twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

*🤔 शेकडो प्रश्न पडू द्या... !🤔*

*✍ प्रसाद मणेरीकर  (शिक्षणाचे अभ्यासक)*

*शिक्षणातून कागदावरची नव्हे तर प्रत्यक्ष गुणवत्ता बहरायची असेल, तर स्वाभाविकपणे पडणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे मार्ग मुलांना दाखवायला हवेत.*

राज्याच्या शिक्षणाविषयी अस्वस्थ करणारं चित्र सतत समोर येत असताना, शिक्षण सचिव नंदकुमार यांनीही नागपुरात शिक्षकांशी बोलताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल काही गंभीर मुद्दे रोखठोकपणे मांडले. मुलांना साधा भागाकार नीटपणे न येतासुद्धा दहावीचा निकाल ऐंशी टक्के कसा लागतो, यावरच त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुलं अधिक विचारी, ज्ञानी कशी होतील, या दिशेने पावले उचलण्याची गरज त्यांनी मांडली आहे. शिक्षण सचिवांचा मुद्दा कागदावरच्या गुणवत्तेचा नसून प्रत्यक्षातील गुणवत्तेचा आहे. त्यांची तळमळ खरी आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढायची असेल, तर ज्ञानाच्या दिशेने मुलांचा प्रवास कसा होईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
आपली एकूणच शिक्षणव्यवस्था चौकटीत बांधली गेलेली आहे. पाठ्यपुस्तक ही एक चौकट आहेच; पण शिक्षक सांगतील ते, तेवढंच आणि तसंच करायचं ही आणखी एक चौकट आहे. ज्ञानरचनावाद स्वीकारला तरी ही चौकट आपण पुरेशी भेदू शकलो नाही. काही तुरळक प्रयत्न होताहेत; पण ते सार्वत्रिक नाहीत. सगळी तयारी करून घ्यायची ती परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी. त्यामुळे ही केलेली वरवरची तयारी कधीतरी उघडी पडते आणि वास्तव चित्र समोर दिसू लागतं. या स्थितीत मुलांना ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. खरं तर त्यासाठी आवश्‍यक क्षमता मूल स्वत:बरोबर घेऊनच आलेलं असतं. ज्ञानरचनावाद त्याबद्दलच बोलतो. या रचनावादाचे काही नमुने ग्राममंगल, अक्षरनंदन यांसारख्या काही प्रयोगशील शाळांनी महाराष्ट्रासमोर ठेवले आहेत. मुळातच मुलांना ज्ञानाची, ते मिळवण्याची आवड असते. त्यांना सतत प्रश्न पडत असतात. त्यातून जग समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न असतो. हे प्रश्न घरातील आणि परिसरातील माणसांविषयीचे, त्यांच्या वागण्याविषयीचे असतात. नातेसंबंधांचे असतात. परिसरातील विविध घटनांविषयीचे असतात. मात्र त्यांना उपलब्ध असलेल्या अवकाशात आणि अनुभवात त्यांच्या त्यांची उत्तरं मिळत नाहीत. सूर्य मावळतो आणि उगवतो या मधल्या काळात तो नेमका जातो कुठे, हे त्यांना कळत नसतं. भोवतालच्या अशा घटनांतील तर्कसुसंगतता ती शोधत असतात. मर्यादित पातळीवर का होईना; पण विचार करत असतात. यातून स्वत:चा तर्क ती लावतात. मात्र लावलेल्या तर्कात नेमकी व समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. पुरेसा अनुभव नसतो, भाषा विकसित व्हायची असते. त्यामुळे दुसऱ्याकडून उत्तरं मिळवण्यासाठी मूल धडपडत असतं. उत्तरासाठी मुलांची सतत भुणभुण सुरू असते. ती योग्य दिशेने न नेता रागावून, ती थांबवली गेली की हळूहळू मूल प्रश्न विचाराणं बंद करतं आणि त्याला प्रश्न पडायचेही बंद होतात.
म्हणूनच उत्तराच्या शोध घेण्यासाठी मार्ग सुचवणं हे मोठ्यांच काम असतं. त्याचबरोबर नवे प्रश्न मुलांना पडतील यासाठी तशा संधी मुलांना मिळणं गरजेचं असतं.
मग शाळा असो वा घर; इथे नेमकं काय घडायला हवं? पाहिलं म्हणजे मुलांनी विचारलेले प्रश्न स्वीकारले जायला हवेत. मग ते मूल कोणत्याही वयाचं का असेना. या प्रश्नांची उत्तरं निरीक्षणाच्या, कृतीच्या आधारे मुलांना मिळणार असतील तर तशा निरीक्षणाच्या किंवा कृतीच्या संधी मुलांना जाणीवपूर्वक द्यायला हव्यात. दोन निरीक्षणांमधील सहसंबंध शोधायला त्यांवर आधारित प्रश्न विचारून मदत करायला हवी. थेट उत्तरं देण्यापेक्षा उत्तरापर्यत जायच्या दिशा मुलांना द्यायला हव्यात. अभ्यासक्रम समोर ठेवून असे काही प्रश्न आवर्जून निर्माण करायला हवेत. उदाहरणार्थ- मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस शेती करायला लागला, असं सरधोपट विधान आपण करतो. समजा असे काही प्रश्न मुलांसमोर ठेवले की, शेतीची गरज माणसाला का पडली असेल? शेती करायची हे माणसाला कसं समजलं असेल? त्याने बी कसं मिळवलं असेल? कोणतं बी उपयोगी व कोणतं निरुपयोगी हे त्याला कसं कळलं असेल? शेती करताना त्याला कोणत्या अडचणी आल्या असतील? शेतीचं रक्षण कसं केलं असेल? आदी प्रश्नांची उत्तरं पाठ्यपुस्तकात नाही मिळणार; पण मुलं विचार करायला लागतील. मग कळेल की ही शेती करण्याची कला हजारो वर्षांच्या प्रयत्नाने माणसाने शोधलेली आहे. हेच थोड्या फार फरकाने प्रत्येक विषयाच्या बाबतीत करता येईल आणि मुलांसाठी ही उत्तरं शोधणं हा त्यांनी लावलेला शोध असेल. दुसरं म्हणजे आपला मुलांना प्रामुख्याने उत्तराची तंत्रं शिकवण्यावर असणारा भर कमी करावा लागेल.
      या अमुक प्रकारे गणित सोडव म्हणजे तुला उत्तर मिळेल, हे सांगणं आपल्याला सोपं असतं, कारण त्यामुळे मुलाला पटकन उत्तरापर्यंत पोचता येतं. त्या गणिताचा अर्थ मात्र मुलाला समजत नाही. अपूर्णांकांची बेरीज करताना अंशाची बेरीज करायची, छेदाची नाही हे आपण मुलांना सांगतो; पण छेदाची का करायची नाही, हे मुलांना कधीच समजत नाही आणि अशी अर्थ न समजता केलेली कृती ही निरुपयोगी असते. म्हणजेच आपल्याला मुलं अर्थापर्यंत पोचावीत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यासाठी तयार उत्तरं मिळवण्याचं तंत्र शिकवणारी आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. हे सारं इतकं जाणीवपूर्वक का करायचं? लगेचच यातून उद्याचे शास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे निर्माण होतील, असा भाबडा आशावाद ठेवायला नको. पण समजपूर्वक काम करणारी, विचारी, स्वतंत्र मतं असणारी, अंधश्रद्धेच्या मागे न लागणारी पिढी घडायला तरी किमान मदत यातून होईल. यातूनच मुलांमधली संशोधक वृत्ती अधिक विकसित व्हायला मदत होईल. तयार उत्तर मिळण्यापेक्षा शोध घेण्यातून मुलांसमोर माहितीची नवी दारं उघडतील, त्यातील नवे आयाम समजतील.'

*दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....*

http://guruvarykm.blogspot.in/     

*या blog ला अवश्य भेट द्या..*