twitter
rss

⛳बारावीच्या परीक्षांमुळे मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला स्थगिती*

*'विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चा समितीने घेतला निर्णय'*

मुंबई | February 26, 2017 7:10 PM

परीक्षांमुळे मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे संयोजकांनी म्हटले
बारावीच्या परीक्षांमुळे मराठा क्रांती मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे. ६ मार्च रोजी मुंबईमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पुढील तारिख बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल असे या मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत मोर्चे काढले जाणार नसल्याचे वृत्त आहे. ६ मार्च रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गणित, सांख्यिकी आणि हिंदीचा पेपर आहे. मराठा क्रांती मोर्चा या दिवशी झाला असता तर विद्यार्थ्यांना अडचण झाली असती. त्या दिवशी महाराष्ट्रातून लाखो लोक येणार होते. तसेच या दिवशी दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. असे झाले असते तर विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये अडकण्याचा धोका वाटत होता. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन समन्वय समितीने हा मोर्चा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. त्या दिवशी पेपर असल्यामुळे पालकांनी शिक्षण मंत्री यांच्या कानावर देखील हा प्रश्न घातला होता.

कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध निघणारे हे मोर्चे देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या मोर्चाचे वादळ उपराजधानी नागपूरमध्ये धडकले होते. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनावर मराठा-कुणबी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तरुणींनी केले. विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांना नोकरीमध्ये संधी मिळावी ही मागणी देखील होत आहे. याआधी निवडणूक असल्यामुळे मोर्चांना स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर हा मोर्चा निघणार होता परंतु मुलांच्या परीक्षांमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱शिष्यवृत्ती’साठी चक्क भारतीय बैठक!*

Maharashtra Times | Updated Feb 27, 2017

*जटवाड्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा जमिनीवर बसून द्यावी लागली.*

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाच्या नियमानुसार परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी बाकांची व्यवस्था असावी. केंद्र देखील जवळ असावे, असा नियम आहे, मात्र रविवारी झालेल्या पाचवी आणि आठवीच्या पहिल्याच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागला. त्यामुळे उत्तरपत्रिका लिहिताना अवघडल्यासारखे झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, तर आडवळणात दिलेले परीक्षा केंद्र शोधणे देखील अवघड झाल्याचे पालकांनी सांगितले.

गेल्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा झाली नव्हती, मात्र शासनाने यंदापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने नव्या नियमानुसार पाचवी आणि आठवीसाठी पहिली शिष्यवृत्ती परीक्षा आज औरंगाबाद जिल्ह्यातील ३३३ केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही परीक्षांसाठी ५३ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पाचवीसाठी ३० हजार ३०२, तर माध्यमिक म्हणजे आठवीसाठी २३ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधून प्राथमिकची परीक्षा १८३ परीक्षा केंद्रांवर, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी १५० केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५पर्यंत अशा दोन सत्रात हे पेपर होते. ओव्हर जटवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा ओव्हर जटवाडा आणि भारतमाता नगर बीड बायपास येथील स्व.शि वनारायण जैस्वाल प्राथमिक विद्यालयात विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत सुविधांचा अभाव होता. मुलांना पेपर सोडविण्यासाठी खाली बसवण्यात आले होते. शिवनारायण जैस्वाल शाळेकडे जाण्यासाठी नीट रस्ता नाही. बसायला बाक नाहीत. काही विद्यार्थी बाकांवर, तर काहींना त्यामुळे खाली बसून परीक्षा द्यावी लागली. जमिनीवर बसून लिहिताना अवघडल्यासारखे होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

वर्षभर तयारी करायची, परीक्षेसाठीचे शुल्क भरायचे, निमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा असायला हव्यात. मुलांना खाली बसावे लागले. जटवाडा येथे केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, असे पालकांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🖥  सरकारी कार्यालयांचा ‘युनिकोड’ला ठेंगा*

Maharashtra Times | Updated Feb 27,2017

AAAChintamani.Patki

@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : कम्प्युटर, मोबाइल, तसेच टॅब या साधनांवर सहज-सोप्या मराठीसाठी युनिकोडचा वापर वाढला असला तरी सरकारी कार्यालये जुनाट कारभारातून बाहेर आलेली नाहीत. आजही बहुसंख्य कार्यालयांचे काम अवघड अशा मराठीत चालू आहे. त्यामुळे एखादी फाइल पुढे पाठवताना फाँटचा प्रश्न निर्माण होतो आहे. युनिकोड वापरणे अनिवार्य या सरकारच्या आदेशाला सरकारी कार्यालयांनीच ठेंगा दाखवला आहे.

सरकारी कामकाजात मराठी वापर वाढावा, तसेच सोपी व सुस्पष्ट भाषा असावी, यासाठी युनिकोड ही संकेतप्रणाली वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारी कार्यालयातील मराठी अवघड असल्याने ती सोपी करण्याबरोबरच आधुनिक करण्यासाठी हे धोरण आखण्यात आले होते. मात्र सरकारी कार्यालयांनी आपला जुनाट कारभार बदलेला दिसून येत नाही. राज्याची सर्व प्रमुख शिक्षण कार्यालये पुण्यात असून या सर्व कार्यालयांमध्ये जुन्या पद्धतीने काम केले जाते.

कम्प्युटरच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी, तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी फाँट संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यातील बहुसंख्य फाँट महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात निकषांप्रमाणे नसल्यामुळे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी फाँट तयार करण्याचे काम सरकारची राज्य मराठी विकास संस्था करत आहे. हे फाँट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यापैकी दोन फाँटचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ या दोन फाँटना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत. पुण्याच्या सीडॅक या संस्थेने ही निर्मिती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मंत्रालयात सर्वत्र युनिकोड वापरली जात आहे. ती वापरात नसेल, तर भाषेत तांत्रिक चुका होतात. हे टाळण्यासाठी राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये युनिकोडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- महेश कुलकर्णी, सहसंचालक, सीडॅक

युनिकोडच्या वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच युनिकोडसाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक माहितीपट तयार केला असून तो सर्वांपर्यंत पोहचवत आहोत.

- डॉ. आनंद काटीकर, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📋महाराष्ट्र सीईटी परीक्षा ११ मे ला होणार*

Last Updated: Sunday, February 26, 2017

मुंबई : राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत.

सीईटी अर्ज भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत ठेवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ६०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃