि. 12 मेपासून अनेक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी सरल या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. ‘येरे माझ्या मागल्या’ असाच प्रकार या वेबसाईटचा सुरू आहे. वेबसाईट वारंवार हँग होत आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरावयाचे कसे? असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. याबाबत काही शिक्षकांनी संबंधित विभागाशी वेबसाईटसंदर्भात तक्रारी केल्या मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणार्या शिक्षकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागानेच ठोस पावले उचलून कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
♻सोलापूर जि.प.शिक्षकांचे 6 तालुक्यात समायोजन होणार*
By pudhari | Publish Date: May 12 2017 9:02PM
_*दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी करमाळा, पंढरपूर, सांगोला या सहा तालुक्यात मंजूर पदाच्या प्रमाणात 7.48 टक्क्याने समायोजन*_
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे समान पदे रिक्त या तत्वानुसार दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी करमाळा, पंढरपूर, सांगोला या सहा तालुक्यात मंजूर पदाच्या प्रमाणात 7.48 टक्क्याने समायोजन होणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली.
शासनाच्या 27 फेबु्रवारी 2017 च्या जी.आर. नुसार शिक्षकांच्या बदल्या करताना पेसा कायद्यांतर्गत समान शिक्षक पदे ठेवावयाची असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने समानीकरणाचे सर्व प्रक्रियेची तयारी केली आहे. जिल्ह्यातील मंजूर पदे व कार्यरत पदे विचारात घेऊन एकूण रिक्त पदाच्या प्रमाणात समानीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 1044 शिक्षकांची पदे मंजूर असून कार्यरत पदे 9293, तर एकूण रिक्त पदे 751 आहेत. या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात मंजूर पदाच्या 7.48 टक्क्याने रिक्त ठेवावयाचे आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातून 37, उत्तर सोलापूर तालुक्यातून 15, सांगोला तालुक्यातून 3, पंढरपूर तालुक्यातून 16, करमाळा तालुक्यातून 11, बार्शी तालुक्यातून 42 असे 6 तालुक्यातून 124 शिक्षकांना अक्कलकोट तालुक्यात 11, माढा तालुक्यात 2, माळशिरस 62, मंगळवेढा तालुक्यात 22, मोहोळ तालुक्यात 27 समायोजन करावे लागणार आहे. मात्र या समायोजन करण्यासाठी कोणती सेवाज्येष्ठता यादी वापरावी यासंबंधी प्रशासन संभ्रमावस्थेत असल्याचे भरले यांनी पत्रकात म्हटले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
सातारा जि.प.फेरसर्वेक्षणात 431 शाळा दुर्गम क्षेत्रात*
By pudhari | Publish Date: May 12 2017
सातारा : प्रतिनिधी
शासनाने जाहीर केलेल्या सुगम-दुर्गम निर्णयावर शिक्षकांनी चांगलीच नाराजी दर्शवली होती, तर काही संघटना या आंदोलनाच्या पावित्र्यात होत्या. शिक्षकांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेने तिसर्यांदा फेरसर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणापूर्वी अवघड क्षेत्रात 528 शाळा होत्या. मात्र, नवीन झालेल्या फेरसर्वेक्षणामध्ये अवघड क्षेत्रातील 97 शाळा कमी झाल्या असून जिल्ह्यात 431 शाळा या अवघड क्षेत्रामध्ये मोडत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. दुर्गम क्षेत्राचे सर्वेक्षण झाल्याने सुगम शाळांमध्ये वाढ झाली असून हा आकडा आता 2 हजार 285 वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यांतील अवघड क्षेत्रातील आक्षेप घेतलेल्या शाळांची तिसर्यांदा पडताळणी करण्यात आली. त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. शासन आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यासाठी तालुकानिहाय त्या त्या तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपअभियंता बांधकाम यांच्याकडून तपासणी करून जिल्ह्यातील 528 शाळा दुर्गम क्षेत्रात असल्याचे घोषित करण्यात आले होते.
मात्र, महाबळेश्वर, पाटण व जावली या 3 तालुक्यांत दुर्गम क्षेत्रातील शाळांची संख्या जास्त असल्याने संबंधित शाळांविषयी शिक्षक संघटना व पदाधिकार्यांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे संबंधित तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील ज्या शाळांवर आक्षेप आले होते त्या शाळांची जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांकडून काही प्रमाणात पडताळणी करण्यात आली होती.त्यावेळी अनेक शाळा या सुगम क्षेत्रात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा या शाळांची तिसर्यांदा तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना दिल्या. त्यानुसार 9 पथकांमार्फत दुर्गम क्षेत्रातील शाळांची पुन्हा फेरसर्व्हेक्षण करण्यात आले होते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯सात शाळांची होणार सोमवारी सुनावणी*
By pudhari | Publish Date: May 12 2017
पुणे : प्रतिनिधी
शुल्कवाढ करणार्या पुण्यातील सात शाळांबाबत सोमवारी (15 मे) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. शाळांच्या शुल्कवाढीबाबत आज पुण्यात पालकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
फीवाढ आणि शालेय साहित्य खरेदीविषयक अनेक शाळांविरोधात पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरातील अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणावर फीवाढ केली आहे. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांना पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्य खरेदी ठराविक ठिकाणांहून करण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्याविरोधात पालकांनी शिक्षणमंत्री तावडे यांना शुक्रवारी घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी तावडे यांनी पालकांसोबत बैठक घेत चर्चा केली. तावडे म्हणाले, शुल्कवाढीसंदर्भात पुण्यातील अठरा शाळांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील शुल्कवाढ केलेल्या सात शाळांची सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील विबग्योर स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, सुरो स्कूल, सिंहगड स्प्रिंगडेल, महर्षी कर्वे शिक्षण संस्था आणि इमॅन्युअल मारथोमा आदि शाळांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीत योग्य तो निर्णय घेतला जाणार असून, सुनावणीसाठी संबंधित शाळांचे प्रतिनिधी, पालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुस्तके आणि गणवेश शाळेमधूनच खरेदी करण्याची सक्ती शाळांनी करू नये, यासाठी आदेश जारी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना फी संदर्भातील संपूर्ण माहिती पालकांना द्यावी, असे आदेशही तावडे यांनी दिले आहेत.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎓पीएचडीवर टीका करून थांबणार नाही!*
*विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण*
प्रतिनिधी, पुणे | Updated: May 13, 2017
*संशोधनासाठीचा निधी वाढवण्याची घोषणा*
‘पीएचडीचे प्रबंध आणि संशोधनाबाबत फक्त टीका करून थांबणार नसून संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासाठीचा निधीही वाढवण्यात येणार आहे,’ अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.
विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या ‘भारतीय विज्ञान संमेलन’च्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते.
राज्यातील पीएच.डी बोगस असल्याची टीका तावडे यांनी बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमात केली होती. त्याचा संदर्भ घेऊन तावडे म्हणाले, ‘संशोधनाचा दर्जा आणि पीएच.डीच्या पदव्यांबाबत नुसतीच टीका करून मी थांबणार नाही. संशोधनाचा दर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञान, निधी यांबाबत खासगी कंपन्यांचेही सहकार्य यापुढे घेण्यात येईल. नव्या विद्यापीठ कायद्यात स्वतंत्र संशोधन मंडळ स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. प्रबंध कॉपी-पेस्ट असू नयेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांचे काटेकोरपणे पालन विद्यापीठांनी करणे गरजेचे आहे. तशा सूचना संशोधन केंद्रांना देण्यात आल्या आहेत. संशोधनासाठी ६ टक्के निधीची तरतूद केली पाहिजे मात्र प्रत्यक्षात ०.२१ टक्के इतकाच निधी संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. येत्या दोन वर्षांत संशोधनासाठीचा निधी ४ ते ५ टक्कय़ांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.’
शाळांच्या शुल्कवाढीने संतापलेल्या पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी पुन्हा एकदा घेराव घातला. तावडे यांनी प्रसारमाध्यमांसमोरच पालकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असा आग्रह पालकांनी धरला.
🎋मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आधुनिकता आणणार*
Updated May 13, 2017
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुक्त विद्यापीठामार्फत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणक्रमावर भर देण्यात येणार असून, अभ्यासक्रमातील सुधारणांबरोबरच त्यात अत्याधुनिकपणा आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. लोकशाहीच्या प्रमुख स्तंभापैकी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे. समाजाच्या तळागाळातील प्रश्न मांडण्याबरोबरच समाजाच्या संवेदना जपण्याची गरज असून, वस्तूनिष्ठ पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांनी केले. मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाच्या वार्षिक गुणगौरव आणि जनसंपर्क या अनियतकालिकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
शंकराचार्य कुर्तकोटी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रकाश देशमुख, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाचे यापूर्वी काही अभ्यासक्रम केवळ खर्च जास्त होतो म्हणून बंद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन बंद पडलेले विविध अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येतील. समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, यासाठी नाशिकरोड कारागृहातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र मोफत सुरू करण्यात येणार आहे, असे सांगून वायूनंदन यांनी आगामी काळात अभ्यासक्रमात यूजीसीच्या धर्तीवर बदल करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
📚 बालभारतीकडून सोलापूरला मोफत पुस्तकांचे वितरण*
सोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यांचे वितरण पुणे येथील "बालभारती'ने गुरुवारी सुरू केले. पुणे विभागात पहिल्यांदा ही पुस्तके सोलापूर जिल्ह्याला दिली जात आहेत. उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यात शुक्रवारी (ता. 12) पुस्तके येणार आहेत.
पुणे येथील "बालभारती'मध्ये शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा, बालभारतीचे संचालक सुनील मगर, भांडारप्रमुख नीलिमा नाईक, वाहतूक ठेकेदार अतुल धूत यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे येणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर ट्रकचालकाचे स्वागत करून पहिला ट्रक सोलापूरकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या चार लाख 50 हजार 733 विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत.
मराठी, कन्नड, उर्दू या भाषांतील 24 लाख 53 हजार 881 पुस्तकांच्या प्रती विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणार आहेत. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जाणार आहेत, त्यामुळे पालकांनी खासगी दुकानदारांकडून पुस्तके खरेदी करू नयेत.
- सयाजीराव क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃