twitter
rss

📋  शिष्यवृत्ती परीक्षा 26 फेब्रुवारीला

By pudhari | Publish Date: Feb 15 2017

पुणे : प्रतिनिधी

यंदा प्रथमच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा 26 फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 6 हजार 841 परीक्षा केंद्रांवर एकूण 9 लाख 58 हजार 259 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आतापर्यंत स्कॉलरशीप परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत होती परंतु यंदापासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच परीक्षा होणार आहे.  पाचवीच्या परीक्षेसाठी 5 लाख 50 हजार 400 तर आठवीच्या परीक्षेसाठी 4 लाख 7 हजार 859 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी दिली.

मराठी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी, तेलगू, सिंधी व कन्नड या आठ भाषातून ही परीक्षा होईल. याशिवाय सेमी इंग्रजी माध्यमही असणार आहे. परीक्षेसाठी अ ब क ड अशा प्रकारचे प्रश्‍नसंच असून या दोन्ही परीक्षेसाठी प्रत्येकी दोन पेपर होणार आहेत. सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार आहेत. पाचवीसाठी विविध प्रकारचे 16 हजार 683 तर आठवीसाठी 16 हजार 578 शिष्यवृत्ती संच उपलब्ध असणार आहेत. विशेष बदल म्हणजे या वर्षी इयत्ता आठवीच्या प्रश्‍नपत्रीकेत 20 टक्के प्रश्‍न असे आहेत की त्यांचे दोन पर्याय बरोबर असणार आहे. यंदा शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी पास-नापास घोषित न करता, शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र शिष्यवृती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांला मात्र प्रत्येक पेपरला किमाण 40 टक्के गुण मिळवावे लागणार आहे. 40 टक्केपेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत.तसेच 40 टक्के पडले म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मीळेलच असेही नाही असेही त्यांनी सांगितले. पात्र विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट तयार करण्यात येणार असून जिल्हानिहाय ग्रामीण व शहरी ठराविक कोट्यानुसार व मेरीट नुसार देण्यात येणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱 निलंबनाची कारवाई नियमाप्रमाणेच

By pudhari | Publish Date: Feb 15 2017

पुणे : प्रतिनिधी

सोलापूरचे शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही नियमाप्रमाणेच झाल्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितले.  शिक्षक संघटनांनी निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, याबाबत शासनच ठरवेल असेही कुमार यांनी स्पष्ट केले.

देशभक्त भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फाशी देण्यात आली, असा जावईशोध त्यांनी लावला होता. त्याबद्दल दोन दिवसांपूर्वी घाडगे यांनी याबाबतचे पत्र काढले होते, त्यावर तात्काळ निर्णय घेत आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, याबाबत काही संघटनांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सोलापूर शिक्षक समिती, बहुजन प्राथमिक शिक्षण संघ, उर्दू प्राथमिक शिक्षक संघ अशा काही संघटनांनी याबाबत विनंती केली आहे. तसेच घाडगे यांच्या पत्नी दीर्घकालीन आजारी असल्याचे मेसेजही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. याबाबत शिक्षण आयुक्त म्हणाले, अशा प्रकारे परवानगी नसताना आदेश काढणे चुकीचे असून, या कारवाईमुळे शिक्षण विभागातील सर्व अधिकार्‍यांना शिस्त पाळणे गरजेचे असल्याचा संदेश गेला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌴सोलापूर - शिक्षण विस्तार अधिकारीही निलंबित*

By pudhari

सोलापूर : प्रतिनिधी

जि.प. शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांच्याकडे चुकीची माहिती सादर केल्याने प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी जे.बी. सुतार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी निलंबित करण्याची कारवाई केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी घाडगे यांना विभागीय शिक्षण आयुक्तांनी निलंबित केले आहे.

14 फेब्रुवारी रोजी  शहीद  भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत शिक्षण विभागाने चुकीचे परिपत्रक काढले होते.  विस्तार अधिकारी यांच्याकडून चुकीची माहिती सादर करण्यात आली होती. कामाच्या व्यापामुळे घाईगडबडीत परिपत्रकावर मी सही केली असल्याची भूमिका शिक्षणाधिकारी घाडगे यांनी घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी विस्तार अधिकारी सुतार यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात आली आहे.

उपशिक्षणाधिकारी मदार गनी मुजावर यांच्याकडे प्रभारी शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. शिक्षण विभागातील सावळागोंधळ वाढतच असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिक्षण विभागातील विविध विषयांवर सविस्तर आढावा घेतला. शिक्षण विभागात सातत्याने कामचुकारी व गैरप्रकार होत असल्याने डोंगरे यांनी यावेळी सर्वच अधिकार्‍यांची कानउघडणी करुन असे प्रकार पुन्हा दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका घेतली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿 कोल्हापूर माध्यमिक  शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची ‘इनकॅमेरा’ चौकशी*

By pudhari | Publish Date: Feb 14 ,2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याच्या व भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची सुरू असलेली चौकशी ‘इनकॅमेरा’ करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. शिंदे यांची चौकशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे करीत आहेत. गेल्या दोन दिवसात 50 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, याशिवाय 38 मुद्द्यांचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, शिंदे यांना खुलासा करण्यासाठी देण्यात आल्याच्या पत्राचा खुलासा गोपनीय टपालाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. संस्थाचालक, शिक्षक व कर्मचार्‍यांकडून  करण्यात आलेल्या व प्रशासनास प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीची माहिती पुढे येताच चौकशी अधिकारी देशमुख यांच्याकडेही अनेक तक्रारी दाखल होत आहेत. या प्रकरणांचीही चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभागाकडे ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यांचीही चौकशी करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी दिले. दरम्यान, देशमुख यांनी सोमवारपासून (दि. 13) चौकशीच्या कामास सुरुवात केली आहे.

शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारी, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाबाबत उपस्थित 38 मुद्दे यांचा चौकशी अहवाल आठ ते दहा दिवसात येणे अपेक्षित आहे. या अहवालावर अभिप्राय देऊन तो शिक्षण सचिवांना पाठवण्यात येणार आहे. या चौकशीबाबत शिक्षण सचिवांशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. खेमनार यांनी सांगितले. शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी सुरू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाच्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃