twitter
rss

आरटीईला मुदतवाढ २ मार्चपर्यंत*
Maharashtra Times | Updated Feb 26, 2017
नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या आरटीई प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीईंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पालकांना आता २ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
आरटीईसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. राज्यस्तरावरील https://rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. याआधी हे अर्ज सादर करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अधिकाधिक बालकांना या प्रक्रियेत समाविष्ट होता यावे, यासाठी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. पालकांच्या आणि त्यांच्या संघटनांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ करण्यात आली असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांमधून पालकांनी आरटीईचे अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. हे अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात.

गुरुवर्य न्यूज
樂 परीक्षेचे हॉल तिकीट हरवल्यास नो टेन्शन*
By pudhari | Publish Date: Feb 26 2017
ठाणे : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेला 28 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भवितव्य घडणार्‍या या परीक्षेचा ताण अनेक मुलांवर असतो. अशा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये अनेक वेळा परीक्षेला जाताना आवश्यक  असणारे हॉल तिकीटसारखी महत्वाची कागदपत्रे हरवल्यास हा ताण अधिक वाढतो. हा ताण काही अंशी कमी व्हावा यासाठी या क्षेत्रातील जाणकार मंडळीकडून तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.  एरव्ही तासनतास व्हॉट्स अ‍ॅपवर बोलणार्‍या तरुणांनी आपल्या हॉल तिकिटाचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढून पालकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवून ठेवल्यास  ऐनवेळी विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ कमी होईल. त्यामुळे अनेक विद्यार्थी अशा प्रकारची युक्ती अवलंबवण्यास तयार आहेत.

परीक्षा सुरु झाल्यानंतर अनेकदा हॉल तिकीट हरवण्याचा घटना घडत असतात. परिक्षेच्या एक आठवडा अगोदर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जात असल्याने काही वेळा ते गहाळ होण्याची शक्यता असते. सध्या उपलब्ध असलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर करून हॉल तिकिटाचा पुरावा आपल्याकडे ठेवण्याचा सल्ला या क्षेत्रातील जाणकारांकडून दिला जातो.  विद्यार्थी परीक्षेच्या काळात अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतून जात असतात. यासाठी पूर्वनियोजन आणि पूर्व तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये आवश्यक कागदपत्रांचे छायाचित्र काढून सेव केल्यास घाईच्या वेळी हे छयाचित्र कामी येऊ शकते, असे काही शिक्षकांना वाटते.

परीक्षा काळात ताण आणि भीती या दोन्ही गोष्टींचा सामना मुलांना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक दिवस आधी परीक्षेचा अभ्यास थांबवावा आणि परीक्षेला घेऊन जाणार्‍या साहित्याची एक वेगळी तयारी करून ठेवावी असे शिक्षकांना वाटते. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे पालकही तणावामध्ये असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कामामध्ये नको ठेवढा हस्तक्षेप केला जातो. अशा वेळी पालकांनीदेखील मित्राची भूमिका स्वीकारून मुलांशी संवाद साधले पाहिजे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
गुरुवर्य न्यूज
 कर्सिव्ह लिपीला मुख्याध्यापकांचा विरोध*
सामना
February 25, 2017
मुंबई- पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कर्सिव्ह लिपीचा समावेश नसताना केजीपासूनच विद्यार्थ्यांवर कर्सिव्ह लिपीची सक्ती करणाऱ्या शाळांना मुंबई मुख्याध्यापक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थ्यांवर कर्सिव्ह लिपीची सक्ती करणाऱया शाळांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने शिक्षण आयुक्त आणि राज्य शिक्षण मंडळाकडे केली आहे.
शाळा आणि कॉलेजस्तरावर कर्सिव्ह लिपीविषयी कोणतीही सूचना किंवा आग्रह शिक्षण विभागानेकेलेला नाही. याशिवाय कोणत्याही पाठ्यपुस्तकात कर्सिव्ह लिपीचा समावेश नाही, असा खुलासा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे. तरीदेखील बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमधून विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लिपी शिकवली जाते. पालकही या लिपीविषयी अज्ञानी असल्याने ते देखील घरी विद्यार्थ्यांची कर्सिव्हची प्रॅक्टिस करून घेतात. त्यामुळे या कर्सिव्ह लिपीच्या अभ्यासक्रमातील समावेशाविषयी शिक्षण विभागाने लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी केली आहे.
गुरुवर्य न्यूज
उत्तरपत्रिका तपासणी स्लो!*
Maharashtra Times | Updated Feb 26, 2017,
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
येत्या मंगळवारी, २८ फेब्रुवारीला राज्यात बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार असला तरी उत्तरपत्रिका तपासणीबाबत शिक्षकांच्या असहकाराचे सावट निर्माण झाले आहे. ज्युनियर कॉलेजचे शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीत सहभागी होणार असले तरी ही तपासणी संथ गतीने केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बारावीची परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार हे गेल्या काही वर्षातील सूत्र झाले आहे. यंदाही तपासणीबाबतचा शिक्षकांचा हा असहकार कायम रा‌हणार आहे. ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत त्याचा सरकारशी संघर्ष सुरू आहे. यातील अनेक प्रश्नांबाबत न्यायालयात प्रकरणेही प्रलंबित आहेत. ही प्रकरणे वगळता तुलनेने लहान प्रश्नांबाबत सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी ज्युनियर कॉलेज शिक्षकांनी केली आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दोन बैठकाही झाल्या आहेत. मात्र, या बैठकींमधून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या संघटनेने शिक्षणमंत्र्याना मागण्या मान्य करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे, ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीशी असहकार करण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे.
‘मंगळवारी परीक्षा सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ किंवा ४ मार्चपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीला प्रारंभ होईल. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास उत्तरपत्रिकांचे संथ मूल्यमापन करण्याचा इशारा आम्ही दिला आहे. शिक्षणमंत्र्यांपर्यंतही हा संदेश अधिकृतरीत्या पोहोचविण्यात आला आहे. नागपूर विभागात सगळे ‌‌‌‌मिळून २२०० ते २३०० शिक्षक व्हॅल्युअर म्हणून तर सुमारे ८०० ‌शिक्षक मॉडरेटर म्हणून काम करणार आहेत. यांच्या असहकाराचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर होईल. आमच्या मागण्यांसंदर्भात २८ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. मात्र, बैठकीसंदर्भात कोणताही निरोप अद्याप आलेला नाही’, अशी माहिती विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे विदर्भ सरचिटणीस अशोक गव्हाणकर यांनी दिली. या असहकाराबत नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक तसेच विभागीय ‌शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनाही सोमवारी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवर्य न्यूज
 जगातील सर्वात मोठय़ा पुस्तकाची जयसिंगपूरमध्ये निर्मिती*
*_जगातील सर्वात मोठय़ा आकाराच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे._*
प्रतिनिधी, कोल्हापूर | February 26, 2017 1:21 AM
जयसिंगपूर येथे २० फूट उंची व ३० फूट रुंदी अशा विशाल आकारात असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.
जयसिंगपूर येथे नगरीच्या शतकमहोत्सवानिमित्त जगातील सर्वात मोठय़ा आकाराच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जयसिंगपूरचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे केलेले ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या सेवा केंदाचे ऐतिहासिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काढले. २० फूट उंची व ३० फूट रुंदी अशा विशाल आकारात असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते .
जयसिंगपूर येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या द्विदशक महोत्सव व शहर शताब्दी वर्षांनिमित्त राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर शहराचे ऐतिहासिक कार्य या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकातील संदेश सात कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केलेले डॉ. दीपक हारके यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, चकोते उद्योगसमूहाचे अध्यक्ष  अण्णासाहेब चकोते यांनी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने डॉ. स्वर्णश्री गुर्रम, गंगाधरभाई, सुनीता बेहनजी यांनी मनोगत व्यक्त केले .
स्वागत राणी बेहनजी यांनी केले. प्रास्ताविक उत्तमभाई यांनी केले. प्राजक्ता नवाळे हिने भरतनाटय़ सादर केले. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, बजरंग खामकर उपस्थित होते.
गुरुवर्य न्यूज