twitter
rss

👫 सीबीएसई करणार दप्तराचे वजन निश्चित*

By pudhari

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मुलांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी नवीन निर्देश लवकर जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात दिली.

ते म्हणाले, मुलांच्या दप्तराचे ओझे वाढत आहे. ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार सीबीएसईसाठी नवीन मानक तयार करत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज सर्व पुस्तके व वह्या शाळेत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना शरीरिक समस्या निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. तसेच मुलांना देण्यात येणारे प्रोजेक्ट शाळेतच पूर्ण करून घेण्याचा विचार आहे. कारण घरी प्रोजेक्ट तयार केल्यास पालकच तो पूर्ण करून देतात, हा अजवरच अनुभव आहे. तसेच शाळेत प्रोजेक्ट असणाऱ्या दिवशी दप्तर आणखी कमी दप्तर आणण्याचे धोरण असणार आहे.

यापूर्वी केंद्रीय विद्यालयात दप्तरांच्या वजनाची मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये इयत्ता दुसरी पर्यंत दप्तराचे ओझे दोन किलो असावे, चौथी पर्यंत तीन किलो, सातवी पर्यंत चार किलो आणि त्यापुढील इयत्तेसाठी सहा किलो असे निश्चित केले होते. यामध्ये संशोधन करून सीबीएसईसाठी दप्तरांचे वजन निश्चित केले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🙇 गोंगाटातच करावा लागतोय अभ्यास*

By pudhari | Publish Date: Feb 17 ,2017

पुणे : ज्योती भालेराव-बनकर

महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झाली आणि याच सुमारास दहावी-बारावीच्या विद्यार्थांनाही परीक्षेचे वेध लागले आहेत. निवडणूक प्रचारामुळे शहरात सगळीकडेच प्रचाराची धामधूम सुरू झालेली आहे. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या कर्णकर्कश स्पिकर्समुळे व विविध पक्षांच्या घोषणाबाजीने परिसरात ध्वनिप्रदूषण वाढले आहे. याचा त्रास स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांबरोबरच दहावी-बारावीच्या मुलांनाही होत आहे.

दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेच्या आधी सराव परीक्षा सुरू आहेत.  प्रात्यक्षिक परीक्षांनाही सुरुवात झालेली आहे. अभ्यासाच्या तयारीच्या या दिवसांत मात्र प्रचारासाठी लावण्यात येणार्‍या कर्णकर्कश भोंग्यांमुळे आणि प्रचाराच्या गाण्यांमुळे अभ्यासात व्यत्यय येत आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास आणि उमेदवारांना प्रचार तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्यातरी अशा वातावरणातच मुलांना अभ्यास करण्याची कसरत करावी लागणार आहे. शहरात जवळपासच्या शांततेच्या जागा मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यात  प्रचाराच्या रणधुमाळीत तर  दिवसभर कर्णकर्कश आवाज करत प्रचार गाड्या फिरत आहेत. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा ‘पुढारी’कडे वाचला.

रिक्षा किंवा गाड्यांमधून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या विविध गाण्यांच्या ठेक्यांमुळे आम्हा अभ्यास करणार्‍या मुलांना  त्रास होत असल्याचे एक विद्यार्थी म्हणाला.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋 विद्यापीठांची मनमानी संपणार*
By pudhari | Publish Date: Feb 17 ,

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्व विद्यापीठातील अंतर्गत व्यवस्थापनात आता समानता येणार असून नव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांच्या मनमानीला विराम बसणार आहे. यासाठी नेमेलेल्या समितीचे काम अंतीम टप्प्यात असून यासंदर्भातील अहवाल लवकरच राज्यपालांना सादर केला जाणार आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांत महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमन नुसार समान परिनियम व प्रमाण संहितानुसार शिक्षकांच्या रजा, व्यवस्थापन, निवड प्रक्रिया, नियुक्ती, आरक्षण आदी कामकाजात मोठा सावळा गोंधळ आहे. सर्व विद्यापीठांसाठी एकच कायदा असताना नियमांच्या तरतुदींचे पालन मात्र विद्यापीठांकडून वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहे. नवा विद्यापीठ कायदा अंमलात आणताना यासंदर्भात त्रुटी राहू नये आणि सर्व विद्यापीठांसाठी समान नियम असावेत यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भात समिती स्थापन केली आहे.

या समितीचे अध्यक्ष म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यभरात असलेल्या विद्यापीठ अ‍ॅकॅडमी स्थितीचा अभ्यास करून राज्यभरातील सर्व विद्यापीठांना समान व्यवस्थापन असावे यासाठी ही समिती काम करीत आहे. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून राज्यपालांची मंजुरी  घेऊन नवा कायदा अस्तित्वात आणताना  समान परिनियम, सहिंता, विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. या कायद्याचे पालन सर्व विद्यापीठांना करावे लागणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला यासंदर्भातील रोडमॅप तयार होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

✈ लंडन ते टेंबलाईवाडी संवादाचा अनोखा प्रवास 🛬*

सुधाकर काशीद - सकाळ वृत्तसेवा
04.33 AM

कोल्हापूर - या दोघी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलच्या (ईस्ट फिंचले) शिक्षिका. केवळ आपल्याच शाळेतील मुले नव्हे तर अन्य देशांतील मुलांशी संवाद साधायचा, त्या मुलांना शिकवायचे आणि त्या मुलांकडूनही आपण काहीतरी वेगळे शिकायचे, ही त्यांची खूप इच्छा. एक चांगले निमित्त घडले आणि त्यांना चक्क कोल्हापुरातील टेंबलाईवाडीतील एका शाळेत यायची संधी मिळाली आणि "लंडन ते टेंबलाईवाडी' अशी शिक्षणाची वेगळी नाळ गेल्या काही दिवसांत जुळून गेली.

कोल्हापूर - या दोघी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलच्या (ईस्ट फिंचले) शिक्षिका. केवळ आपल्याच शाळेतील मुले नव्हे तर अन्य देशांतील मुलांशी संवाद साधायचा, त्या मुलांना शिकवायचे आणि त्या मुलांकडूनही आपण काहीतरी वेगळे शिकायचे, ही त्यांची खूप इच्छा. एक चांगले निमित्त घडले आणि त्यांना चक्क कोल्हापुरातील टेंबलाईवाडीतील एका शाळेत यायची संधी मिळाली आणि "लंडन ते टेंबलाईवाडी' अशी शिक्षणाची वेगळी नाळ गेल्या काही दिवसांत जुळून गेली.

अगदी शासकीय पातळीवर ठरवूनही सहजपणे जे शक्‍य झाले नसते ते कसे घडून आले त्याची ही गोष्ट. कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटलचे डॉ. सचिन कुलकर्णी टेंबलाईवाडीत राहतात. लंडनमधील प्रख्यात डॉक्‍टर जेरी कॉनव्हे व ते स्त्रियांच्या विशिष्ट आजारावर एक प्रबंध करत आहेत. त्या निमित्ताने डॉ. जेरी व त्यांची पत्नी जेन हे डॉक्‍टर कुलकर्णी यांच्या घरी राहायला आले. डॉ. कुलकर्णी यांच्या नोकराचा मुलगा त्र्यंबोली विद्यालयात तिसरीत शिकतो. त्याने एकदा डॉ. जेरी व त्यांची पत्नी जेन यांना हट्टाने आपल्या शाळेत नेले. या शाळेची स्थिती डॉ. कुलकर्णी व डॉ. जेरी यांनी पाहिली व त्यांनी या शाळेला बेंच, वीज कनेक्‍शन व बांधकामासाठी काही मदत केली व त्यातून शाळेचे रूपच पालटायला सुरवात झाली.

मिसेस जेन कॉनव्हे यांना तर या शाळेचा लळाच लागला. या शाळेतील मुले गरीब व मध्यमवर्गातील. इंग्रजीचा गंध नाही आणि याच मुलांना इंग्रजीची तोंडओळख करून द्यायची जेन कॉनव्हे यांनी ठरविले. यासाठी त्यांनी लंडनमधील प्रख्यात मार्टिन स्कूलशी संपर्क साधला. या शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस बेकन यांना ही कल्पना आवडली व त्यांनी जुली टेलर व ग्लासकिन या दोन तरुण धडपड्या शिक्षिकांना कोल्हापुरात पाठविण्याची तयारी दाखवली. या दोन्ही शिक्षिका काही दिवसांसाठी कोल्हापुरात येण्यास तयार झाल्या व काही दिवसांपूर्वी टेंबलाईवाडीतील या शाळेत दाखलही झाल्या. या शाळेतील गोरगरीब मुलांच्यात रमून गेल्या. मुलांच्यामध्ये फरशीवर बसून मुलांशी संवाद साधत राहिल्या. इंग्रजीचा गंध नसणारीही मुलं दोन दिवस थोडी बावचळली; पण मॅडम, गुड मॉर्निंग, मॅडम गुड अफ्टरनून, येस, नो, थॅंक्‍यू, टेक अ वॉटर, टेक अवर चपाती असं मोडकंतोडकं बोलत मुलं त्यांच्याशी संवाद साधू लागली. आता तर इंग्रजी-मराठी हा त्यांच्यातील भाषेचा फरकच संपून गेला आहे. मुलं थोडं थोडं इंग्रजी आणि या दोन्ही मॅडम थोडं थोडं मराठी बोलू लागल्या आहेत. त्यामुळे एक वेगळंच वातावरण टेंबलाईवाडीतील या शाळेत तयार झाले आहे.

अर्थात या शाळेत या शिक्षिका कायमस्वरूपी असणार नाहीत. त्या लंडनला परत जाणार आहेत; पण या शाळेतील मुलांशी त्यांनी कायमस्वरूपी नाते जोडले आहे. मुलांशी मनापासून एकरूप होऊन गेले, की भाषेचीही अडचण कशी राहत नाही, याचं ते एक उदाहरण आहे. अर्थात डॉ. सचिन कुलकर्णी, त्र्यंबोली विद्यालयाचे प्रकाश मांजरेकर, मुख्याध्यापक सूर्यकांत माने, नगरसेविका शोभा कवाळे, संभाजी पाटील यांचेही यासाठी खूप सहकार्य झाले आहे.

ए, बी, सी, डी बरोबरच ग, म, भ, न
ही मुलं जशी ए, बी, सी, डी शिकत आहेत, तसंच लंडनमधील या दोन्ही शिक्षिका या मुलांकडून ग, म, भ, न शिकून घेत आहेत. या जसं इंग्रजी बोलतील तसं बोलायचा प्रयत्न मुले करत आहेत. ही मुलं जसं मराठी बोलतात तसं मराठी बोलायचा प्रयत्न या शिक्षिका करत आहेत. जणू लंडन ते टेंबलाईवाडी असा संवादाचा नवा प्रवासच यानिमित्ताने सुरू झाला आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃