🚌 शाळेच्या बसेससाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे*
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळेच्या बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सूचनेनुसार ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात शाळेच्या बसला झालेल्या अपघातनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘सर्व बसेसच्या खिडक्यांना तारांच्या जाळ्या लावणे बंधनकारक असले, तसेच बसचा वेग जास्तीतजास्त ४० असावा. प्रत्येक बसमध्ये जीपीएस प्राणली आणि सीसीटीव्ही असावेत. सर्व बसेस कायम सुस्थितीत असाव्यात,’ असे सीबीएसईच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘बसला अपघात अथवा विद्यार्थ्यांना इजा झाल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. सर्व बसेसमध्ये गजर आणि भोंगा असणे बंधनकारक आहे. शिक्षकांनीही या सूचनांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक बसमध्ये योग्य व्यवस्था आहे, याची खात्री करून घेण्यासाठी किमान एका पालकाने उपस्थित राहवे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक व्यवस्थापक आणि प्रशिक्षित महिला कर्मचारी नियुक्त करण्यात यावी. बसमध्ये एक मोबाइल फोन असावा. बसमधील सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेतला जाईल,’ असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🌱तहसीलपुढे मृतदेह ठेवून शिक्षकांचे आंदोलन*
सकाळ वृत्तसेवा
09.48 AM
एटापल्ली (जि. गडचिरोली)
- वैद्यकीय प्रमाणपत्र देऊनही रजा मंजूर न करता निवडणुकीच्या कामावर सक्तीने पाठविलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त शिक्षकांनी गुरुवारी (ता. 23) एटापल्ली येथील तहसील कार्यालयासमोर शिक्षकाचा मृतदेह ठेवून चार तास आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. एटापल्ली तालुक्यातील भगवंतराव आश्रम शाळा, भापडा येथील शिक्षक नामदेव ओकटु ओंडरे यांचा रक्तदाब वाढल्याने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ओंडरे यांनी प्रकृती चांगली नसल्याने निवडणुकीच्या कामावर पाठवू नये, अशा विनंतीचा अर्ज केला होता. सोबतच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडले होते. मात्र, त्यानंतरही ओंडरे यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी गेदा ते एटापल्ली असा सोळा किलोमीटरचा प्रवास ओंडरे यांना चालत करावा लागला. यातच प्रकृती खालावल्याने त्यांना एटापल्लीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस उपनिरीक्षक विश्राम मदने यांनी मारहाण केल्याचा आरोप मृत ओंडरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ओंडरे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकावर बुर्गी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
📚 पुस्तकांचे गाव अजूनही दूरच*
*यंदाच्या मराठी भाषा दिनीही प्रत्यक्षात नाही*
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी दिलेले पुस्तकांच्या गावाचे आश्वासन प्रत्यक्षात येईल, अशी मराठी वाचकांची अपेक्षा होती. मात्र हे गाव वसण्याचा मुहूर्त यंदाही मराठी भाषा दिनी प्रत्यक्षात येणार नाही, असे चित्र आहे. पाचगणीपासून जवळ असलेले हे भिलार हे पुस्तकांचे गाव प्रत्यक्षात यायला आणखी किमान दोन-अडीच महिने लागतील, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी दिली. पुस्तकांच्या गावाचे काम लांबण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि भिलार जिल्हा परिषद निवडणुका काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
‘पुस्तकांचे गाव’ या प्रकल्पाअंतर्गत भिलारमधील घरे निवडण्यात आली आहेत आणि त्यांना अंतिम मान्यता मिळाली आहे. त्याशिवाय थीमनुसार पुस्तक खरेदीसाठी बैठकाही झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेली पुस्तके सर्व प्रकाशकांकडून महिन्याभरात खरेदी करण्यात येतील, अशी माहिती तावडे यांनी दिली. याबद्दल प्रकाशकांशी चर्चाही झाली आहे. घरांनाही पुस्तकांच्या गावाच्या संकल्पनेला साजेशी रंगरंगोटी करण्याबद्दल निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये शिल्पे उभारण्यात येणार आहेत. या शिल्पांच्या किमतीबद्दल चर्चा सुरू आहे. आयआयटीकडून या जमिनीचे सर्वेक्षणही झाले आहे. त्यामुळे गावाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे सांगण्यात येत आहे.
भाषामंत्री विनोद तावडे महापालिका निवडणुकीत, तर भिलारमधील स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीत अडकले होते. त्यामुळे प्रकल्पाचे काम अपेक्षितरित्या पुढे सरकू शकले नाही. त्याचबरोबर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडियावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईप्रमाणाचे राज्यात विविध ठिकाणी विद्यापीठांच्या मदतीने मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्येही अनेक जण अडकल्याने पुस्तकांच्या गावाचे काम करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. मात्र मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम झाला की पुन्हा एकदा त्याच उत्साहाने पुस्तकांच्या गावाचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे आश्वासन या निमित्ताने दिले जात आहे.
मालगुंड प्रकल्पही ‘लवकरच’
भिलारचे पुस्तकांचे गाव साकारले की, मग कोकणातील मालगुंडच्या पुस्तकांच्या गावाच्या प्रकल्पालाही दिशा मिळू शकेल. यासंदर्भात कोकण मराठी साहित्य परिषदेने ‘एक तुतारी’ या सध्या कोकणात सुरू असलेल्या उत्सवाच्या निमंत्रणाच्या वेळी तावडे यांच्याकडे विचारणा केली होती. तेव्हा या उत्सवादरम्यान याबद्दल चर्चा करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिल्याचे कोमसापकडून सांगण्यात आले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
💶 *देशभरातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगात २० टक्के वाढीची शिफारस*
*अहवालात २० टक्के वाढीची शिफारस केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.*
वार्ताहर, यवतमाळ | February 25, 2017
देशातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी युजीसीने गठीत केलेल्या वेतन पुनíनर्धारण समिती (पीआरसी) ने युजीसीला सादर केलेल्या अहवालात २० टक्के वाढीची शिफारस केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ७ फेब्रुवारीला पीआरसीने अहवाल सादर केला होता. तो आयोगाने केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केल्यावर मंत्रालय आयोगाच्या शिफारसी स्वीकारणार असल्याचेही वृत्त आहे.
प्राध्यापकांची कामावर आधारित पदोन्नती पध्दत आणि संशोधनावर विशेष भर या शिफारशींमध्ये देण्यात आला आहे. प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ राहील, असे म्हटले आहे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ देशातील केंद्रीय विद्यापीठातील ३० हजार आणि इतर राज्यांमधील विद्यापीठातील व संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील ४ लाखांवर प्राध्यापकांना मिळणार आहे. आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात याव्या, असेही युजीसीने म्हटले आहे. सहायक प्राध्यापकाला ५९ हजार रुपये, सहयोगी प्राध्यापकाला १ लाख २६ हजार आणि प्रोफेसरला १ लाख ४४ हजार रुपये वेतन सातव्या वेतन आयोगात मिळेल. युजीसीच्या शिफारशी केंद्र सरकारने लागू केल्यास त्या राज्यांना स्वीकारणे बंधनकारक नाही, तरीही सामान्यत राज्य सरकारे त्या स्वीकारत असतात. महाराष्ट्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू केला होता. त्यामुळे सातवा आयोगही लागू करणार आहे. उज्जन येथे पीआरसीची शेवटची बठक झाल्यावर हा अहवाल ७ फेब्रुवारीला सादर करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे, येथे ३१ जानेवारी २०१७ पर्यंत अहवाल सादर न केल्यास एआयफुक्टो राष्ट्रव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेने समितीला ३ फेब्रुवारीला दिल्यावर आठवडाभरात अहवाल सादर होईल, अशी हमी समितीने दिल्याची माहिती एमफुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी शुक्रवारी लोकसत्ताला दिली.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎳🎲 टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य*
By pudhari | Publish Date: Feb 25 2017
पिंपरी : पूनम पाटील
सध्या बाजारात नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध असून, त्याद्वारे मुलांना शिकवणे सोपे झाले आहे; मात्र असे असताना घरातील टाकाऊ वस्तूंचाच प्रभावीपणे शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करून मुलांना हसत- खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न चिंचवड येथील शिक्षिका योगीता परबत या करत आहेत.
परबत या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या विविध टाकाऊ वस्तूंवर वैविध्यपूर्ण प्रयोग करत मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी संक्रांतीच्या सणाला वापरण्यात येणार्या बोळक्यांचा शैक्षणिक साहित्य म्हणून प्रयोग सुरू केला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ही बोळकी टिकल्या व रंगांच्या साह्याने रंगवायला सांगितली. त्यानंतर त्यावर घोटीव कागदापासून बनवलेली कमळाची फुले ठेवली. वर्ग सजावटीसाठी या बोळक्यांचा वापर होई शकतो, हे त्यांनी सर्वप्रथम मुलांना पटवून दिले. त्यानंतर डिसेंबर महिना संपल्यानंतर जुने कॅलेंडर काढल्यानंतर त्याचे करायचे काय हा प्रश्न पडतो. त्यावर त्यांनी एक नवीन प्रयोग म्हणून कॅलेंडरवरील तारखा व्यवस्थित कापून बोळक्यांवर चिकटवल्या. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना एकक, दशकाची संकल्पना शिकवण्यास सुरवात केली. संख्यांचा चढता, उतरता क्रम, त्यांची स्थानिक किंमत, संख्यांचे विस्तारीत रूप या संकल्पना समजावून सांगण्यासाठी या बोळक्यांचा खूप उपयोग होतो, हे परबत यांनी पटवून दिले.
बोळक्याप्रमाणेच घरगुती हळदी- कुंकू व समारंभातील वापरात नसलेल्या प्लॅस्टीकच्या ग्लासचा वापरही शैक्षणिक साहित्य म्हणून परबत यांनी करण्यास सुरुवात केली. त्यावर कॅलेंडरच्या तारखा चिकटवून संख्या मोजणीसाठी त्याचा उपयोग विद्यार्थी करत आहेत. त्याचप्रमाणे निरुपयोगी पृष्ठ्यांचे नळकांडे बनवून त्यावर कोलाज काम करून त्याचे
फ्लॉवरपॉट बनवणे, तसेच घरी किंवा शाळेत वृत्तपत्रांबरोबर येणारे जाहिरातीचे कागदांपासून वर्गसजावटीसाठी आकर्षक चक्रे बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना देत असल्याचे परबत यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक कोपर्यांची निर्मिती
परबत या नेहमी प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी वर्गातच पर्यावरण कोपर्यांची निर्मिती केली आहे. या कोपर्यांत त्यांनी ज्वारी, बाजरी, द्विदल धान्य व चिनी गुलाबाची लागवड करून त्याद्वारे मुलांना बीजारोपण कसे करावे, तसेच रोपांत बदल कसे होतात याबरोबरच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रियाही समजावून सांगितली जाते. या पद्धतीने शिकवल्यास मुलांना कुठलीही गोष्ट त्वरित आत्मसात करता येते, त्यामुळे असे अभिनव उपक्रम कायम करत असल्याचे परबत यांनी सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
*📚 साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान*
First Published :25-02-2017
मुंबई : ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी वर्ष २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख,ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यामध्ये ८ काव्यसंग्रह, ७ लघुकथा संग्रह, ५ कादंबऱ्या, २ समीक्षा, १ निबंध यासह १नाटक यांचा समावेश आहे.नवी दिल्ली येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी २०१६च्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्यअतिथी भौतिक शास्त्रज्ञ तसेच मराठी लेखक जयंत विष्णु नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थितहोते. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारांत सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही यासोहळ्यात पुरस्कृत करण्यात आले.आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ कथासंग्रहासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे. लोमटे यांनी मराठी साहित्यात पदव्युत्तर तथा डॉक्टरेट पूर्ण केली आहे. लोमटे यांचे ‘इडा पीडा टळो’, ‘आलोक’ हे कथासंग्रह आणि ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत. लोमटे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ग्रंथ गौरव’, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, भैरव रतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.एल. ठोकळ पुरस्कार, पा.वा. गाडगीळ पुरस्कार आणि मानवी हक्कवार्ता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃